
अभय नरहर जोशी
‘नरकातील स्वर्ग’ असे पुस्तक प्रकाशित झाल्याची बातमी देशभर अन् देशाबाहेरही पसरली. त्याची पाकिस्तानी नेते, लष्करप्रमुख, दहशतवादी यांनाही खबर लागली. नरकात स्वर्ग कसा असू शकतो, हे जाणून घेण्यासाठी त्यांनी तातडीने हे पुस्तक मागविण्याच्या हालचाली सुरू केल्या. त्यापैकी काही जणांनी दिवास्वप्न पाहत स्वगत करण्यास सुरुवात केली. वाचा ही स्वगते...
पाकिस्तानी पंतप्रधान : लाहौल विला क़ुव्वत! इस हिंदोस्तान का कुछ समझ में नहीं आता। हम इनके कश्मीर, जो के ज़मीन पर एक जन्नत है, उसे जहन्नम बनाने की कोशिश कर रहे हैं। मगर वो कोशिश कामयाब नहीं हो रही। और इधर इनके कुछ लीडर ऐसे हैं जिन्हें जहन्नम में भी जन्नत नज़र आ रही है। अब हम करें तो क्या करें?...(ते पुढेही उर्दूतच बोलत राहिले. परंतु आपल्या वाचकांच्या सोयीसाठी सुगम मराठीत हे स्वगत देतो. (दमछाक नको आमची नि वाचकाचीही)
...या हिंदुस्थानचं काहीच समजेनासं झालंय. आम्ही यांच्या काश्मीर या पृथ्वीवरील स्वर्गाचा नरक करण्याचा प्रयत्न करतोय. तो सफल होईना. अन् यांच्याकडे काही नेत्यांना नरकातसुद्धा स्वर्ग दिसत आहे. आता काय करावं. काश्मीरचा नरक करताना आमच्या पाकिस्तानचाच नरक केव्हा झाला हेसुद्धा समजलं नाही. या नरकयातना कशा सहन कराव्यात बरं? यासाठी ‘नरकातील स्वर्ग’ हे पुस्तक उपयोगी ठरेल असे वाटते. नरकातही स्वर्गसुख कसं घ्यायचं, याच्या ‘टिप्स’ यात असतील.
सध्या भारताशी संबंध बिघडल्यामुळे हे पुस्तक कसे मागवावे बरे? या पुस्तकाच्या लेखक संपादकाला जेव्हा जेव्हा टीव्हीवर पाहतो तेव्हा तेव्हा तो रागावलेलाच दिसतो. सदैव खाली मान घालून डोलवत, झटके देत, केस उडवत कुणावर तरी चष्म्यातून रोखून पाहत, दात-ओठ खात बोलत असतो. परवा ‘हॉटलाइन’वर हिंदुस्तानच्या वझीर-ए-आझमना ‘हे पुस्तक मिळेल का विचारले, तर ते म्हणाले चर्चा फक्त पीओके अन् दहशतवादावरच होईल. अन् या पुस्तकाच्या लेखकाचं नाव घ्याल, तर मग चर्चेचे सर्व दरवाजेच बंद होतील,’ असा निर्वाणीचा इशारा देऊन त्यांनी फोन आपटला. त्यांच्या डोक्यात या संपादक-नेत्याविषयी फारच राग असावा. त्यामुळेच मला त्या ‘हॉटलाइन’चाही अक्षरशः हॉट्ट चटका बसला. या लेखकाचा खूपच राग असावा. आता हे पुस्तक मिळवण्यासाठी घुसखोरांना पाठवावं लागेल.
पाकिस्तानी लष्करप्रमुख :
प्यारे हमवतनों, पाक फ़ौज एक मुस्तहक्म, प्रोफेशनल और अपनी जिम्मेदारियों से बख़ूबी वाक़िफ़ इदारा है। हम हर आंतरी और बाहरी ख़तरे से मुल्क की हिफाज़त के लिए हर वक़्त तैयार हैं। क़ौमी सलामती, इस्तेहकाम और अमन हमारे लिए सबसे पहली तरजीह है। आज हम एक अहम मोड़ पर खड़े हैं। हिंदुस्ताननं ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे आपल्यावर युद्ध लादलं. पण आपण त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. आपण काश्मीरवासीयांना नरकात ढकललं आहे. हिंदुस्तानमधील कुणा हिंदुत्ववादी पक्षाच्या संपादक नेत्यानं ‘नरकातील स्वर्ग’ असं पुस्तक लिहिल्याचं समजतंय. त्यांनी नरकात स्वर्ग कसा काय शोधला बुवा. आता आपल्यावर हिंदुस्ताननं केलेल्या हल्ल्यामुळे आपल्या बऱ्याच ठिकाणी नरकच निर्माण झालाय. तेथील शोकसंतप्त जनतेला नरकात स्वर्ग शोधण्यासाठी या पुस्तकाचा निश्चित उपयोग होईल असे वाटते. तेवढीच त्यांची खदखद शमेल. आम्हीही हिंदुस्तानला नरकयातना देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडे ‘नरकातही स्वर्ग’ शोधण्याचे कौशल्य आहे. आमच्या लोकांकडे स्वर्गाचा नरक करण्याचे कौशल्य आहे.
दहशतवाद्यांचा म्होरक्या :
(कण्हत) अरे कुणी आहे का रे तिकडे? मला जरा हात द्या. कंबरडं पार मोडून गेलंय. त्या दिवसांपासून कानाचे दडे बसले आहेत. अन् तरीही सर्वत्र स्फोटांचे भास मला होत आहेत. या हिंदुस्थाननं काही शिल्लक ठेवलं नाय. मुजफ्फराबाद, कोटली, भिंबर, सियालकोट, मुरीदके, बहावलपूर येथील सगळे कॅम्प उद्ध्वस्त केलेत. मी वाचलो ही खुदाची खैरच म्हणायची. माझे अनेक सहकारी शहीद होऊन स्वर्गात गेले आहेत. मी मात्र या नरकात खितपत पडलोय. आता माझ्यासाठीही स्वर्गाचे दार उघडावे. अन्यथा ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक मिळवून वाचावे लागेल. या यातनांतून राहत मिळाली तर बरे. पाकिस्तानने एवढे ड्रोन-मिसाईल हिंदुस्थानात फेकले. मात्र, हिंदुस्थानने ते फुलांप्रमाणे झेलले अन् चुरगाळून टाकले. आम्ही या हिंदुस्थानचा नरक करण्यासाठी झटलो. पण जमले नाही. आता आमच्या नरकातच स्वर्ग शोधण्याचे प्राक्तनात असावे.
तुरुंगातील पाकचे माजी पंतप्रधान :
हे ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक फक्त मलाच उपयोगी पडेल असे वाटते. कारण संबंधित लेखकाने तुरुंगात असताना हे ते लिहिल्याचे समजते. त्यामुळे मला सध्या तुरुंगात ते उपयोगी पडू शकेल. आता नको नको त्या नरकयातना मी भोगत आहे. त्यात ‘स्वर्ग’ कसा शोधायचा, हे समजेल..
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.