मुंबई : वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) आता कोरोना पॉझिटिव्ह (Covid Positive) सापडली आहे. तिनेच सोशल मीडियावर याची माहिती दिली असून, ती गृह विलगीकरणात आहे. पॉझिटिव्ह आल्यानंतरही कंगनाने तारे तोडले असून, कोरोना हा एका छोटासा फ्लू आहे, असे विधान तिने केले आहे. (kangana ranaut tests covid positive)
कंगनाने तिला कोरोनाची लागण झाल्याची माहिती इन्स्टाग्रामवर दिली. तिने म्हटले आहे की, मागील काही दिवसांपासून मला अशक्तपणा जाणवत होता. तसेच, माझ्या डोळ्यांचीही जळजळ होत होती. मी हिमाचल प्रदेशला जाणार होते. त्यामुळे मी काल कोरोना चाचणी केली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
मी स्वत: विलगीकरणात गेले असून, हा विषाणू माझ्या शरीरात पार्टी करीत होता हे मला माहितीच नव्हते. कोरोना हा एक छोटासा फ्लू आहे. माझ्या शरीरातून मी त्याला नष्ट करून टाकेन. लोकांना त्याला स्वत:ला विजयी होऊ देऊ नये. तुम्ही त्याला घाबरू नका. तुम्ही घाबरल्यास तो तुम्हाला आणखी घाबरवतो. या विषाणूला प्रसारमाध्यमे आणि काही व्यक्तींना मोठे केले आहे, असे कंगनाने म्हटले आहे.
दरम्यान, कंगनाचे ट्विटर अकाउंट काही दिवसांपूर्वी कायमस्वरुपी बंद करण्यात आले आहे. याला कारण आहेत कंगनाची प्रक्षोभक ट्विट. कंगनाने पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या हिंसाचाराबद्दल आक्षेपार्ह ट्विट केली होती. कंगनाचे वर्तन द्वेष पररवणारे आणि इतरांना दूषणे देणारे आहे, असे ट्विटरने म्हटले होते. कंगनाचे अकाउंट आधी ट्विटरने तात्पुरते बंद केले होते.
ट्विटरच्या या कारवाईवर कंगनाचा तिळपापड झाला होता. तिने ट्विटरची गरजच नसल्याची भूमिका घेतली होती. तिने म्हटले होते की, माझा आवाज उठवण्यासाठी माझ्याकडे अनेक प्लॅटफॉर्म आहेत. तसेच, चित्रपटातील माझी कला हा ही एक प्लॅटफॉर्म माझ्यासाठी आहे.
बंगालमधील हिंसाचाराबद्दल केलेल्या ट्विटमध्ये कंगनाने म्हटले होते की, हे अतिशय भयानक आहे. गुंडांना मारण्यासाठी आपण आणखी मोठे गुंड व्हायला हवे. ती मोकाट सुटलेल्या राक्षासारखी आहे. आता मोदीजी 2000मध्ये सुरवातीला घेतलेले विराट रुप पुन्हा एकदा धारण करुन तिला धडा शिकवा.
ट्विटरने सध्या आपल्या धोरणांची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेत कॅपिटल हिल येथे झालेल्या हिंसाचारानंतर ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाउंटही बंद केले होते. त्यानंतर काही दिवसांनी ट्विटरवरुन वारंवार वादग्रस्त विधाने करणाऱ्या कंगनावर कारवाई झाली होती. ट्विटरने तिचे अकाउंट तात्पुरते बंद केले होते. यानंतर कंगनाने ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांच्यावरच निशाणा साधला होता.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.