भाजप प्रवेशानंतर सहा महिन्यांतच मिथुनदांना मिळालं मोठं गिफ्ट

सहा महिन्यांपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेले ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना मानाचं पान देण्यात आले आहे.
Mithun Chakraborty and Narendra Modi
Mithun Chakraborty and Narendra Modi
Published on
Updated on

नवी दिल्ली : भाजपच्या (BJP) राष्ट्रीय कार्यकारिणीतून अनेक बड्या नेत्यांना डच्चू मिळाला आहे. याचवेळी सहा महिन्यांपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेले ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना मानाचं पान देण्यात आले आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीत (BJO National Executive) मिथुनदांचा समावेश करण्यात आला आहे. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मार्च महिन्यात मिथुनदा भाजपमध्ये दाखल झाले होते.

मिथुनदा यांच्या भाजप प्रवेशाचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. परंतु, त्यांना विधानसभेचे तिकिट देण्यात आले नव्हते. भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मिथुनदांची भेट घेतली होती. तेव्हाच मिथुन यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे औचित्य साधून मिथुन यांनी पक्षप्रवेश झाला होता. आता त्यांच्यावर भाजपने मोठी जबाबदारी सोपवली आहे.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर 70 वर्षीय अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी तृणमूल काँग्रेस व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला होता. 'मी एक नंबरचा कोब्रा आहे, डसलो तर तुम्ही फोटो बनाल,' असे डायलॉग बोलत मिथुन यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यावेळी त्यांनी आपल्या चित्रपटांतील काही डायलॉगही बोलून दाखविले होता. त्यावेळी त्यांचा कोब्राचा डायलॉग खूपच गाजला होता.

मिथुन चक्रवर्ती यांची राजकीय वाटचाल 2014 मध्ये सुरू झाली होती. ममता बॅनर्जी यांनी 2011 मध्ये 34 वर्षांचा डाव्या पक्षांचा गड उध्वस्त करत बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता आणली. त्यावेळी ममतांनी मिथुनदांना राजकारणात येण्याचे आमंत्रण दिले होते. हे आमंत्रण स्वीकारत त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. त्यांना लगेच राज्यसभेचे तिकीटही मिळाले. तृणमूलकडून राज्यसभा खासदार म्हणून ते निवडून गेले. पण केवळ अडीच वर्ष ते खासदार राहिले. या अडीच वर्षांच्या काळात केवळ तीन दिवस ते संसदेत उपस्थित होते.

Mithun Chakraborty and Narendra Modi
स्मृती इराणी, जोतिरादित्य शिंदेंचं आधी सरकारमध्ये अन् आता पक्षात वाढलं वजन

भाजपने आता राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. यात सहा महिन्यांपूर्वी पक्षात आलेल्या मिथुनदांना स्थान देण्यात आले आहे. या कार्यकारिणीमधून ज्येष्ठ नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांना वगळण्यात आलं आहे. मागील काही दिवसांपासून स्वामी हे आपल्याच सरकारला लक्ष्य करताना दिसत आहेत. तसेच, वरूण गांधी आणि त्यांच्या मातोश्री खासदार मेनका गांधी यांनाही कार्यकारिणीतून डच्चू देण्यात आलेला आहे. तर काही महिन्यांपूर्वी पक्षात दाखल झालेले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना कार्यकारिणीत स्थान मिळाले आहे. याचवेळी शेतकरी आंदोलनावरून सरकार टीका करणारे माजी केंद्रीय मंत्री चौधरी विरेंदरसिंह यांनाही वगळलं आहे.

Mithun Chakraborty and Narendra Modi
मोदींच्या विरोधात बोलणं पडलं महागात; ज्येष्ठ नेत्याला दाखवला बाहेरचा रस्ता

राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी यांच्यासह 80 नेत्यांचा समावेश आहे. त्यांच्याशिवाय 50 विशेष निमंत्रित व 179 स्थायी निमंत्रित सदस्यांचा समावेश आहे. एकूण 309 सदस्यांचा समावेश या कार्यकारिणीमध्ये करण्यात आला आहे. पक्षाचे केंद्रीय पदाधिकारी, सर्व विभागांचे अध्यक्ष, राष्ट्रीय प्रवक्ते, सर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधीमंडळातील नेते, माजी मुख्यमंत्री, माजी उपमुख्यमंत्री, सर्व प्रदेशाध्यक्ष, सर्व राज्यांचे प्रभारी, सह प्रभारी आदींचा समावेश आहे. पक्षाचे 13 उपाध्यक्ष असतील. तर सात जणांवर राष्ट्रीय महासचिवपदाची जबाबदारी सोपण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com