
थोडक्यात महत्वाचे :
झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक आणि आदिवासी समाजाचे महानायक शिबू सोरेन यांचे 81 व्या वर्षी निधन झाले, त्यांच्या निधनाने झारखंडला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळवून देणारा 'दिशोम गुरू' हरपला.
18 व्या वर्षी आंदोलन सुरू करून त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चा स्थापन केला आणि जमिनीच्या हक्कासाठी लढा दिला; केंद्रीय मंत्री असतानाही वॉरंट निघाल्याने अंडरग्राऊंड जावे लागले आणि नंतर राजीनामा द्यावा लागला.
हेमंत सोरेन आता वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेत असून त्यांच्या नेतृत्वाखाली झारखंडमधील आदिवासी समाजाची लढाई पुढे नेण्याचे मोठे आव्हान आहे.
Shibu Soren story : झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक शिबू सोरने यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे एका आदिवासींसाठी झटणाऱ्या एका महानायकाचा अस्त झाला आहे. प्रामुख्याने झारखंडसाठी शिबू सोरेन यांचे योगदान अतुलनीय असेच राहिले आहे. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र व मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ‘आज मी शून्य झालो’, अशी भावना व्यक्त केली आहे. झारखंडमधील प्रत्येकाच्या मनात अशीच भावना असेल.
शिबू सोरेन यांना देशात ‘दिशोम गुरू’ म्हणून ओळखले जायचे. त्यांना हा दर्जा आदिवासी समाजानेच दिला होता. आदिवासींसाठी समर्पित भावनेतून ते करत असलेल्या कामामुळे या समाजाने शिबू सोरेन यांच्यावर भरभरून प्रेम केले. दिशोम गुरूचा अर्थ देशाचा गुरू असा होतो. त्यांनी आदिवासींच्या हक्कासाठी केलेला आजीवन संघर्ष या दोन शब्दांमध्ये दिसतो. झारखंडला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळवून देण्यात त्यांचीच भूमिका महत्वाची ठरली होती.
शिबू सोरेन यांचा खरा लढा वयाच्या 18 व्या वर्षापासूनच सुरू झाला होता. संथाल नवयुवक संघाची स्थापना करत त्यांनी आपले आंदोलन सुरू केले. त्यानंतर 1975 मध्ये झारखंड मुक्ती मोर्चाची मुहूर्तमेढ रोवली. त्यामाध्यमातून त्यांनी आदिवासींची जमीन बाहेरील लोकांना विक्री करण्यापासून रोखण्यासाठी आंदोलन उभे केले. चिरूडीह आणि कुकडो आधी ठिकाणच्या घटनांनी ते अधिक प्रकाशझोतात आले.
चिरूडीह हिंसा 1975 मध्ये झाली होती. यावेळी आंदोलनादरम्यान 11 जणांचा मृत्यू झाला होता. तब्बल 30 वर्षानंतर कोर्टाने याप्रकरणी सोरेन यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यावेळी ते मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होते. वॉरंटमुळे काहीकाळ ते अंडरग्राऊंड झाले होते. पण या वादामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. याप्रकरणात सोरेन यांना दिलासा मिळाल्यानंतर त्यांच्या गळ्यात पुन्हा मंत्रिपदाची माळ पडली होती.
सोरेन यांनी पहिल्यांदा 1977 मध्ये लोकसभेची निवडणूक लढली आणि पराभव झाला. पण त्यानंतर 1980, 1986, 1989, 1991, 1996 आणि 2004 असे सहावेळा ते लोकसभेत पोहचले. दुमका हा त्यांचा मतदारसंघ होता. यादरम्यान ते 2005, 2008-09 आणि 2009-10 या काळात ते झारखंडचे मुख्यमंत्री होते. त्यांचे पुत्र हेमंत सोरेन आता त्यांचा राजकीय आणि सामाजिक वारसा पुढे नेत आहेत. सलग दोन विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत ते मागील वर्षी पुन्हा मुख्यमंत्री बनले आहेत. अर्थातच या वाटचालीत वडील शिबू सोरेन यांचा वाटा सर्वात मोठा राहिला आहे.
शिबू सोरेन यांच्या जाण्यामुळे आदिवासींचा हक्काचा आवाज हरपला आहे. हेमंत सोरेन यांना आता हा लढा पुढे न्यावा लागणार आहे. वडिलांच्या अनुपस्थितीत पक्षाला एकसंध ठेवणे आणि हा लढा जिवंत ठेवण्याची कसरत त्यांना करावी लागणार आहे. मात्र, हे करत असताना त्यांना शिबू सोरेन यांच्यासारखा करिष्मा करून दाखविता येईल का, हे काळच ठरवेल.
वारंवार उपस्थित होणारे प्रश्न :
प्रश्न: शिबू सोरेन यांना ‘दिशोम गुरू’ का म्हणत असत?
उत्तर: आदिवासी हक्कासाठी दिलेल्या लढ्यामुळे त्यांना ‘देशाचा गुरू’ म्हणजेच दिशोम गुरू संबोधले जायचे.
प्रश्न: कोणत्या प्रकरणामुळे शिबू सोरेन यांना अंडरग्राऊंड व्हावे लागले?
उत्तर: 1975 च्या चिरूडीह हिंसेप्रकरणात अजामीनपात्र वॉरंट निघाल्यामुळे.
प्रश्न: शिबू सोरेन किती वेळा लोकसभेवर निवडून गेले होते?
उत्तर: सहा वेळा.
प्रश्न: शिबू सोरेन किती वेळा झारखंडचे मुख्यमंत्री होते?
उत्तर: तीन वेळा.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.