Mumbai News : आगामी काळात होत असलेली विधान परिषद निवडणूक बिनविरोध होईल, असे वाटत होते. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कोणीच माघार घेतली नाही. त्यामुळे आता ही निवडणूक होणार हे निश्चित झाले आहे. या निवडणुकीसाठी गोपनीय पद्धतीने मतदान होणार असल्याने सर्वच पक्षाच्या उमेदवाराला निवडणूक जिंकण्याची समान संधी असणार आहे.
त्यासोबतच पाच उमेदवाराना दुसऱ्या पक्षाची मते फोडून विजय मिळवावा लागणार असल्याची माहिती एका वरिष्ठ राजकीय विश्लेषकाने 'सरकारनामा'शी बोलताना दिली. त्यामुळे आता कुठल्या उमेदवारांच्या कुंडलीत पंचताराकिंत योग वास्तव्यात आहेत, त्यांनाच विजयाची संधी मिळणार आहे. (Vidhan Parishad Election News )
या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस (Congress) पक्ष सोडला तर सर्वच पक्षाला कोटा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्याच्या मतांवर अवलंबून राहावे लागणार आहे. केवळ काँग्रेसकडे ३७ मते आहेत. त्यांच्या एक उमेदवाराला निवडून येण्यासाठी 23 मतांचा कोटा लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यापुढे कसलीच अडचण नसणार आहे.
त्यामुळे उर्वरित 14 मते कोणाला देणार याची उत्सुकता येत्या काळात असणार आहे. त्याशिवाय त्यांची पाहिल्या पसंतीची मते कोणाला देणार यावर जय-पराजयाचे गणित बदलू शकते. त्यामुळे काँग्रेसची मते गेमचेंजर ठरू शकतात. ही मते ते कॊणाच्या पारड्यात टाकणार हे समजण्यासाठी आगामी काळात होणारे मतदान व मतमोजणीची वाट पहावी लागणार आहे.
दुसरीकडे या निवडणुकीसाठी गुप्त मतदान पद्धती असणार आहे. त्यामुळे काँग्रेस सोडले तर इतर पाच पक्षांना निवडणूक जिंकण्यासाठी मतांची जोडणी करावी लागणार आहे. महायुतीमधील तीन पक्षांना साधारण 12 मतांची जुळवणी करावी लागणार आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधील शिवसेना व राष्ट्रवादीची काँग्रेस शरद पवार गटाला अतिरिक्त मतांची जोडणी करावी लागणार आहे.
या निवडणूक रिंगणात भाजपचे (Bjp) पाच, शिवसेना शिंदे गटाचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन तर काँग्रेस एक, शेकाप एक व शिवसेना ठाकरे गटाचा एक उमेदवार रिंगणात आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपकडे 104 मतांचा कोटा असल्याने त्यांच्या चार जागा सहज निवडून येऊ शकतात पाचव्या जागेसाठी त्यांना जवळपास 9 मतांची गरज असणार आहे.
दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन उमेदवार रिंगणात उतरविण्यात आले आहेत. त्यांच्याकडून राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे हे दोघे निवडणूक लढणार आहेत. त्यांच्याकडे 39 मते आहेत त्यांना अजून सात मतांची आवश्यकता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे. त्यांच्या दोन जागा निवडून येण्यासाठी 46 मतांची आवश्यकता आहे. मात्र, त्यांच्याकडे 40 स्वतःची तर 10 अपक्षांची मते असल्याचा दावा आहे. त्यामुळे त्यांना ही मते मिळाली तर इतर मतांची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे या दोन जागा जिंकण्यासाठी त्यांना काळजी घ्यावी लागणार आहे.
महाविकास आघाडीतील शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाची एक जागा निवडून येण्यासाठी 23 मते लागणार आहेत. त्यांच्याकडे 15 मते असल्याने आठ मतांची आवश्यकता असणार आहे. तर शेकापच्या जयंत पाटील यांना 23 मते आवश्यक आहेत. त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 तर शेकाप 1, माकप 2, अपक्ष एक असे 16 मते आहेत. त्यांना अजून 7 मतांची आवशक्यता असणार आहे.
ही सर्व आकडेवारी पाहिली तर काँग्रेससोडता इतर पक्षांना जुळवा-जुळव करावी लागणार आहे. त्यामुळे या पाच पक्षांत मोठी चुरस येत्या काळात पहावयास मिळणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांना जादा मतांची जोडणी करावी लागणार असल्याने या परिस्थितीत सर्वच पक्षांना विजयाची समान संधी असणार आहे.
काँग्रेसचा उमेदवार पडणार नाही
सर्वच पक्षांकडून दोन वर्षांपूर्वीच्या निवडणुकीची पुनरावर्ती झाली तर काँग्रेसला पराभवाचा धक्का बसू शकतो, असे काही जणांनी मते व्यक्त केली आहेत. मात्र, गणिती आकडेमोड केली तर काँग्रेस कुठलीच रिस्क घेईल, असे वाटत नाही. ठरलेला कोटा ते उमेदवार प्रज्ञा सातव यांच्या पारड्यात टाकतील. तर उर्वरित मते ते शिवसेना ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांना देतील, अशी अपेक्षा आहे. त्यासोबतच दुसऱ्या क्रमांकाची सर्व मते ते शिवसेनेच्या नार्वेकरांना देतील, त्यामुळे त्यांच्यासॊबत नार्वेकर देखील विजयी होतील, अशी शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.