Friendship Day Special : अपराजित शरद पवारांनी पहिली निवडणूक माझ्याविरोधात जिंकली होती...

Sharad Pawar | Vitthal Maniyar | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांचे कॉलेजपासून सोबत असलेले मित्र विठ्ठल मणियार यांची मैत्री जगजाहीर आहे. मणियार यांनी उलगडले अज्ञात शरद पवार.
Sharad Pawar | Vitthal Maniyar
Sharad Pawar | Vitthal ManiyarSarkarnama
Published on
Updated on

- विठ्ठल मणियार

1958 साली मी आणि साहेब आम्ही पहिल्यांदा भेटलो. शहरी आणि विशेषतः पुणेरी भागातील मी आणि बारामतीच्या छोट्या भागातून आलेले शरद पवार साहेब. वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थी प्रतिनिधीसाठी निवडणूक जाहीर झाली. मी पुण्यातला आणि बरेचसे विद्यार्थीही ओळखीचे म्हणून आत्मविश्वासाने निवडणूक लढवण्याचे ठरवले. प्रतिस्पर्धी विद्यार्थ्यांचे नाव होते 'शरद पवार'. मी फारसा प्रचार केला नाही किंबहुना मला तो करायची गरज वाटली नाही. शरद पवार साहेब मात्र प्रत्येकाकडे जाऊन 'विद्यार्थ्यांचे प्रश्न, गरजा' यावर बोलत होते.

निवडणूक झाली आणि तब्बल ८० टक्के मतं मिळवून साहेब जिंकले. नाही म्हटलं तरी त्या नकळत्या वयात माझ्या मनात पराभवाची सल होतीच पण साहेब मात्र स्वतःहून बोलायला आले. 'निवडणूक संपली, आता काम करू म्हणाले' आणि तिथून जुळलेल्या तारा आजही तितक्याच घट्ट गुंफल्या गेल्यात. आता 65-66 वर्षांनी मागे वळून बघितल्यावर मला वाटतं जो कोणत्याही निवडणुकीत हरला नाही अशा व्यक्तीने पहिली निवडणूक माझ्या विरोधात जिंकली. त्या अर्थाने माझं नाव इतिहासात कोरलं गेलं. 

साहेबांचे नेतृत्वगुण, लोकांविषयीची कणव कॉलेजमध्येच जाणवली होती. अगदी आमचे कॉलेज नाही तर इतर कॉलेजमध्येसुद्धा त्यांचे 'पवार पॅनल' जिंकून आले होते. पुढे आमदार आणि मंत्री झाल्यावर त्यांच्यासोबत फक्त महाराष्ट्र नाही तर अगदी जग पालथे घेतले. पण याही दिवसात त्यांची शिस्त, वेळ पाळण्याची सवय अनेक गोष्टी शिकवून गेली. दौऱ्याच्या गाडीत बसले की गामा (त्यांचे चालक) यांना सांगतात 'जरा भीमसेन जोशींची भजनसंध्या लाव'. काही मिनिटात त्यांची समाधी लागते, बोटं ताल धरतात आणि पुढच्या कार्यक्रमासाठी ते पुन्हा ताजेतवाने होतात. 

Sharad Pawar | Vitthal Maniyar
Friendship Day : जगात भारी राजकारणातील यारी ! कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो

आम्ही आयुष्यात अनेक प्रसंग एकत्र अनुभवले. पण त्यांचा कॅन्सर विरोधातला प्रवास मी कधीही विसरणार नाही. घाबरणं तर दूरच पण स्थितप्रज्ञ असणं म्हणजे काय हेच मी तेव्हा अनुभवलं. बायोप्सी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर क्षणात त्यांनी ऑपरेशन कधी करायचं असं डॉक्टरांना विचारलं. त्यांनी 'उद्या करू' म्हटल्यावर 'आज का नाही' असा साहेबांचा प्रश्न होता. त्या काळात त्यांना खूप वेदना व्हायच्या. कृषीमंत्री असताना त्यांची रेडिएशन थेरपीही सुरु होती. जेवण हा एक वेदनादायी कार्यक्रम असायचा. तोंडात जखम, त्यातून रक्त, प्रचंड वेदना बघून अस्वस्थ व्हायला व्हायचं पण साहेब तितक्याच शांतपणे ते सहन करत काम करायचे.

Sharad Pawar | Vitthal Maniyar
Friendship Day : "चल लाल, पिक्चर बघायला जावू"; निवडणूक हरलेले वाजपेयी अडवाणींना घेऊन पिक्चरला गेलेले...

साहेबांनी आजाराचे लाड केले नाही आणि म्हणूनच तो त्यांच्यासोबत जास्त काळ टिकला नाही असेच मी म्हणेन. आज इतक्या वर्षांनी आमच्या मैत्रीकडे बघताना शेकडो आठवणी मनात रुंजी घालतात. मैत्रीला 50 वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांनी जाहीर केलं, आपण सगळ्या मित्रांनी वर्षातले 2 दिवस भेटायचं. बाहेरचे सगळे ताण -तणाव विसरायचे आणि फक्त मैत्री जगायची. आता आम्ही कधी कोकण तर कधी इतर ठिकाणी भेटतो. दोन दिवस धमाल करतो आणि आपापल्या जगात परततो. हे मैत्र आयुष्यं उजळवणारं आहे. आताशा मी रोज प्रार्थना करतो की 'त्यांचं काम असच अखंड सुरु राहावं. माझं उर्वरित आयुष्य साहेबांना मिळावं'.

(शब्दांकन - नेहा सराफ)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com