Pune News : गेल्या काही दिवसांपासून पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार याबाबतच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत पुण्यात पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आता या चर्चांना विराम मिळाला असून आम्ही महाविकास आघाडी सोबतच निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र या सर्व परिस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यासाठी इतकी आग्रही नेमकी का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्र येणार, याबाबत चर्चा सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील काही नेत्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचा देखील सांगितले जात होते. अजितदादांच्या सोबत गेल्यास पक्षाला ताकद मिळेल आणि निवडणूक सोप्पी जाईल, अशा भूमिकेत काही नेते होते. मात्र या सर्व घडामोडींमध्ये शरद पवारांच्या पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे मात्र या आघाडीला टोकाचा विरोध केला. आघाडी झाल्यास आपण थेट राजकीय संन्यास घेऊ, असा निर्वाणीचा इशारा देखील त्यांनी दिला.
प्रशांत जगताप यांच्या या टोकाच्या भूमिकेनंतर खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पुण्यातील शरद पवारांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांना फोन करून नेमका प्रशांत जगतापांचा विरोध का ? आहे अशी विचारणा केली असल्याचा देखील सांगितले जात आहे. त्यामुळे अजित पवार देखील पुणे महापालिकेमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जायला उत्सुक असल्याचं बोललं जात आहे.
यामागे काही कारण असल्याचे सांगितलं जाते. मुळात अजित पवारांच्या पक्षातील वरिष्ठ नेते सुरुवातीपासूनच पुणे महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याच्या मानसिकतेत दिसत नाहीत. शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सुरुवातीपासूनच अजित पवारांकडे भाजपसोबत युती करण्यासाठी आग्रह धरला होता. या आग्रहानंतर अजित पवारांनी आपल्या वरिष्ठ नेत्यांना फटकारला देखील होते आणि स्वबळाची तयारी करण्यास सांगितले होते.
अजित पवारांनी फटकारल्यानंतर देखील स्थानिक राष्ट्रवादीचे नेते मात्र भाजपसोबत युती करण्याबाबत शेवटपर्यंत आग्रही राहिले. वेळ प्रसंगी अत्यंत कमी जागा मिळाल्या तरी चालतील परंतु भाजपसोबत युतीत जाऊनच निवडणूक लढू, अशी भूमिका स्थानिक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची होती. मात्र पक्षाने कितीही नमत घेतलं तरी भाजप कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीला आपल्या सोबत घेण्यासाठी अनुकूल नसल्याचे चित्र पाहायला मिळाले.
भाजपसोबत युती होण्याची शक्यता मावळल्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून आघाडीच्या पर्यायांची चाचपणी करण्यास सुरुवात करण्यात आली. त्यातच नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याने या आघाडीच्या चर्चांना बळ आले. मात्र प्रशांत जगताप यांनी यामध्ये खोडा घातला.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा विचार केल्यास आगामी महापालिका निवडणुकीसाठी त्यांच्याकडे महाविकास आघाडीचा पर्याय आहे. महापालिकेसाठी वेगळी आघाडी झाली आणि काँग्रेस बाहेर पडली तर मनसे आणि ठाकरेंची शिवसेना देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सोबत जाऊन शरद पवारांचे राष्ट्रवादी निवडणूक लढू शकते मात्र तसा सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून कोणताही पर्याय नाही.
अजित पवारांचे राष्ट्रवादी महाविकास आघाडी सोबत जाऊ शकत नाही, भाजपसोबत घेत नाही, शिंदेंच्या शिवसेनेसोबत तितकं सख्या राष्ट्रवादीचे नाही आणि शिंदे यांची पुण्यात तितकी ताकदही नाही. यामुळे सध्या तरी अजित त्यांच्या राष्ट्रवादीकडे कोणताही पर्याय युती आघाडीसाठी उपलब्ध असल्याचे पाहायला मिळत नाही
स्थानिक पदाधिकाऱ्यांची मात्र स्वबळावर निवडणूक लढण्याची कसलीच मानसिकता नाही. हा दबाव वाढत असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली असल्याचे सांगितले जात आहे. मात्र सध्या प्रशांत जगतापांच्या भूमिकेमुळे सध्या तरी या आघाडीच्या चर्चांना विराम मिळाला असला तरी महापालिका निवडणुका येईपर्यंत आणखी खूप सारं पाणी पुला खालून जाणार आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये नेमक्या असून काय राजकीय घटना घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.