Mumbai Political News : आमचा नेता मुख्यमंत्री होणार किंवा अमूक पद मिळवणार, आमचाच पक्ष सत्तेवर येणार... अशी आणि यांसारखी विविध राजकीय नेत्यांची वक्तव्ये सातत्याने कानावर पडत असतात. मात्र, लोक त्याकडे फारसे गांभीर्याने पाहत नाहीत. राजकीय नेत्यांच्या, त्यांच्या पाठीराख्यांच्या मनात मात्र नेहमी असे काही तरी सुरूच असते. अनेकदा नेत्यांच्या कौतुकापोटी, त्यांच्या गुड बुक्समध्ये जाण्यासाठी अशी विधाने केली जातात.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विजय कोलते यांनीही गेल्या वर्षी असेच वक्तव्य केले होते. अजितदादा पवार यांना मुख्यमंत्रिपदाचा मार्ग सापडला आहे, असे ते म्हणाले होते. त्या अनुषंगानेच अजितदादा राष्ट्रवादीतील काही आमदारांसह महायुती सरकारमध्ये सहभागी झाले, उपमुख्यमंत्री झाले, मात्र मुख्यमंत्रिपद अद्याप तरी त्यांच्या दृष्टिक्षेपात आल्याचे दिसत नाही.
गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये कोलते यांनी तसे वक्तव्य केले होते. त्यावेळी अजितदादा विरोधी पक्षनेते होते. मुख्यमंत्रिपदाचा मार्ग विरोधी पक्षनेतेपदातून जातो, असे कोलते यांचे म्हणणे होते. राधाकृष्ण विखे पाटील हेही विरोधी पक्षनेते होते, मात्र ते मुख्यमंत्री झाले नाहीत.
अशी आणखीही उदाहरणे असतील. कोलते यांच्या वक्तव्यानंतर सात-आठ महिन्यांनी अजितदादा राष्ट्रवादीतील काही आमदारांना घेऊन शिंदे-फडणवीस सरकारला जाऊन मिळाले, ते उपमुख्यमंत्री झाले. शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.
सुनावणी झाली की शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरतील, पर्यायाने शिंदे यांचे मुख्यमंत्रिपद जाईल आणि ते अजितदादांना मिळेल, असे अंदाज कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी बांधले. अपात्रतेची सुनावणी कधी पूर्ण होईल, निकाल काय लागेल याबाबत जो तो आपल्या परीने अंदाज बांधू शकतो.त्याला काही मर्यादा किंवा बंधने नाहीत. 16 आमदार अपात्र ठरले तरी मुख्यमंत्रिपद अजितदादांना मिळणे तितकेसे सोपे वाटत नाही.
मराठा आरक्षण आंदोलनाने भल्या भल्या नेत्यांच्या शिडातील हवा काढून घेतली आहे. मनोज जरांगे पाटील या कफल्लक माणसावर विश्वास ठेवून अवघा मराठा समाज त्यांच्या पाठीमागे उभे राहिल्याचे चित्र दिसले. इतका विश्वास मराठा समाजाने एखाद्या नेत्यावर दाखवला असेल का, याबाबत शंकाच आहे. मी मराठ्यांचा नेता आहे, असा दावा महायुती सरकारमधील एकही नेता आता करू शकत नाही.
दुसरी महत्त्वाची बाब अशी, की महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर सर्वांना वाटत होते की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, मात्र भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने धक्का देत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली. फडणवीस यांना अनिच्छेनेच उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावे लागले.
आम्ही काळजावर दगड ठेवून हा निर्णय मान्य केला, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. फडणवीसांना मुख्यमंत्री झाल्याचे पुन्हा पाहायचे आहे, असे भाजपचे नेते अधूनमधून म्हणत असतात. त्यामुळे फडणवीस आणखी जास्त काळ क्रमांक दोनवर राहू शकत नाहीत. ते भाजपचे राज्यातील सर्वात शक्तिशाली नेते आहेत.
शिवाय, अजितदादा सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून भाजपचे निष्ठावंत नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. लोकसभेची निवडणूक लक्षात घेऊन भाजपने दोन पावले मागे सरकत आपल्याकडे उपमुख्यमंत्रिपद घेतले. अजित पवार (Ajit Pawar) यांनाही याच भूमिकेतून स्वीकारण्यात आले.
पालकमंत्रिपदांच्या निवडीतही भाजप दोन पावले मागेच राहिला. राज्यात भाजपला मिशन 45 यशस्वी करायचे आहे, म्हणजे लोकसभेच्या 45 जागा जिंकायच्या आहेत. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर चित्र काय राहील, हे आताच सांगता येणार नाही. त्यामुळे महायुतीत या सरकारमध्ये तरी अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदाची स्वप्नपूर्ती होणे अशक्य वाटत आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.