शरद प्रधान
Kumbh Mela News: प्रयागराज येथील बहुप्रतीक्षित कुंभमेळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. नववर्ष २०२५ मधील अध्यात्मिक क्षेत्रातील ही मोठी घटना असेल. येथे दर बारा वर्षांनी दिव्य अध्यात्मिक अनुभूती घेण्यासाठी जगातील सर्वांत भव्य असा मेळावा भरतो. हा मेळा अतिभव्य दिव्य आणि अविस्मरणीय करण्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विशेष भर आहे. गतकाळात ज्या ज्या मुख्यमंत्र्यांच्या काळात कुंभमेळे झाले आहेत, त्या सर्वांपेक्षा आपले वेगळेपण ठसले जावे, यावर योगींचा भर आहे.
फक्त विविध क्षेत्रांतून आपली प्रशंसा व्हावी, हा त्यामागचा योगींचा हेतू अजिबात नाही. सध्याच्या सत्ताधारी भाजपच्या नेत्यांमध्ये सर्वश्रेष्ठ शक्तिमान हिंदुत्ववादी जननायक बनण्यासाठी आणि आपली स्थिती अधिकच बळकट करून आपल्या ताब्यात आणखी हुकुमाचे पत्ते राखण्यासाठी योगींचे हे सर्व प्रयत्न सुरू आहेत.
प्रतिस्पर्धी, राजकीय विरोधकांची योगींना चांगली कल्पना आहे. योगी हे भविष्यात दिल्लीच्या सिंहासनासाठीचा प्रबळ प्रतिस्पर्धी-दावेदार बनू नयेत, असे त्यांच्या विरोधकांना वाटते. त्यांच्यावर मात करण्यासाठी महा कुंभमेळ्याची संधी योगींपुढे आयती आली आहे.
२०२४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशमध्ये मोठा फटका बसला होता. हे अपयश योगींच्या झोळीत ढकलण्याचे सर्वतोपरी प्रयत्न त्यांच्या हितशत्रूंनी केले. मात्र, त्याला तोंड देताना दोन महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशात झालेल्या पोटनिवडणुकीत 9 पैकी 7 जागांवर विजय मिळवून योगी ‘लिटमस टेस्ट’ उत्तीर्ण झाले.
आपल्या पक्षांतर्गत विरोधकांशी झालेल्या संघर्षात योगी विजयी झाले आहेत, यात कुठलीही शंका नाही. त्यामुळे आगामी कुंभमेळ्याबाबत योगी कोणतीही जोखीम पत्करण्यास तयार नाहीत. यात योगींकडून कोणतीही चूक झाली तर त्यांना उत्तर प्रदेशच्या राजकारणातून हटवून दिल्लीच्या राजकारणात ढकलण्यासाठी इच्छुक असलेल्यांची सरशी होईल आणि योगी राजकीयदृष्ट्या मोठ्या अडचणीत येतील.
कुंभमेळ्यातील यश आपल्याला सर्व प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकण्यास नक्की मदत करेल आणि सर्वशक्तिमान हिंदू नेत्याचे बिरूद आपल्याला जनतेकडून बहाल होईल, याबद्दल योगींना ठाम खात्री आहे. त्यामुळे त्यांचे वारंवार होणारे प्रयागराज दौरे, विविध हिंदू साधू-संतांचा केलेला आदर-सत्कार, त्यांच्यासाठी काहीही करण्याची त्यांनी दर्शविलेली तयारी, या हेतूने असल्याने त्यात आश्चर्य अथवा वावगे वाटण्याचे कारण नाही.
अखेर प्रयागराजसारख्या हिंदूसाठी पवित्र असलेल्या संगम तीर्थक्षेत्रावर एकत्र येणाऱ्या विविध हिंदू आखाडे, मठ, आश्रमांतील लाखो साधू-संत, शिष्य आणि भाविकांचे मन जिंकण्याची ही सुसंधीच आहे. योगी ज्या नाथ पंथाचे आहेत त्या नाथ पंथीयांनी गंगा-यमुना-सरस्वती संगमाच्या तीरावरील एक लाख ४६ हजारांच्या तंबूंच्या छावणीत सर्वप्रथम आपली छावणी उभारली आहे. योगींनी सुमारे दोन वर्षे आधीच या कुंभमेळ्याच्या तयारीस प्रारंभ केला.
पूर्वीच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी असे केले नव्हते. तरीही अनेक महत्त्वाची कामे अजून पूर्ण झालेली नाहीच. उदाहरणार्थ लखनौ आणि प्रयागराजदरम्यानचा अत्यंत खराब रस्ता अद्याप नीट झाला नाही. त्याची चिंता प्रशासनाला सतावत आहे.
आपण कुंभमेळ्यासाठी काय काय केले हे जगाला सांगण्यात योगी कोणतीही कसूर ठेवत नाहीयेत. याआधी असे कुणीही असे केले नव्हते, हे सांगण्यासही ते विसरत नाहीत. मात्र, अनेक बाबतीत ते खरेही आहे. या कुंभमेळ्यासाठी सहा हजार ३०० कोटींचा घसघशीत निधीची तरतूद योगींनी राज्याच्या अर्थसंकल्पात केली. फक्त एवढेच नाही तर कुंभमेळ्याचे क्षेत्रही चार हजार हेक्टरपर्यंतही वाढविण्यात आले आहे.
२०१९ मध्ये याच ठिकाणी झालेल्या अर्ध कुंभमेळ्यापेक्षा यंदाचा हा महाकुंभमेळा अत्यंत भव्यदिव्य ठरावा, यासाठी योगींनी हुशार, कार्यक्षम आणि अनुभवी प्रशासकीय (आयएएस) अधिकाऱ्यांची नियुक्ती या कामासाठी केली आहे.
२०१९ च्या कुंभमेळ्याचे व्यवस्थापन विजय किरण आनंद यांनी केले होते. ते सक्षम, उच्च कार्यक्षमता असलेल्या मोजक्या नोकरशहांपैकी एक म्हणून ओळखले जातात. त्यांना पुन्हा या महाकुंभमेळ्याची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे योगींच्या अपेक्षेपेक्षाही अधिक गतिमान पद्धतीने ही कामे प्रभावीपणे होतील, यात शंकाच नाही.
पायाभूत सुविधा, त्यासाठीचे दळणवळण आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या सक्षम अधिकाऱ्यांकडे सोपवल्या जात असताना, योगी आदित्यनाथांचे प्रसिद्धीयंत्रणेवर बारकाईने लक्ष आहे. त्यांनी उत्तर प्रदेशसह देशभरात कुंभमेळ्यासाठी मोठी प्रसिद्धीमोहीम सुरू केली आहे. त्यांचे विश्वासू अधिकारी आणि उत्तर प्रदेशच्या माहिती विभागाचे संचालक शिशिर यांच्यावर ही मोहीम सोपवली आहे.
शिशिर यांनी देशातील सर्व प्रमुख शहरांत संबंधित जाहिरात फलक उभारले आहेत. त्यात या कुंभमेळ्यासाठी योगी आदित्यनाथ अंमलात आणत असलेल्या विकासयोजनांची माहिती दिली आहे. देश-विदेशातील वाहिन्या, यू ट्यूब, तसेच अन्य समाजमाध्यमांच्या व्यासपीठावर या कुंभमेळ्याची प्रसिद्धी होत असली तरी आज ज्या प्रमाणात ती केली जात आहे, ती यापूर्वी कधीच झाली नव्हती.
प्रसिद्धीपोटी उत्तर प्रदेशच्या १६०० कोटींच्या वार्षिक तरतुदीशिवाय त्यात आणखी किती निधी खर्च होतो, याचा कुणालाच अंदाज नाही. प्रसिद्धी व्यवस्थापक माध्यमांपर्यंत पोहोचण्यासाठी चौकटीबाहेरचे मार्ग मार्ग अवलंबत आहेत. या हट के प्रसिद्धीमोहिमेचे सर्वांत उल्लेखनीय उदाहरण म्हणजे माहिती संचालक शिशिरी यांनी निवडक माध्यमांना एक उत्कृष्ट पुस्तिका (हँडबुक) देऊ केली आहे.
प्रसारमाध्यमांनी कुंभमेळ्यातील विविध बातम्या, वृत्तांकन कसे करावे याची ती मार्गदर्शिकाच आहे. या पुस्तिकेत केवळ या विषयांवरील सूचना नसून, संबंधित पत्रकार ती बातमी कशी मांडू शकतात, याचे सविस्तर-तपशीलवार मार्गदर्शन करण्यात आले आहे. असे काही याआधी कोणत्याही सरकारच्या कार्यकाळात झाले नव्हते.
या पुस्तिकेद्वारे विविध वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांच्या निवडक संपादकांना पाठवलेल्या ७० सूचनांपैकी काही निवडक उदाहरणे पुढीलप्रमाणे. त्यात एक मथळा देण्यात आला आहे- ‘महाकुंभ : पृथ्वीवरील सर्वात भव्य सोहळ्याची पूर्वतयारी कशी करण्यात आली?’. यानंतरचा तपशील पुढीलप्रमाणे - ‘महाकुंभ २०२५’च्या तयारीस २०२२ मध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली एका महत्त्वपूर्ण बैठकीपासून सुरुवात झाली. तेव्हापासून, महाकुंभसाठीच्या विकासकामांच्या प्रगतीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयागराजला अनेक भेटी दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत होणाऱ्या नियोजित सोहळ्याच्या वृत्तांकनासाठी या पुस्तिकेत तपशीलवार सूचनांनी कळस गाठला आहे. त्यात नमूद केले आहे, की वृत्तांकनासाठी आवश्यक घटक- सरकार-प्रशासनाच्या प्रतिनिधींचा ‘बाईट’, निष्पक्ष प्राधिकरणाच्या अधिकृत प्रतिनिधीचा ‘बाइट’, स्थानिकांचा ‘बाइट’, कुंभमेळ्यासाठी काम करणाऱ्यांचा ‘बाइट’, स्थानिक ज्येष्ठ पत्रकाराचा ‘बाइट’. हे संपूर्ण ‘हँडबुक’ बातमीदाराला संपादकाने दिलेल्या सूचनांची पुस्तिकाच भासते. ही पुस्तिका मोठ्या जनसंपर्क कंपनीने (पीआर एजन्सी) तयार केली आहे, याबद्दल शंकाच नाही.
आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीच्या पहिल्या पर्वात २०१७ मध्ये योगींच्या प्रतिमावर्धनासाठी दोन जनसंपर्क संस्था कार्यरत असल्याचे सर्वविदित आहेच. २०२२ मध्ये योगींनी कारकीर्दीचे दुसरे पर्व सुरू केल्यानंतर लगेचच या प्रसिद्धी मोहिमेने कळस गाठला.
योगींनी सर्व बाबतीत एक आगळी उंची गाठून आपल्या सर्व प्रतिस्पर्ध्यांना निर्णायकरीत्या मागे टाकावे, यासाठी E & ampY सारख्या पीआर कंपन्या योगींच्या प्रसिद्धी व्यवस्थापकांना पूरक मदत करत आहेत अन् हे मोठे लक्ष्य साधण्यासाठी या कुंभमेळ्याचा उपयोग केला जात आहे यात शंका नाही. प्रस्तुत पत्रकाराप्रमाणेच ज्यांनी अनेक दशकांपासून कुंभमेळ्यांचेवृत्तांकन केले आहे, त्यांना हे चांगले ठाऊक आहे, की प्रत्येक कुंभमेळा विविध निकषांवर आधीच्या कुंभमेळ्यापेक्षा वेगळा अन् प्रभावी ठरतो.
योगींनी दर पाच वर्षांनी होणाऱ्या अर्ध कुंभमेळ्याला जेव्हा ‘दिव्य कुंभ’ संबोधण्यास सुरुवात केली, तेव्हाच अर्धे यश मिळविले होते. आता ‘महाकुंभ २०२५’साठी आपण केलेले प्रयत्न आणि मिळविलेल्या यशाची बरोबरीही कोणी करू शकणार नाही यासाठी योगी आदित्यनाथ यांनी कंबर कसली आहे. त्यात ते यशस्वी ठरत आहेत
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.