BJP State Executive Meeting in Pune: भारतीय जनता पक्षाची कार्यकारीनी पुण्यमध्ये होणार आहे. या कार्यकारीनीत काय मंथन होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागेल आहे. लागोपाठच्या धक्क्यांनंतर पुन्हा एकदा जोमाने लढण्यासाठी भाजपाची पुणे शहरात होत असलेली प्रदेश कार्यकारिणीची बैठक राज्यातील आगामी व्यूहरचनेबरोबरच पुण्यासाठीही महत्त्वाची ठरणार आहे.
आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तसेच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेऊन पुण्यातील लोकसभेचा उमेदवार, शहराध्यक्ष आणि पुण्याचे पक्षातील नेतृत्त्व, या मुद्द्यांवर मंथन होऊन अल्पावधीत निर्णय होण्याची चिन्हे आहेत.
महापालिका निवडणुका ऑक्टोबर दरम्यान तर, पुढील वर्षी एप्रिल-मेमध्ये विधानसभा, लोकसभेच्या निवडणुका होण्याची चिन्हे आहेत. भाजपाच्या शैलीनुसार त्याची तयारी आधीपासूनच सुरू झाली आहे. प्रदेश कार्यकारिणीची बैठक ही 'रूटीन' असल्याचे सांगितले जात असले तरी, नागपूर, अमरावती, पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे.
मात्र, विधानपरिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपाने (BJP) चांगली कामगिरी केली होती. राज्यात एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या मदतीने सत्ता स्थापन केली. त्यानंतरच्या घडामोडींत पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत पक्षाला ताकद लावूनही पराभव स्विकाराला लागला. तर, पिंपरी-चिंचवडमध्ये तिसऱ्या उमेदवाराने घेतलेल्या मतांमुळे भाजपाच्या उमेदवाराचा विजय सुकर झाला.
दुसरीकडे न्यायालयीन लढा जोमाने लढत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मतदारांत असलेली सहानुभूती अद्याप कमी झालेली नाही. तसेच आदित्य ठाकरे यांच्या सभा, पदयात्रा, रोड शोला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर, पुण्यात होत असलेली कार्यकारिणी पक्षाच्या राज्यातील वाटचालीसाठी महत्त्वाची ठरणार आहे. भाजपाच्या वर्तुळात पुण्याला महत्त्वाचे स्थान आहे.
पक्षाच्या वाटचालीत पुण्याचे महत्त्वपूर्ण योगदान पूर्वीपासून आहे. खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुण्यात भाजपाच्या नेतृत्त्वाची पोकळी निर्माण झाली आहे. जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्येही पुन्हा दमदार पावले टाकण्याची पक्षाला गरज आहे. पुण्यातील जगदीश मुळीक यांचीही शहराध्यक्षपदाची 'टर्म' संपली आहे. चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे तेथेही मोठी पोकळी निर्माण झाली आहे तर, जिल्ह्यातील पक्षाच्या प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठीही मार्गक्रमण करावे लागेल.
आगामी महापालिका आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष व लोकसभेच्या उमेदवार या बद्दलची चर्चा स्थानिक आणि प्रदेश स्तरावर सुरू झाली आहे. पुण्यात शहराध्यक्षपदासाठी मुरलीधर मोहोळ, गणेश बिडकर, सिद्धार्थ शिरोळे, धीरज घाटे आदी नावे चर्चेत आहेत. मोहोळ यांची प्रदेश सरचिटणीसपदी वर्णी लागल्यामुळे पुण्यात नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.
महापालिकेतील भाजपाची सत्ता कायम राखण्याची क्षमता असलेला आणि शहरात सर्वदूर संपर्क असलेल्या सक्षम 'अध्यक्षा'चा शोध पक्षात सुरू आहे. पक्षसंघटनेतच सक्रिय असलेल्या का, सर्वसामान्यांत लोकप्रिय असलेल्या व्यक्तिला संधी द्यायची, याबद्दल भाजपच्या अंतर्गत वर्तुळातच जोरदार चर्चा आणि लॉबिंग सुरू आहे.
महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत बापट यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. प्रत्येक प्रभागाची त्यांना खडानखडा माहिती होती. मात्र, २०२३ ची परिस्थिती बदलली आहे. बापट यांची भूमिका पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) बजावतील का, याकडे लक्ष आहे. त्यांनी गेल्या पाच वर्षांत पुण्यातील संपर्क सर्वदूर वाढविण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचेही पुण्यावर बारकाईने लक्ष असते. तर, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनीही पुण्यातील कार्यकर्त्यांशी संपर्क वाढविला आहे. पक्षाचे स्थानिक आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे यांना आपआपल्या मतदारसंघावरच लक्ष केंद्रीत करण्यास पक्षसंघटनेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे शहरस्तरावर स्थानिक नेतृत्त्व कुणाकडे, हा प्रश्न भाजपमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील पक्षाची घडी नेटकी बसविण्यासाठीही येथे होत असलेली प्रदेश कार्यकारिणीची बैठक महत्त्वाची ठरेल, अशी चिन्हे आहेत.
तर, लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ, जगदिश मुळीक, सिद्धार्थ शिरोळे, राजेश पांडे आदींची नावे चर्चेत आहेत. फडणवीसही पुण्यातून निवडणूक लढतील, अशी चर्चा आहे. तसेच माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे वास्तव्य सध्या पुण्यात आहे, याकडेही भाजपमधील काही मंडळी लक्ष वेधत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.