Mumbai News : कधी महायुतीच्या रूळावर तर कधी स्वबळावर, असे करता करता आपल्या राजकीय प्रवासात घसरत चाललेल्या मनसेच्या 'इंजिना'चा ब्रेक फेल होत चाललाय तर तिकडं मशालीची राजकीय वात पेटवता पेटवता शिवसेना ठाकरे गटाच्या 'मशाली'तील तेल सांडत चालल आहे.
आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर, 'इंजिना'चा ब्रेक फेल होणं आणि 'मशाली'तील तेल गळणं या दोन्ही गोष्टी दोन्हीही पक्षांना परवडतील का? नुसती फेकाफेकीची स्टंटबाजी करून महाराष्ट्रातील मतदार यांच्या पारड्यात मतांची फेकाफेकी करतील का ? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. (Political News)
राज ठाकरेंचा मराठवाडा दौरा; 'फेकाफेकी'चा अंक पहिला!
मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेले राज ठाकरे 9 ऑगस्टला बीड येथील एका कार्यक्रमाला जात असताना त्यांच्या नियोजित कार्यक्रमापूर्वीच बीडमध्ये 'सुपारी'फेकीचा कार्यक्रम पार पडला. मनसेचे कार्यकर्ते राज ठाकरेंचे (Raj Thackeray) स्वागत करण्यासाठी थांबले असताना भल्या मोठ्या जमावानं राज ठाकरेंचा ताफा अडवला आणि आंदोलकांनी ताफ्यातील वाहनांवर सुपाऱ्या फेकल्या.
जमावातील काही जण ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा देत असल्यानं सुरुवातीला हे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील कार्यकर्ते असावेत, असं वाटलं खरं मात्र त्यांच्यापैकी अनेकांकडं शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे गटाचं 'मशाल' हे निवडणूक चिन्ह असलेले झेंडे दिसून आल्यानंतर ते ठाकरे गटाचे कार्यकर्ते असल्याचं स्पष्ट झालं. या फेकाफेकीचा दुसरा अंक काल (10 ऑगस्ट) ठाण्यात पाहायला मिळाला.
उद्धव ठाकरेंचा ठाणे दौरा, 'फेकाफेकी'चा अंक दुसरा !
ठाण्यातील गडकरी रंगायतन या सभागृहात आयोजित मेळाव्यास उपस्थित राहाण्यासाठी जात असलेल्या उद्धव ठाकरेंचा ताफा मनसे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यातील कारवर शेण आणि बांगड्या फेकल्या. ताफ्यातील एका कारची काचही फोडण्यात आली.
शिंदे गट आणि मनसेचे कार्यकर्ते सभागृहात शिरण्याचा प्रयत्न करत असल्यानं सभागृहाबाहेर तिन्ही पक्षातील कार्यकर्ते भिडल्याचंही पाहायला मिळालं. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून हा राडा थांबवला आणि तिन्ही पक्षांतील अनेक कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलं. बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यातील वाहनांवर सुपाऱ्या फेकल्यानं त्याला प्रत्त्युतर म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी ठाण्यात उद्धव ठाकरेंचा ताफ्यातील वाहनांवर शेण आणि बांगड्या फेकल्या...
आरक्षणाच्या तापत्या तव्यावर शिजतेय राजकीय पोळी!
राज्यात सध्या मराठा-ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलाय. विविध पक्ष या तापलेल्या मुद्द्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेत आहेत पण या मुद्द्यावरून सुरू झालेलं राजकारण आता गुद्यावर जाऊन पोचलंय. जो तो आपली राजकीय ताकद दाखवण्याच्या नादात आपला संयम हरवत चाललाय. टीकेचा घसरलेला स्तर पाहून हाच का तो राजकीय संस्कृती जपणारा महाराष्ट्र असा प्रश्न पडू लागलाय. आरक्षण देतो, असं म्हणून वर्षानुवर्षे झुलवत ठेवणाऱ्या राजकारणी मंडळींना जाब विचारण्यासाठी आंदोलक आता बेधडकपणे त्यांच्या गाड्या भर रस्त्यात अडवू लागले आहेत.
आरक्षणावर प्रत्येक राजकीय पक्षाच्या भूमिका वेगळ्या
आरक्षणाच्या बाबतीत इथं प्रत्येक राजकीय पक्षाच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत. कुणी म्हणतंय महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, कुणी म्हणतंय आरक्षण देणं राज्य सरकारच्या नव्हे केंद्र सरकारच्या हातात आहे तर कुणी म्हणतंय, आम्ही आरक्षण देणार म्हणजे देणारच. आता कुणाची भूमिका रास्त हे कळायला मार्ग नसल्यानं कळणंच बंद झालेल्या आंदोलकांनी या राजकीय नेतेमंडळींच्या बंगल्यांवर धाव घेतली, त्यांच्या गाड्या रोखून पाहिल्या पण हाती काय लागलं... आश्वासनांचा भला मोठा भोपळा!
विधानसभा दूर तरी मराठवाड्यात नेत्यांच्या गाड्यांचा धूर!
त्यातच आरक्षणाच्या मुद्द्याचा केंद्रबिंदू ठरलेल्या मराठवाड्यात नेतेमंडळींच्या गाड्या धूर सोडू लागल्या आहेत. यंदाच्या विधानसभेच्या आखाड्यात मराठवाड्यात आपले पहिलवान चितपट होऊ नयेत म्हणून सभा, बैठका झडू लागल्या. अनेकांच्या दौऱ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या दौऱ्याचा नंबर लागला आणि 'फेकाफेक' कार्यक्रमाला प्रारंभ झाला.
क्रिया-प्रतिक्रिया : बीडमध्ये सुपाऱ्या, ठाण्यात बांगड्या!
बीडपासून ठाण्यापर्यंत घडलेल्या या फेकाफेकीच्या घटना पाहाता एक गोष्ट अधोरेखित होते आणि ती म्हणजे पक्षांचा घसरत चाललेला राजकीय संस्कृतीचा दर्जा! कुठल्या तरी गोष्टीच्या आडून-दडून आपला राजकीय अजेंडा राबवायचा हे हल्ली सर्रास घडू लागल आहे. या क्रिया-प्रतिक्रियांच्या राड्यात जो तो आपल्या पारड्यात मतांचा वाटा कसा वाढेल, याचा प्रयत्न करत सुटला आहे.
एकूणच काय तर मात्र महाराष्ट्राची जनता सूज्ञ आहे. सध्या जी काही फेकाफेक सुरू आहे ते ती उघड्या डोळ्यांनी पाहात आहे. निवडणुकीत कुणाच्या मतपेटीत कुणावर मतांची फेकाफेकी करायची हे तिला चांगलं ठाऊक आहे. घोडा-मैदान दूर नाही, थोडी कळ सोसावी लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.