कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) आमनेसामने आले आहेत. या पोटनिवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. नुकताच भाजपचे नेते धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यांनी महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने वातावरण तापले होते. आता उत्तर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सत्यजित कदम (Satyajeet Kadam) यांची जीभ घसरली आहे.
कोल्हापूरमध्ये शिवाजी पेठेतील प्रचारसभेत बोलताना कदम यांनी विरोधकांना इशारा दिला. त्यावेळी त्यांची जीभ घसरली. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले असताना नेत्यांच्या प्रक्षोभक भाषेमुळे प्रचाराची पातळी खालावू लागली आहे. धनंजय महाडिक यांनी महिलांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेला वाद शमण्याआधीच कदम यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. या सभेतील त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
काय म्हणाले सत्यजित कदम?
मी बोलणारा नाही तर करुन दाखवणारा कार्यकर्ता आहे. कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीतील आमच्या सभेला तसेच, प्रचाराला आलेल्या लोकांना फोन करुन धमकावणे सुरू आहे. ही दादागिरी आम्ही चालू देणार नाही. असा प्रकार पुन्हा घडल्यास पायताणाने हाणल्याशिवाय राहणार नाही. मागील वेळी हिंदुत्ववादी विचारांचा पराभव करून शिवसेना संपवली हे जनता आणि शिवसैनिक विसरलेले नाहीत. मी कधी आक्रमकपणे बोलत नाही पण आता बोलावे लागत आहे. शहरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा मलाच पाठिंबा आहे.
महाडिक काय म्हणाले होते?
काँग्रसचे लोक येतील आणि तुम्हाला सांगतील आम्ही एक महिला उभी केली आहे. ती बिचारी आहे. तुम्ही सगळ्या महिला आहात तर तिला मतदान करा. मला सांगा तुमचा पती एखादं प्लंबिंग काम करत असेल तुम्हाला ते जमणार आहे का? तुमचा पती इलेक्ट्रिशियन असेल तुम्हाला ते काम जमणार आहे का ? ज्याचं काम त्यानं करायचं असतं, असे वक्तव्य महाडिक यांनी केले आहे.
काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या मृत्यूमुळे ही जागा रिक्त झाली आहे. येथून त्यांच्या पत्नी जयश्री जाधव (Jayashree Jadhav) मैदानात उतरल्या आहेत. जाधव या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात भाजपने सत्यजित कदम (Satyajeet Kadam) यांना मैदानात उतरवले आहे. कोल्हापूर उत्तरच्या मैदानात एकूण 15 उमेदवार आहेत. पोटनिवडणुकीचे मतदान 12 एप्रिलला होणार असून, निकाल 16 एप्रिलला लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.