Maharashtra Political News : सातत्याने वादात राहणारे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मराठा आरक्षण नाही मिळाले तर राजीनामा देतो, असे ते मागे एकदा बोलून गेले होते. तोच धागा पकडून एका पत्रकाराने त्यांना, आता राजीनामा देणार का, असा प्रश्न विचारला. आपण मुख्यमंत्र्यांचेही ऐकत नाही, असा भाषेसह सरंजामी देहबोलीसह वापरणाऱ्या सावंतांनी पत्रकाराच्या प्रश्नालाही तशाच पद्धतीने उत्तर दिले. बोचऱ्या प्रश्नापासून आधी पळ काढणाऱ्या सावंतानी नंतर आगीत तेल ओतू नका, असे बेमुर्वतपणे उत्तर दिले.
मराठा समाजाला २०२४ पर्यंत आरक्षण न मिळाल्यास राजीनामा देऊ, असे डॉ. सावंत म्हणाले होते. आता मराठा आरक्षणाचे आंदोलन पेटले आहे. मनोज जरांगे पाटील यासाठी राज्यभर फिरत आहेत. यापूर्वी त्यांनी दोन वेळा बेमुदत उपोण केले. सरकारने दोन महिन्यांची मुदत मागितल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले, यापैकी एक महिना आता संपला आहे.
दरम्यान, या आंदोलनावरून मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू झाला आहे. छगन भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. येत्या २४ डिसेंबरला सरकारने मागितलेली दोन महिन्यांची मुदत संपणार आहे. त्यामुळे हे आंदोलन आता निर्णायक टप्प्यात आले आहे. अशातच एका पत्रकाराने पुण्यात सावंतांना जुन्या वक्तव्याची आठवण करून दिली.
डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांची देहबोली सरंजामी पद्धतीची असते. त्यांना प्रश्न विचारलेले आवडत नाही, एखाद्या अधिकाऱ्याने चांगला सल्ला दिला तरी तो आवडत नसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यांच्या या स्वभावाचा अनुभव राज्याने वेळोवेळी घेतला आहे. पुण्यात पत्रकाराने राजीनाम्यासंबंधी प्रश्न विचारताच सावंत चांगलेच भडकले.
मराठा समाजाला २०२४ पर्यंत आरक्षण न मिळाल्यास मी राजीनामा देणार, असे ते मागे म्हणाले होते. आता या पत्रकाराने सावंत यांची दुखरी नस दाबली होती. प्रश्न विचारताच सावंतांनी तेथून पळ काढला, मात्र, पत्रकाराने त्यांचा पिच्छा सोडला नाही. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून आता तुम्ही पळ काढत आहात का, असे पुन्हा विचारताच सावंत चांगलेच संतापले. आता पत्रकारांनी आगीत तेल ओतू नये, असे म्हणत ते निघून गेले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आरोग्यमंत्री डॉ. सावंत असे का वागतात, असा प्रश्न राज्यातील नागरिक उपस्थित करत आहेत. समोरच्या कस्पटसमान लेखण्याची भावना त्यांच्यात बळावल्याची चर्चा आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांनी अनेक वेळा अडचण केली. नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मृत्यूंना सर्व मंत्रिमंडळ जबाबदार आहे, असे वक्तव्य करून त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचीच गोची केली होती.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी निलंबित केलेल्या पोलिस निरीक्षकाला स्थानिक गुन्हे शाखेचा प्रमुख करावे, म्हणून त्यांनी धाराशिवचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासमोर आकांडतांडव केला होता. हा अधिकारी वादग्रस्त होता, म्हणूनच एका आमदाराने विधिमंडळात त्याच्याविरोधात आवाज उठवला होता. त्यामुळे गेल्यावर्षी फडणवीसांनी त्याला निलंबित केले होते. मी सांगतो तेच ऐकायचे, मी मुख्यमंत्र्यांचेही ऐकत नाही, असे सावंतांनी कुलकर्णी यांना सुनावले होते. या प्रकरणाची धूळ खाली बसत नाही तोच सावंतांनी पुन्हा एक नवीन वाद निर्माण केला आहे. वाद आणि सावंत हे नाते यापुढेही अतूट राहण्याचीच शक्यता अधिक आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.