'अजित पवारांची गुर्मीची भाषा...शिवाजीराव, जिल्हा परिषद कोणाची...?'

खेड पंचायत समितीच्या इमारतीवरून शिवाजीराव आढळराव पाटील यांची अजित पवारांवर टीका
 Ajit Pawar-Shivajirao Adhalrao Patil
Ajit Pawar-Shivajirao Adhalrao Patil Sarkarnama
Published on
Updated on

पुणे : खेड पंचायत पंचायत समितीच्या इमारतीसंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) सूचनेनुसार तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना भेटायला गेलो. त्यावेळी अजित पवारांची गुर्मीची भाषा काय...शिवाजीराव जिल्हा परिषद कोणाची आहे? कोणाची म्हणजे जनतेची आहे, असे मी म्हटलं. त्यावर ते म्हणाले, नाही आमची आहे. म्हटलं तुमची आहे, तुमचं बहुमत आहे. त्यामुळे निर्णय घेतला. निर्णय जरी तुम्ही घेतला असला तरी पंचायत समिती शिवसेनेची आहे. निधी आम्ही आणला आहे. त्यानंतर त्यांनी सीईओंना फोन करून शिवसेनेने निधी आणल्याची खात्री करून घेतली. त्यानंतर त्यांनी ठिकाय मी दिलीप मोहितेंशी (Dilip Mohite) बोलून तुम्हाला सांगतो, असे सांगितले. पण, आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री असूनही पंचायत समितीच्या इमारतीच्या कामाचा अजून मुहूर्त निघालेला नाही, अशी खंत शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी व्यक्त केली. (Shivajirao Adhalrao Patil criticizes Ajit Pawar over the building of Khed Panchayat Samiti)

माजी खासदार आढळराव पाटील यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आपली भूमिका पटवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीकडून मतदारसंघात झालेल्या अडवणुकीचा पाढाच वाचला.

 Ajit Pawar-Shivajirao Adhalrao Patil
'तहसीलदार रात्री घाबरत; तर पोलिस अधिकारी हे कोणी नसल्याचे पाहूनच भेटायला यायचे!'

आढळराव म्हणाले की, सुरेश गोरे यांनी आमदार असताना खेड पंचायत समितीची इमारत मंजूर करून आणली. पुढच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि नवीन आमदारांनी ठरवलं की ही इमारत या ठिकाणी बांधायची नाही. शिवसैनिक आणि आम्हा सर्वांची इच्छा होती की इमारत तिथंच बांधायची. पण, अजित पवारांनी सांगून टाकलं की नाही चालणार. नवीन ठिकाणी बांधा. पुन्हा मी उद्धव ठाकरेंकडे गेलो. त्यावेळी ते म्हणाले की, तुम्ही अजित पवारांना भेटा. त्यांना भेटलो. त्यांची गुर्मीची भाषा काय. शिवाजीराव, जिल्हा परिषद कोणाची आहे. कोणाची म्हणजे जनतेची आहे, मी उत्तरलो. त्यावर ते म्हणाले, नाही आमची आहे. मी म्हटलं तुमची आहे, तुमचं बहुमत आहे. त्यामुळे निर्णय घेतला. निर्णय जरी तुम्ही घेतला असला तरी पंचायत समिती शिवसेनेची आहे. निधी आम्ही आणला आहे. त्यानंतर त्यांनी सीईओंना फोन करून शिवसेनेने निधी आणल्याची खात्री करून घेतली.

 Ajit Pawar-Shivajirao Adhalrao Patil
'पवारसाहेब, मी घरी बसतो; पण विधानसभेला वळसे पाटलांनाही घरी बसवा!'

गेली पाच वर्षे आम्हाला न्याय मिळाला नाही

खेड पंचायत समिती इमारतीच्या कामासाठी सुरेश गोरे अनेकदा मुंबईला गेले. एकदा त्याच कामासाठी मुंबईला गेले असताना त्यांना कोरोनाची लागण झाली आणि येथे आल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात तरी आम्हाला न्याय मिळावा, यासाठी गोरे यांच्या पत्नी, सभापती यांना घेऊन मी मुख्यमंत्री ठाकरेंकडे बैठक लावली. त्यानंतर अधिकाऱ्यांकडे बैठक लावली, त्यावेळी उद्धवसाहेबांनी तुम्ही म्हणाल त्याच ठिकाणी इमारत होणार, असा शब्द दिला. त्यामुळे सगळ्यांना वाटलं आता साहेबांनी शब्द दिला आहे, तेव्हा काम मार्गी लागणार. आम्ही परत आलो. त्यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांची दालनात बैठक लावली. त्यात त्यांनी सांगितलं की दिलीप मोहिते म्हणतील त्याच ठिकाणी इमारत होईल. अजूनही आम्हाला न्याय मिळालेला नाही. पाच वर्षे होऊन गेली, असेही आढळराव उद्‌विग्नपणे म्हणाले.

 Ajit Pawar-Shivajirao Adhalrao Patil
राजन पाटलांचं अखेर ठरलं : दोन तारखेला भाजपत प्रवेश, बाळराजेंना विधान परिषदेचा शब्द!

आमच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी आंबेगावच्या आमदारांना गृहमंत्री केले

सभापती जेलमध्ये जातोय, त्याला जामीन मिळत नाही, त्याचा संसार उद्‌ध्वस्त झाला आहे. खोटे गुन्हे दाखल झाले आहेत आणि आमच्या जखमेवर मीठ चोळायचे म्हणून आंबेगाव तालुक्यातील आमदारांना गृहमंत्री केले. आम्हाला वाटायला लागलं गृहमंत्री, मुख्यमंत्री आमच्यापेक्षा त्यांचेच जास्त आहे. आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून दोन दोन वर्ष भेटायची परवानगी नाही. तरीसुद्धा आम्ही सर्व सहन करून पक्ष आपला आहे, उद्धव ठाकरे आपले नेते आहेत, त्यांची तब्येत चांगली नाही. त्यांची काहीतरी मजबुरी असेल म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो. शेवटपर्यंत राहिलो, आजही त्यांच्याच्या पाठीशी आहोत. पण आम्हाला जो निर्णय घ्यावा लागला त्याची कारणंसुद्धा ही सर्वांना माहिती असणे गरजेचे होती म्हणून सांगितली, असे आढळराव यांनी नमूद केले.

 Ajit Pawar-Shivajirao Adhalrao Patil
सभापतीची बायको, मुलगी ढसाढसा रडायच्या; पण त्यांना न्याय देऊ शकलो नाही : आढळराव

मुख्यमंत्र्यांच्या ऑर्डरनंतरही मुश्रीफांनी निधी दिला नाही

आढळराव म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीनंतरसुद्धा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या खात्याकडून पाच महिने निधी मिळाला नाही. सहाव्या महिन्यांत त्यांनी मला सांगितले की आढळराव तुमच्याच मतदारसंघात माझे चार आमदार आहेत. त्यामुळे मला निधी देता येत नाही. त्यावर ही ऑर्डर माझी नाही तर मुख्यमंत्र्यांची आहे, असे सांगितले. त्यांची असली तरी निधी देता येणार नाही, असे मुश्रीफांनी स्पष्टपणे सांगितले. परत उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो तरी निधी मिळाला नाही. अशी अनेक कारणे आहेत.

 Ajit Pawar-Shivajirao Adhalrao Patil
मोठी बातमी : राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुण्याचे देवेंद्र फडणवीस होणार पालकमंत्री!

मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केल्यामुळे माझी शिवसेनेतून हकालपट्टी झाली

राष्ट्रवादीचे आमदार कोटीमध्ये निधी आणायचे. आम्हाला वाटायचं शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे, शिवसेनेची सत्ता आहे, निधी मिळेल. पण दुर्दैवाने आम्हाला निधी मिळाला नाही. ज्या ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला. सरकारी निधीवर राष्ट्रवादी वाढविण्याचा त्यांचा एकच अजेंडा होता. आम्ही साखरं सांगायचं की कुणीतरी लक्ष घाला. पण कुणाचंही लक्ष नव्हतं. या सगळ्यांचा जेव्हा परिपाक झाला, उठाव झाला. त्या काळातही मला फक्त एकनाथ शिंदे यांचीच मदत झाली. त्यांच्याकडूनच निधी मिळत होता. त्यांना आमच्या व्यथा माहित होत्या. जेव्हा उठाव झाल्यानंतर सर्व महाराष्ट्र पेटला आहे. जेव्हा ४० आमदार फुटतात, तेव्हा विचार होऊन धोरणात बदल व्हायला हवा होता. मुख्यमंत्र्यांची निवड झाल्यानंतर कर्तव्य म्हणून त्यांचे अभिनंदन केले. पक्षाला आवडलं नाही, तिसऱ्या दिवशी माझी शिवसेनेतून हकालपट्टी केली, अशी खंत शिवसेनेचे उपनेते राहिलेल्या आढळरावांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com