Devendra Fadnvis : चलो बुलावा आया है...! सीएम शिंदे, फडणवीसांची दिल्लीत झाडाझडती?

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत महायुतीची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. चुका कोठे झाल्या, का झाल्या हे जाणून घेण्यासाठी भाजपच्या हायकमांडने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला बोलावले आहे.
devendra fadnavis, eknath shinde
devendra fadnavis, eknath shindeSarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election : महाराष्ट्रात मिशन 45 पूर्ण करण्याच्या नादात भाजपने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी पंगा घेतला. त्याची कडू फळे वाट्याला आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्या दिल्लीला पाचारण करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील निराशाजनक कामगिरीबाबत भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून त्यांची झाडाझडती घेतली जाण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीचे सरकार न पाडता ते पाच वर्षे चालू दिले असते तर...? असा प्रश्न आता भाजपच्या एकूणएक नेत्यांना पडत असेल. वचपा काढण्याच्या नादात बेभान झालेल्या देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकारी नेत्यांनी महाविकास आघाडीचे सरकार कधीही स्थिर राहू दिले नाही. कोरोनाकाळातही त्यांनी राजकारण सुरूच ठेवले होते. अखेर भाजपने महाविकास आघाडीचे सरकार पाडले. 40 आमदार घेऊन शिवसेनेतून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे हे भाजपसोबत गेले आणि महायुतीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर वर्षभरात भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पाडून अजितदादा पवारांसह 40 आमदारांना आपल्यासोबत घेतले.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी 40 आमदार सोबत घेतल्यानंतर आपली बाजू भक्कम होईल आणि महाविकास आघाडी कमकुमत होईल, हा भाजपचा अखेर भ्रमच ठरला. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी अहंकार मोडीत काढून भाजपला जमिनीवर आणल्याचे या निकालांनी दाखवून दिले आहे. भाजप-शिवसेना युतीला गेल्या निवडणुकीत 41 जागा मिळाल्या होत्या. एकट्या भाजपला 23 जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत भाजपला त्यापेक्षा निम्म्या जागाच मिळत असल्याचे दिसत आहे. मग शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडून भाजपला काय मिळाले, असा प्रश्न आता भाजपच्या दिल्लीश्वरांनाही पडला असेल.

devendra fadnavis, eknath shinde
Eknath Shinde यांना ठाकरेंच्या राजीनाम्यावर विचारले...|Uddhav Thackeray resignation |Shiv Sena

लोकसभेच्या निवडणुकीत शिंदे यांनी हट्टाला पेटून 15 जागा पदरात पाडून घेतल्या होत्या. अजितदादांना चार जागा मिळाल्या होत्या. भाजपने 28 जागा लढवल्या आणि रासपचे महादेव जानकर यांना एक जागा सोडण्यात आली होती. यापैकी महायुतीला 20 जागा मिळतील, असे चित्र सायंकाळपर्यंत दिसत होते. गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या जागांच्या तुलनेत 21 जागांचा तोटा भाजपला होण्याची शक्यता आहे.

devendra fadnavis, eknath shinde
Chandrabapu Naidu Loksabha Result Analysis : जगनमोहनचा धुव्वा उडवला, विधानसभेत स्वबळावर बहुमत, आता चंद्राबाबूंकडे 'इंडिया'चे लक्ष

भाजपसाठी हा मोठा धक्का आहे. त्याचे परिणाम आगामी विधानसबा निवडणुकीतही भाजपला भोगावे लागणार आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे राजकारण संपले, अशी टिंगलटवाळी करणाऱ्या भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांना महाराष्ट्रातील मतदारांनी सणसणीत उत्तर दिले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना भाजप हायकमांडने दिल्लीला पाचारण केले आहे. तेथे त्यांची झाडाझडती घेतली जाण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com