Arvind Kejriwal to resign as Delhi's chief minister : दिल्लीतील मद्य धोरण प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा दावा करत केंद्रीय अन्वेषण विभागानं ( सीबीआय ) दाखल केलेल्या गुन्ह्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं शुक्रवारी ( 13 सप्टेंबर ) जामीन मंजूर केला.
156 दिवस तुरुंगात असतानाही केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपद सोडलं नव्हतं. पण, तुरुंगातून बाहेर येताच केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा त्याग करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे दिल्लीचा पुढील मुख्यमंत्री कोण? अशी चर्चा देशातील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal ) यांनी दिल्लीत 'आम आदमी पक्षा'च्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी केजरीवाल यांनी दोन दिवसांत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली. "भाजपनं माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावल्यानं मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत आहे. मी अग्निपरीक्षेसाठी तयार आहे. मी किंवा मनिष सिसोदिया मुख्यमंत्री बनणार नाहीत," असं केजरीवाल यांनी स्पष्ट केलं आहे.
"मी दोन दिवसांत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत आहे. मी इमानदार असल्याचा निर्णय जोपर्यंत जनता देत नाही, तोपर्यंत मी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसणार नाही. मी आणि मनिष सिसोदिया आता जनतेच्या दरबारात जात आहोत," असं केजरीवाल यांनी म्हटलं.
केजरीवाल यांनी पुढील मुख्यमंत्री सिसोदिया होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री कोण असणार? त्याची निवड कोण करणार? अशा चर्चांनी राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
अरविंद केजरीवाल दोन दिवसांत मुख्यमंत्रिपदावर पाणी सोडतील. पण, मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये सर्वांत मोठा दावेदार दिल्लीच्या शिक्षणमंत्री आतिशी यांचं नाव समोर येत आहे. केजरीवाल यांच्या विश्वासू नेत्यांमध्ये आतिशी सुद्धा आहेत. दिल्ली मद्य धोरण प्रकरणात मनिष सिसोदिया यांना जेलवारी झाली होती, तेव्हा त्यांच्याकडील शिक्षण विभागाचे मंत्रालय आतिशी यांना देण्यात आलं होतं. आतिशी यांनी दिल्लीचा अर्थसंकल्पही मांडला होता.
कालकाजी मतदारसंघातून निवडून आलेल्या आतिशी यांच्याकडे या शिक्षण, उच्च आणि तंत्र शिक्षण, अर्थ, बांधकाम, पाणी, वीज, जनसंपर्क अशा मंत्रालयाचा पदभार आहे. यापूर्वी 2015 पासून 17 एप्रिल 2018 पर्यंत दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या सल्लागार राहिल्या आहेत.
आतिशी यांच्यानंतर सौरभ भारद्वाज मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. दिल्लीतील कैलाश मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असलेले भारद्वाज हे आरोग्य, शहर विकास आणि पर्यटनमंत्री आहेत. त्यासह ते 'आप'चे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. यापूर्वी भारद्वाज हे दिल्लीच्या पाणी बोर्डाचे अध्यक्ष राहिले आहेत. आपल्या संयमी स्वभावामुळे ते मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात.
मुख्यमंत्रिपदासाठी कैलास गेहलोत यांचं नाव तिसऱ्या क्रमांकावर आघाडीवर आहे. नजफगढ मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व करणारे गेहलोत हे परिवहन आणि पर्यावरणमंत्री आहेत. गेहलोत हे राजकीय वर्तुळात अधिक चर्चेत नसतात.
दरम्यान, दिल्लीतील 'आप'च्या आमदारांची बैठक लवकरच होणार आहे. त्याबैठकीत नवीन मुख्यमंत्र्याच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.