

Plane crash update : बारामतीमध्ये अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्यानंतर त्यावरून अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. काही जणांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आता AAIB चा शनिवारी २२ पानांचा प्राथमिक अहवाल आल्यानंतर हा अपघात कसा आणि कोणत्या कारणांमुळे झाला असावा, याबाबतचे स्पष्ट संकेत मिळाले आहे.
बारामतीमध्ये २८ जानेवारीला अजित पवार यांच्यासह पाच जणांचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला जोरदार हादरा बसला. हा अपघात नेमका कोणत्या कारणांमुळे झाला, याचा तपास डीजीसीए आणि एएआयबीकडून लगेच सुरू करण्यात आला. पण अनेकांकडून हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्याचप्रमाणे या अपघाताची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडेही केली आहे.
यापार्श्वभूमीवर कालच एएआयबीचा प्राथमिक अहवाल आला. या अहवालात नेमके काय आहे, याबाबतची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली होती. अहवालातून अपघात नेमका कोणत्या कारणांमुळे झाला, याबाबतचा निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. मुंबई विमानतळावर विमान उड्डाणापासून ते विमानाचा अपघात होईपर्यंतचा संपूर्ण आढावा अहवाला घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पायलट आणि बारामती एटीसीमधील संवादाची इत्थंभूत माहितीही अहवालात देण्यात आली नाही. तसेच विमान, पायलट आणि को-पायलटची माहितीही अहवालात आहे.
पायलट आणि को-पायलटने मद्यप्राशन केले नव्हते, असेही अहवालातून समोर आले आहे. विमान बारामतीला जाण्याआधी ते २६ जानेवारीला सुरतला जाऊन आले होते. त्यावेळचे पायलट, त्यानंतरची तपासणी, तसेच २८ तारखेला सकाळी झालेली तपासणी व त्यावेळच्या तंत्रज्ञांनी विमान सुस्थितीत असल्याचे सांगितले. तशी नोंदही करण्यात आली होती, अशी माहिती अहवालात देण्यात आली होती. याचाच अर्थ विमानात कोणताही तांत्रिक बिघाड सुरूवातीपासून नव्हता, असे स्पष्टपणे दिसते.
दोन महत्वाच्या बाबींकडे दाखविले बोट
अहवालामध्ये दोन महत्वाच्या बाबींकडे गांभीर्यपूर्वक लक्ष वेधण्यात आले आहे. ते म्हणजे २८ तारखेचे हवामान आणि बारामती विमानतळावरील असुविधा. बारामती विमानतळ हे अनकंट्रोल्ड विमानतळ आहे. एटीसीची सुविधाही तात्पुरती असून स्थानिक विमान उड्डाण प्रशिक्षण संस्थांकडूनच ती चालविली जाते. निकषानुसार, विमान उड्डाणांसाठी किमान पाच किलोमीटरपर्यंतची दृश्यमानता (व्हिजिबिलिटी) आवश्यक असते. २८ तारखेला सकाळी विमानतळावीर टॉर्वरवरून जवळपास ३ किलोमीटरची व्हिजिबिलिटी सांगण्यात आली होती. म्हणजे हवामान निकषांपेक्षा दृश्यमानता कमी होती. परिसरात हलकेसे धुके होते. पायलटचा रनवे ११ वर उतरण्याचा पहिला प्रयत्न फसला होता. त्यानंतर विमानतळ परिसरात एक चक्कर मारून पुन्हा रनवे ११ वर उतरण्याची परवानगी पायलटने मागितली होती. त्यांना उतरण्याची परवानगीही मिळाली.
एटीसीकडून उतरण्याची परवानगी मिळाल्यानंतर रनवे दिसत असल्याचे पायलटने म्हटले होते. त्यानंतर काही सेकंदातच ओह शिट, ओह शिट... असा आवाज आला आणि विमानाचा अपघात झाला. त्यामुळे अपघाताआधीचे अखेरचे काही सेकंद महत्वाचे ठरले. विमान रनवेच्या ५० मीटर अंतरावर डाव्या बाजुला कोसळले. त्याआधी हे विमान एक झाडाला धडकले होते. त्यानंतर जमिनीवर कोसळले. विमान कोसळताच भीषण आग लागली, असे अहवालात म्हटले आहे.
अहवालामध्ये अखेरीस म्हटले आहे की, विमानतळावर अत्याधुनिक दिशानिर्देश (नेव्हिगेशन) सुविधा नाही. हवामानाची माहिती मिळविण्यासाठीची कायमस्वरूपी अत्यावश्यक सुविधा नाही. रनवेवरील मार्किंगही धुसर झाल्याचे दिसते. २०१६ नंतर रनवेची दुरूस्ती झालेली नाही. निकषांनुसार व्हिजिबिलिटीही कमी होती. या गोष्टींकडे एएआयबीने लक्ष वेधले आहे. विमानतळावरील असुविधा आणि व्हिजिबिलिटी अपघाताची कारणीभूत ठरल्याचे संकेत प्राथमिक अहवालातून मिळत आहेत.
दरम्यान, फ्लाईट डेटा रेकॉर्डरमधील माहिती संकलित करण्यात आली आहे. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमधील माहितीचे विश्लेषण केले जात आहे. त्यासाठी तज्ञांची मदत घेतली जात आहे. अंतिम अहवाल आल्यानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.