Latur Congress News : लातूर जिल्ह्यात काँग्रेसचे देशमुखच किंगमेकर; निलंगेकरांची जाहीर कबुली !

Political news : काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा अर्चना पाटील चाकूरकर यांनी 30 मार्च रोजी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पाठीत देशमुखांनी खंजीर खुपसला, असा आरोप निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला. 2004 च्या निवडणुकीत आमदार निलंगेकर यांच्या मातुःश्रींनी चाकूरकर यांचा पराभव केला होता.
Samabhaji Nilngekar, archana patil, amit dehmukh
Samabhaji Nilngekar, archana patil, amit dehmukh Sarkarnama

Latur News : राजकीय नेते अनेकदा आपल्या भाषणांतून विरोधकांवर विखारी टीका करतात. असे करताना कधी कधी त्यांचे भान सुटते. विरोधकांवर टीका करताना नकळतपणे त्यांचे महत्त्व , मोठेपण अधोरेखित केले जाते. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत लातूरच्या देशमुखांनीच शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पाठीत खंजीर खुपसला, असा आरोप निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे. आता गंमत अशी की, या निवडणुकीत निलंगेकर यांच्या मातुःश्री रूपाताई पाटील निलंगेकर यांनी चाकूरकरांचा पराभव केला होता. लातूरच्या देशमुखांमुळेच आपल्या मातुःश्री निवडून आल्या होत्या, असेच आमदार निलंगेकर यांनी एकप्रकारे सांगून टाकले आहे.

केंद्रात गृहमंत्री, राज्यपाल राहिलेल्या शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी आमदार निलंगेकर हेही उपस्थित होते.

शिवराज पाटील चाकूरकर यांचा त्यांच्या राजकीय कारकिर्दीत एकदाच पराभव झाला आहे, तो म्हणजे 2004 ची लोकसभा निवडणूक. विशेष म्हणजे, हा पराभव भाजपच्या उमेदवार रूपाताई पाटील निलंगकेर यांनी केला होता. चाकूरकरांच्या कारकिर्दीतील एकमेव पराभवाला जबाबदार असणाऱ्या पक्षातच आता त्यांच्या सूनबाईंनीही प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी चाकूरकर यांचे मानसपुत्र, माजी राज्यमंत्री बसवराज पाटील मुरुमकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. (Latur Congress News)

Samabhaji Nilngekar, archana patil, amit dehmukh
Vijay Shivtare: शिंदे-फडणवीसांना जमलं नाही ते एका फोनने केलं, शिवतारेंच बंड थंड करणारा 'तो' व्यक्ती कोण?

आमदार निलंगकेर यांच्या मातुःश्री रूपाताई यांचे माहेर उमरगा तालुक्यातील मुळज येथील चालुक्य घराणे. भाजपचे दिवंगत नेते शिवाजीदादा चालुक्य हे रूपाताई यांचे बंधू. या घराण्यात चार टर्म आमदारकी होती. माहेरवाशीण निवडणुकीला थांबल्याचे अप्रूप अख्ख्या तालुक्याला होते. त्यावेळी उमरगा, लोहारा तालुक्यांचा समावेश लातूर लोकसभा मतदारसंघात होता. या मतदारसंघातून शिवराज पाटील चाकूरकर सात वेळा निवडून आले होते, त्या प्रत्येक निवडणुकीत त्यांना उमरगा लोहारा तालुक्यातून मोठे मताधिक्क्य मिळत होते.

बसवराज पाटील यांचा मतदारसंघात दबदबा, हे मताधिक्य मिळण्यामागचे कारण होते. 2004 ला मात्र परिस्थिती बदलली. माहेरवाशिणीच्या विजयासाठी उमरगा-लोहारा तालुक्यांतील मतदारांनी मोठा हातभार लावला. त्यावेळी उमरगा-लोहारा विकास आघाडी होती. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचा समावेश होता. या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी रूपाताई यांना मताधिक्य मिळावे, यासाठी जंगजंग पछाडले होते.

शिवराज पाटील चाकूरकर यांना प्रत्येक निवडणुकीत जवळपास 40 हजार मतांची आघाडी उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघातून मिळत असे. 2004 च्या निवडणुकीत मात्र परिस्थिती बदलली. या तालुक्यांनी रूपाताईंना जवळपास चार हजार मतांची आघाडी दिली होती. त्यामुळे शिवराज पाटील चाकूरकर यांचा पराभव झाला. रूपाताई पाटील यांचा 30,891 मतांनी विजय झाला. अशा तऱ्हेने चाकूरकर यांच्या पराभवासाठी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या मातुःश्री, त्यांचे आजोळ आणि भाजप हा पक्ष कारणीभूत ठरले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शह-काटशहाचे राजकारण प्रत्येक पक्षात, प्रत्येक जिल्ह्यात चालत असते, मात्र आमदार निलंगेकर यांनी त्याचा पूर्णपणे विपर्यास केला आहे. चाकूरकर यांचा तो पराभव देशमुखांमुळे झाला, असे निलंगेकर म्हणाले आहेत, म्हणजे रूपाताई यांना विजयी करण्यासाठी देशमुखांनी मदत केली, असे ते सांगत आहेत. देशमुख यांनी मदत केली नसती तर आपल्या मातुःश्री रूपाताई या खासदार झाल्या नसत्या, हेही आमदार निलंगेकर यांनी मान्य करून टाकले आहे.

औसा विधानसभा मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत बसवराज पाटील यांचा भाजपचे अभिमन्यू पवार यांनी पराभव केला होता. यासाठीही आमदार निलंगेकर हे देशमुखांना जबाबदार धरत आहेत.

चाकूरकर यांचा पराभव आणि रूपाताई यांचा विजय, अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar) यांचा विजय आणि बसवराज पाटील यांचा पराभव यासाठी आमदार निलंगेकर यांनी देशमुखांना जबाबदार धरले आहे. याचा अर्थ लातूर जिल्ह्याच्या राजकारणात देशमुख हेच किंगमेकर आहेत, हे आमदार निलंगेकर यांनी जाहीरपणे कबूल केले आहे. त्यांना असे करायचे नसणार, मात्र त्यांनी केले ते वेगळ्याच कारणामुळे. लातूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने डॉ. शिवाजी काळगे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे लिंगायत समाजाची मते काँग्रेसच्या पारड्यात जातील, अशी भीती भाजप आणि आमदार निलंगेकर (Sambahji Nilngekar) यांना वाटत असेल. त्यामुळेच अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचा भाजप प्रवेश निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आला आहे. लिंगायत समाजाची मते काँग्रेसला मिळतील या भीतीतूनच आमदार निलंगेकर यांनी तसे वक्तव्य केले असावे.

(Edited By : Sachin Waghmare)

R

Samabhaji Nilngekar, archana patil, amit dehmukh
Latur Congress News : काँग्रेसच्या नेत्या अर्चना पाटील चाकूरकर उद्या करणार भाजपमध्ये प्रवेश; फडणवीसांची घेतली भेट

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com