Assembly Election 2024 : माळशिरसमधून 'तुतारी'च्या उमेदवारावर मोहिते-पाटलांकडून शिक्कामोर्तब, समोर राम सातपुते की अन्य कुणी?

Malshiras Assembly Constituency : माळशिरस हा मोहिते-पाटील आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी उमेदवारावर शिक्कामोर्तब केलं आहे. मात्र, भाजपकडून राम सातपुतेच उमेदवार असणार का?
Dhairyashee Mohite Patil | ram satpute
Dhairyashee Mohite Patil | ram satpute sarkarnama
Published on
Updated on

विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला लागले आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून माळशिरसचे आमदार राम सातपुते हे मतदारसंघात सक्रिय दिसत नसल्याचं बोललं जात आहे. यातच माळशिरसमधून उत्तमराव जानकर हे महाविकास आघाडी अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) उमेदवार असल्याचं खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

मात्र, भाजपकडून राम सातपुतेच पुन्हा उमेदवार असतील की अन्य कुणी? याबाबत महायुतीची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्ते आणि मोहिते-पाटील विरोधकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून ऐनवेळी राम सातपुते ( Ram Satpute ) यांना माळशिरसमधून तिकीट जाहीर करण्यात आलं. तेव्हा, नुकतंच भाजपत प्रवेश केलेल्या मोहिते-पाटील यांनी राम सातपुते यांना निवडून आणण्याचं 'शिवधनुष्य' पेललं. राम सातपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( Ncp ) उत्तमराव जानकर यांचा दोन हजार सातशे मतांच्या फरकानं पराभव केला होता. 'ऊस तोड कामगाराचा मुलगा' म्हणून राम सातपुते यांनी प्रचार केला होता.

पाच वर्षे पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलं. 2024 ला माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते-पाटील लढण्यास इच्छुक होते. तशी इच्छाही भाजप नेतृत्त्वाकडे त्यांनी व्यक्त केली होती. पण, तत्कालीन खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना भाजपनं पुन्हा उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचं ठरवलं.

Dhairyashee Mohite Patil | ram satpute
Dhairyasheel Mohite Patil : सांगोल्यातून अनिकेत की बाबासाहेब देशमुख? धैर्यशील मोहिते-पाटलांच्या विधानानं चर्चांना उधाण

माढा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते-पाटील ( Dhairyasheel Mohite Patil ) यांना राष्ट्रवादीकडून निंबाळकरांच्या विरोधात उतरविण्यात आलं. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारसाहेबांच्या मध्यस्तीनं माळशिरस तालुक्यातील कट्टर विरोधक उत्तमराव जानकर आणि मोहिते-पाटील एकत्र आले. उत्तमराव जानकर यांच्याशी 'तोडपाणी' करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला. मात्र, उत्तमराव जानकर यांनी सर्व आमिषे धुडकावत मोहिते-पाटील यांचा प्रचार केला.

दुसरीकडे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून उतरविण्यात आलं होतं. त्यांच्याविरोधात काँग्रेसनं प्रणिती शिंदे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, 'बीडचे पार्सल बीडला परत पाठवयाचं' म्हणत विरोधकांकडून प्रचार करण्यात आला. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी, "एका रात्रीत तुला आमदार केलं, आता एका रात्रीत तुझं पार्सल बीडला पाठवणार," असं म्हणत निर्धार व्यक्त केला होता.

झाले तसेही, प्रणिती शिंदे ( Praniti Shinde ) यांनी राम सातपुते यांचा 74 हजारांच्या आसपास मतांनी पराभव केला. दुसरीकडे, धैर्यशील मोहिते-पाटील यांनी माढा मतदारसंघात रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा पराभवाची धूळ चारली. सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचे दोन खासदार निवडून आल्यानं राजकीय गणिते बदलली आहेत.

आता महाविकास आघाडीला विधानसभेचे वेध लागलं आहे. यातच मंगळवारी ( 10 ऑगस्ट ) धैर्यशील मोहिते पाटील यांनी माळशिरसमधून उत्तमराव जानकर हेच उमेदवार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

दुसरीकडे भाजपमधील काहीजण यावेळी आमदार राम सातपुते यांना उमेदवारी नाही, असं म्हणत गुडघ्याला बाशिंग बांधून फिरताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत भाजपचे राम सातपुते उमेदवार नसतील, तर उत्तमराव जानकर यांच्यासाख्या तगड्या नेत्यासमोर उमेदवार कोण असणार? असा सवाल उपस्थित होत आहे.

Dhairyashee Mohite Patil | ram satpute
Dhairyasheel Mohite Patil : ‘बीडचं पार्सल परत पाठवलं; आता सोलापूर शहरातून राष्ट्रवादीचा एक तरी आमदार निवडून आणा’

राम सातपुते यांनी मोहिते-पाटील यांना धरून तालुक्यात विकास कामे केली आहे. त्यातून सातपुते यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा एक गट तयार झाला आहे. मात्र, ते सक्रिय नसल्यानं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच, भाजपकडून जरी राम सातपुते यांना पुन्हा उमेदवारी दिली, तर ते 2019 सारखा करिष्मा करू शकतील का? कारण, मोहिते-पाटील म्हणतील, तेच माळशिरसमधून आमदार होतात, असं सूत्र आहे.

2019 मध्ये राम सातपुते यांना ऐनवेळी उमेदवारी जाहीर केली होती. मोहिते-पाटील यांनी आपल्या ताकदीवर त्यांना निवडूनही आणलं होतं. मात्र, यंदा मोहिते-पाटील यांची ताकद उत्तमराव जानकर यांच्या पाठिशी असणार आहे. जर, भाजपने राम सातपुते यांना उमेदवारी दिली, तर ही निवडणूक त्यांच्यासाठी आव्हानात्मक असेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com