AAP : केजरीवालांची तुरुंगवारी पंजाबमध्ये ‘आप’च्या पथ्यावर पडणार; कॉंग्रेसला फटका बसण्याची चिन्हं!

Punjab Loksabha दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची तुरुंगवारी ही राजकीय द्वेषातून असल्याचे मत पंजाबच्या नागरिकांचे दिसून येत आहे.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSarkarnama

-विकास झाडे

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे पार पडले आहेत. तर 1 जून रोजी अंतिम टप्प्यातील म्हणजेच सातव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. तर निकाल 4 जून रोजी लागणार आहे. यंदा भाजपने नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा निश्चय केला असून, अब की बार चारसौ पार असे उद्दिष्टही ठेवलेले आहे. तर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीनेही मोदींना सत्तेतून खाली खेचण्यासाठी कंबर कसली आहे.

दरम्यान मतदानाच्या पाचव्या टप्प्यानंतरच भाजपने 300 जागांचा पल्ला ओलांडला असल्याचा दावा अमित शाहांनी केला आहे. मात्र काही ठिकाणी तर चित्र वेगळेच समोर येत आहे. पंजाबमध्ये यंदा आम आदमी पार्टीला यश मिळणार असल्याचं दिसत आहे, तर काँग्रेसला धक्का बसण्याची चिन्हं आहेत. केजरीवालांच्या तुरुंगवारीचा उलट परिणाम पंजबामध्ये दिसण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Arvind Kejriwal
Nandurbar Lok Sabha Analysis : मोदी लाटेशिवाय हिना गावित हॅटट्रिक करणार? काय सांगतात मतदानाचे आकडे...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) यांची तुरुंगवारी ही राजकीय द्वेषातून असल्याचे मत पंजाबच्या नागरिकांचे दिसून येत आहे. तर पंजाबमध्ये भगवंत मान सरकारने दिल्लीप्रमाणेच पायाभूत सुविधा आणि ‘मोफत’ योजनांचा धडक कार्यक्रम सुरू केल्याचा फायदा लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला होताना दिसत आहे. वर्तमान स्थितीत लोकसभेत एकही सदस्य नसलेला ‘आप’ पंजाबमध्ये सर्वाधिक जागा जिंकतानाचे चित्र आहे. याचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसताना दिसतो. भाजपला आहे त्या जागा टिकवण्यासाठी परिश्रम उपसावे लागत आहे.

पंजाबमध्ये तेरा लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यातील आठ कॉंग्रेसकडे, दोन भाजपकडे(BJP), दोन शिरोमणी अकाली दलाकडे आणि एक शिरोमणी अकाली दल (अमृतसर) कडे आहे. यावेळी भाजप, कॉंग्रेस, शिरोमणी अकाली दलासोबतच आम आदमी पार्टी स्वतंत्रपणे संपूर्ण जागांवर लढत आहे. राज्यात कॉंग्रेसचे वर्चस्व असले तरी ती जागा आता ‘आप’ घेताना दिसत आहे. केजरीवालांना तुरुंगात टाकल्याने ‘जेल का जवाब वोट से’ ही ‘आप’ची घोषणा ईव्हीएमवर किती प्रभाव टाकते ते लवकरच स्पष्ट होईल. केजरीवालांबाबत पंजाबमध्ये सहानुभूती दिसून येते. याचा फटका कॉंग्रेसला बसू शकतो.

भाजपने यावेळी उमेदवार बदलला आणि आयत्यावेळी संजय टंडन यांना उमेदवारी दिली आहे. टंडन यांची प्रतिमा चांगली असले तरी त्यांना प्रचारासाठी फार कमी वेळ मिळाला आहे. भाजपच्या विद्यमान खासदार किरण खेर यांनी चंडीगडच्या विकासापासून पाठ फिरवल्याने भाजपच्या उमेदवाराला पुन्हा का निवडून द्यायचे ? असे प्रश्‍न मतदारांकडून विचारले जात आहेत. कॉंग्रेसने मनीष तिवारी यांना चंडीगडमधून उमेदवारी दिली आहे. ते पंजाबच्या आनंदपूर साहिबचे खासदार आहेत. टंडन आणि तिवारी यांच्यात थेट लढत आहे. मतदारांना आकर्षित करणाऱ्या घोषणांमध्ये कॉंग्रेस मागे नाही.

Arvind Kejriwal
Lok Sabha Election 2024 : पिलीभीतची 35, तर अमेठीची 25 वर्षांची परंपरा खंडित!

मोदी सरकार हे शेतकरी विरोधी असल्याचे इथल्या मतदारांच्या डोक्यात ठासून भरले आहे. शेतकरी आंदोलनात रस्त्यावर खिळे ठोकणे, खड्डे करणे, तारा लावणे, शेतकऱ्यांना अडवणे यामुळे त्यांच्यामनात भाजपबाबत प्रचंड रोष आहे. शेतकऱ्यांवर खलिस्तानी म्हणून टीका झाली. या आंदोलनाला कॅनडा, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या ठिकाणाहून आर्थिक पाठबळ मिळत असल्याचे आरोपही झाले. तो संताप मतदारांच्या डोक्यात आहे. त्यामुळे भाजपकडे असलेले होशियारपूर आणि गुरुदासपूर हे मतदासंघ टिकवून ठेवणे अवघड झाल्याचे दिसते.

भाजपच्या दोन्ही जागांवर ‘आप’ प्रभावी दिसून येतो. तर कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये गेलल्या माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग(Captain Amarinder Singh) यांच्या पत्नी परणीत कौर या पतियाळामधून भाजपच्या तिकिटीवर लढत आहेत. पटियाळा हा मतदारसंघ कॉंग्रेसकडे कायम राहावा म्हणून कॉंग्रेस एकवटली आहे. त्याशिवाय अमृतसर, आनंदपूर साहिब, फरीदकोट, फतेहगड साहिब, जालंदर, खादूर साहिब, लुधियाना इथे कॉंग्रेसचे खासदार आहेत. कॉंग्रेस आणि ‘आप’ एकमेकांच्या विरोधात ठाकले असल्याने कोण बाजी मारतो याकडे उत्सुकता आहे.

‘आप’चा वाढता प्रभाव पंजाबमध्ये स्पष्ट दिसतो. त्यामुळे भाजपने महिलांचा मुद्दा उपस्थित केला. ‘आप’च्या खासदार स्वाती मालिवाल यांना मारहाण केल्याच्या प्रकरणाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला. परंतु या विषयाचा परिणाम होताना दिसत नाही. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी प्रचाराचे उत्तम नियोजन केले आहे. मोदी सरकार आणि भाजपला ते पंजाब विरोधी असल्याचे सांगण्यात यशस्वी होताना दिसतात.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com