Rajesh Shah : शिवसेना कोणतीही असू द्या, राजेश शाह यांच्यासारख्या कलंकित नेत्यांना 'अच्छे दिन'!

Shivsena On Rajesh Shah : गुंड, गुन्हेगार, भ्रष्ट नेते, कार्यकर्ते प्रत्येक पक्षाला हवे असतात. त्यांची शिवराळ भाषा चालते. सभागृहात आई-बहिणींचा उद्धार केलेलाही चालतो. कलंकित नेत्यांच्या पाठिशी पक्ष कसे उभे असतात, हे राजेश शाह यांच्याकडे पाहिले तर लक्षात येते.
rajesh shah
rajesh shah sarkarnama
Published on
Updated on

कोणताही नेता जोपर्यंत एखाद्या पक्षात असतो, तोपर्यंत त्याचा नेहमीच पक्षाचे प्रमुख उदोउदो करीत असतात. त्यांचे राजकारण, चुका, गुन्हे पोटात घालत संरक्षण देतात. इतकेच नव्हे तर त्यांची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी पक्षाचे पोपट सरसावतात.

चुकीवर कसे पांघरून घातले जाते, याची शेकडो उदाहरणे देता येतील. विशेषत: दोन्ही शिवसेना ( Shivsena ) पक्ष सर्वाधिक पुढे असतात. त्यानंतर इतर पक्षही कमीअधिक सारखेच.

एकेकाळी गांधीजींचे पुतळे उखडून टाकण्याची भाषा करणारे ज्येष्ठ नेते, छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांच्या पाठीशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कसे उभे राहिले होते, हे राज्याने पाहिलेच आहे. भ्रष्टाचारप्रकरणात शिवसेनेचे नेते जाळ्यात अडकलेले असतानाही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंना बाळासाहेबांनी कसे लक्ष्य केले होते, हे ही आठवा. हल्लीचे नेते त्यांची भाषा, त्यांचे गुन्हे, भ्रष्टाचार आदी सर्व बाबतीत कलंकित नेत्यांचे कसे समर्थन केले जाते. ते कसे साधुसंत आहेत, हे दाखविण्याचा जो प्रयत्न केला जात आहे. त्यामध्ये आश्चर्य वाटण्याचे कारणही नाही.

गेल्या दीड-दोन वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणाची घडीच विस्कटली. फोडाफोडी झाली. पक्ष फुटले. त्यानंतर आरोप-प्रत्यारोप होऊ लागले. मुख्यमंत्री शिंदेंना 'मिंदे' म्हणून उद्धव ठाकरेंची शिवसेना हिणवून लागली. बाळासाहेब असताना शिवसेना अनेकदा फुटली. जो नेता फुटायचा, त्याला शिवसेना नामोहरण करून सोडत असे. छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे, गणेश नाईक असतील किंवा एकनाथ शिंदे. शिवसेना (ठाकरे) त्यांच्या स्टाईलने ठाकरी भाषेत समाचार घेत असते. हे सर्वनेते जोपर्यंत शिवसेनेत होते, तोपर्यंत त्यांची आरती ओवाळली जात असे. 'मातोश्री'च्या 'गुडबुक'मध्येही ते असायचे. हे नेते कधीच शिवसेना सोडणार नाहीत, असे भल्याभल्यांना वाटायचे. पण, राजकारणात उद्याचे काही खरे नसते, हे ही तितकेच खरे.

सध्या राज्यात ‘वरळी हिट अँड रन’ प्रकरण जोरात गाजते आहे. ठाकरेंची शिवसेना या मुद्यावरून आक्रमक झाली आहे. या घटनेतील आरोपी राजेश शाह, त्याचा मुलगा मिहीर याच्यावर तुटून पडत आहे. त्याला कारणही असे आहे की शाह हे शिवसेना (शिंदे) पक्षाचे उपनेते आहेत. या घटनेनंतर शाह यांची पदावरून उचलबांगडीही करण्यात आली आहे. मुंबईत जेथे ‘हिट अँड रन’ प्रकरण घडले त्या मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे आहेत.

मिहीर यांनी ज्यापद्धतीने दारूच्या नशेत बेदरकारपणे गाडी चालविली. कावेरी नाखवा या महिलेचा निर्दयपणे बळी घेतला, हा प्रकार संतापजनकच आहे. आरोपीला कठोर शासन व्हायला हवे. दारूचे दोन घोट पोटात गेले की मस्ती चढते. ही मस्ती पोलिसांनी उतरावयला हवी. या प्रकरणानंतर राजेश शाह यांच्या कृष्णकृत्याविषयी शिवसेना जे काही सांगत आहे, ते धक्कादायक आहे.

कोण आहे राजेश शाह!

शाह हे मुळचे पालघरजवळील माहिमचा रहिवाशी. त्याच्या वडिलांचे तेथे किराणामालाचे दुकान होते. त्याचे शिक्षणही माहिममधील भुवनेश कीर्तने महाविद्यालयात झाले. पुढे राजेश मुंबईत आला. बड्या मंडळींच्या संपर्कात गेला. वडराईला जे चांदीप्रकरण झाले, त्यामध्ये ते फरार आरोपी होते. पुढे त्याची निर्दोष मुक्तताही झाली. सध्या किराणा दुकानदाराचा मुलगा कोट्यधीश होतो. राजकारणात काय जातो. एका रात्रीत नेता काय बनतो, हा त्यांचा प्रवास थक्क करणारच आहे. त्याच्या झटपट यशात बरेच काही दडले आहे का, याचा शोध पोलिस घेतीलच.

rajesh shah
Madhukarrao Chavan : धोतर, शुभ्र सदरा..! 5 वेळा आमदार, एकदा मंत्री राहिलेले 87 वर्षीय अण्णा विधानभवनात, आधार न घेता पायऱ्या उतरले

खासदार संजय राऊत तसेच त्यांच्या पक्षाचे नेते राजेश शाहा यांच्याविषयी आज जे काही सांगत आहेत, बोलत आहेत, कठोर शासन करण्याची मागणी करीत आहेत. त्याची कुंडली बाहेर काढत आहेत, याचे आश्‍चर्य वाटते. कारण, हेच राजेश शाह शिवसेनेचा (फुटीच्या अगोदर) पालघरचा जिल्हाप्रमुख होते. शाह यांच्या अगोदरचे जिल्हाप्रमुख व ज्येष्ठ नेते उदयबंधू पाटील यांनी शिवसेनेला एका उंचीवर नेवून ठेवले होते. आमदार, खासदार, पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीवर भगवा फडविला होता. ते काही कारणाने बाजूला गेले. पुढे उत्तम पिंपळे, त्यानंतर राजेश शाह यांना थेट जिल्हा प्रमुखपदावर बसविले. वास्तविक ज्या शिवसैनिकांनी रक्ताचे पाणी करून शिवसेना मोठी केली होती. त्यांना संधी न देता ज्यांचा पक्षाशी काहीही संबंध नसलेल्या शाह यांच्यासारख्या व्यक्तीला इतके मोठे पद मिळाले होते. त्याच्या निवडीनंतर पक्षात असंतोष खदखदत होता.

शाह यांच्या कार्यकाळात शिवसेनेला म्हणावे तसे यशही आले नाही. पण, तत्कालीन शिवसेनेच्या एका वजनदार नेत्याचा वरदहस्त असल्याने त्याला हलविण्याचे कोणी धाडस करीत नव्हते. पुढे खूपच तक्रारी होऊ लागल्याने शाह यांना हटवून वैभव संखेंना जिल्हाप्रमुख केले. आज विकास मोरे जिल्ह्याचे प्रमुख आहेत.

rajesh shah
MLC Election 2024 : सत्तेत असलेल्या 'मविआ'ला फडणवीसांनी लावला होता सुरुंग, आतातर भाजप सत्तेत आहे..!

हा सर्व इतिहास सांगण्याचे कारण असे की ठाकरेंची शिवसेना आज राजेश शाह यांच्याविरोधात आक्रोश करीत आहे. त्यांना यापूर्वी आपल्याच पक्षाचे पालघरचे शाह हे जिल्हा प्रमुख होते, याचा विसर पडत आहे. जर शाहाची पार्श्वभूमी माहीत होती, तर त्याला पक्षाच्या इतक्या मोठ्या पदावर का ठेवले होते, त्याची नेमणूक का रद्द केली नाही, तो 'टाडा'तील आरोपी होता, हे माहीत नव्हते का? हा प्रश्‍न पडतो. शाह यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी, याबाबत दुमत असण्याचे कारणही नाही. पण, जोपर्यंत एखादा नेता आपल्या सोयीचा असतो, तोपर्यंत तो प्रिय असतो, असे म्हणायचे का? पुढे एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि राजेश शाह हे त्यांच्या पक्षात गेले. तेथेही त्याला 'अच्छे दिन' आले. थेट उपनेता बनले. साधे शाखाप्रमुख होण्यासाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांना वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते. हल्ली मात्र पैसा, गाड्या, बंगले असले की थेट नेता, उपनेता बनता येते. पैसेवाल्यांना ते सोपे असते. राजेश शाह यांचा प्रवासही असाच आहे.

हे झाले शिवसेनेचे. सर्वच पक्षांबाबत असेच चित्र आहे. कोणताही पक्ष जोपर्यंत एकसंध असतो, तोपर्यंत काही अडचणी नसतात. नेते फुटले, पक्ष फुटला की मात्र जो बंडखोरी करतो, त्याला लक्ष्य केले जाते. त्याचे वाभाडे काढले जातात. पूर्वी याच नेत्याने पक्षासाठी काय केले, याचाही विसर पडतो. फुटीनंतर मात्र नेत्यांना मूळ पक्षवाले हवेतसे वाकविण्याचा प्रयत्न करतात. प्रतिमा मलीन केली जाते. जुनी प्रकरणे उकरून काढतात. हे राजकारणाचे चित्र आहे. आता ते बदलने शक्यही नाही. गुंड, गुन्हेगार, भ्रष्टाचारी नेते, कार्यकर्ते प्रत्येक पक्षाला हवे असतात. त्याची शिवराळ भाषा चालते. सभागृहात आई-बहिणींचा उद्धार केलेलाही चालतो. कलंकीत नेत्यांच्या पाठीशी प्रत्येक पक्ष कसे उभे असतात, हे राजेश शाह यांच्याकडे पाहिले तर लक्षात येते.

( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com