
Shivsena News: शाकाहारीसाठी प्रसिद्ध असलेल्या एखाद्या हॉटेलात जर कुणी बिर्याणी विकण्याचा खटाटोप केला, तर मूळ शाकाहारी मंडळी तेथे बिर्याणी विकली जाते यामुळे जाणार नाहीत. तसेच शाकाहारी हॉटेलात बिर्याणी चव चाखावी, असे मांसाहारी ग्राहकांनाही आवडणार नाही. थोडक्यात शाकाहारी हॉटेलात मांसाहारी पदार्थ विकण्याचा प्रयत्न कसा यशस्वी होणार? उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबाबत असाच प्रकार घडताना दिसत आहे. ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेचा सर्वधर्मभाव झाल्याचे लोकांना रूचले नाही.
नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला. विधानसभा अध्यक्षही बिनविरोध निवडले गेले. सभागृहात महायुती भक्कम आहे तर महाविकास आघाडीकडे अवघे 46आमदार. विरोधीपक्षनेता बनण्यासाठी जितके म्हणून संख्याबळ लागते तितकेही कोणत्याच पक्षाकडे नाही. महाविकास आघाडीत (MVA) सर्वाधिक आमदार अर्थात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आहेत. ते म्हणजे 20. म्हणजे हे 46जण पुढील पाचवर्षे विरोधकांचा किल्ला लढविणार आहेत. कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेसपेक्षा येथे शिवसेनेचा विचार करावा लागेल. या पक्षाची पुढील व्यूहरचना कशी असेल? ते कोणता कार्यक्रम हाती घेतात. ते बलाढ्य अशा भाजपबरोबरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाशी कसा लढा देतात हे पहावे लागणार आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना निवडणुकीत काहीतरी चमत्कार करून दाखविल असे वाटले होते. मात्र शिंदे भारी पडले. पुन्हा गड राखत मीच खरा पक्षप्रमुख आहे हे त्यांनी दाखवून दिले. जर ते पुन्हा मुख्यमंत्री बनले असते तर त्यांचा पक्ष अधिक बळकट होत गेला असता. शेवटी मुख्यमंत्रिपदाला जे वलय असते त्या तुलनेत इतर पदाला नसते. राज्याचा प्रमुख म्हणून निश्चितच प्रभाव पडत असतो. त्याचा फायदा शिंदे यांच्या पक्षाला झाला हे नाकारूनही चालणार नाही. निवडणूक होऊन गेली. निकाल लागले. आता पुढे काय? शिवसेनेचे काय होणार असे प्रश्न आता पुढे विचारले जातील. त्याची उत्तरे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेत्यांना द्यावीही लागतील.
ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी एकेकाळी सभागृह खूपच गाजविले होते. एकटे भुजबळ भल्याभल्या नेत्यांना पुरून उरले होते. भूखंडाचे श्रीखंड हा मुद्दा घेऊन त्यांनी सभागृह दणाणून सोडले होते. भुजबळ (Chhagan Bhujbal) हे नेहमीच आक्रमक नेते म्हणून ओळखले गेले. आजही त्यांची तीच ओळख आहे. ‘सुंदर मुंबई, मराठी मुंबई’साठी आग्रही राहणारे, प्रसंगी रस्त्यावर उतरणाऱ्या भुजबळांनी या वयातही आरक्षणाच्या मुद्यावरूनही मैदान गाजविले. कोणत्याही नेत्याला शिंगावर घेण्याची जी धमक लागते ना ती त्यांच्यात आहे. तत्कालीन शिवसेनेचे नेते कमीअधिक प्रमाणात असेच होते पण, भुजबळ अव्वल होते. शिवसेनेची खऱ्या अर्थाने मुलुखमैदानी तोफ होती. शिवसेनेला यशाच्या शिखरावर पोहचविण्यात त्यांचाही वाटा होता हे नाकारून चालणार नाही.
हे सर्व सांगण्याचे कारण असे की आज उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने निवडणुकीत सपाटून मार खाल्ला आहे. गड कोसळले. तेथे पुन्हा पक्ष बांधण्याचे आव्हान आहे. पक्ष पुन्हा कसा उभा करायचा आणि विधानसभेवर भगवा कसा फडकावायचा याबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील. शेवटी कोणापेक्षाही पक्षाची चिंता त्यांनाच अधिक असणार हे आलेच. मुद्दा असा आहे की विधानसभेत शिवसेनेची (Shivsena) संख्या नगण्य असताना भुजबळांनी जो आवाज बुलंद केला. महाराष्ट्रात पक्षाचे नाव घरात घरात पोहचविले तसे पेटून उठणारे नेते पुन्हा पक्षात व्हायला हवेत.
राजकारणात चढ उतार येत असतात. कधी विजयश्री मिळतो तर कधी दारूण पराभव होतो. फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा राखेतून उठून उंच भरारीही घ्यावी लागले. त्यावेळी एकटे भुजबळ भारी पडत होते. आज शिवसेनेकडे त्यांच्या भाषेत 20 वाघ आहेत. त्यांनी विरोधीपक्षाची भूमिका प्रामाणिकपणे बजावली. लोकांचा विश्र्वास संपादन करून शकले तर यश मिळूही शकते. मुळात पक्षाची बांधणीच खालपासून करावी लागणार आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. शिवसेना मराठी माणसांची आहे.ती ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्काराचा करणारी आहे की सर्वधर्मीय आहे. याबाबत ठोस निर्णय घ्यावा लागणार आहे. पक्षाला संघर्ष किंवा निवडणुका नवीन नाहीत. जय-पराभव या पक्षाच्या प्रमुखांनी आणि कार्यकर्त्यांनी पचविले आहेत. पण, मतदारांसमोर जाताना बलाढ्य अशा भाजपशी दोन हात करताना त्यांना पुन्हा ओळख सिद्ध करावी लागेल. शिवसेनेचे पुढील पाच व्हीजन ठरवावे लागेल. राज्यातील 11 कोटी लोकांसमोर जाताना त्यांना विश्वास देताना आमची ही स्पष्ट भूमिका आहे. आम्ही या मुद्द्यापासून कदापी दूर जाणार नाही हे सांगावे लागेल.
जर मनसे (MNS) ला दिशा नाही तर आज शिवसेनेची वाटचाल तरी कुठे एका दिशेने सुरू आहे. पक्ष गोंधळलेला दिसतो आहे. एसीत बसून कोणताही पक्ष बाळसे धरू शकत नाही हे कटूसत्य आहे. राजकारण काही असले तरी महाराष्ट्र सुजलाम, सुफलाम अद्याप झालेला नाही. प्रत्येकाच्या घरावर सोन्याची कौले आलेली नाही. युवकांच्या हाताला काम नाही. शेतकरी आत्महत्या थांबल्या नाहीत.उद्योग परराज्यात जाता आहेत आदी प्रश्न आहेत त्यासाठी शिवसेनेला लढावं लागणार आहे. मुंबईसह गडाची डागडुजी करावी लागणार आहे अन्यथा एक एक बुरूज ढासळल्याशिवाय राहाणार नाहीत.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.