
BSP Politics News : बहुजन समाज पक्षानं 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 48 मतदारसंघांपैकी एकमेव रायगड वगळता उर्वरित 47 मतदारसंघांत उमेदवार उभे केले होते. या सर्व उमेदवारांचा पराभव झाला हा भाग वेगळा, पण त्यातला 01 उमेदवार तर थेट नवव्या क्रमांकावर फेकला गेला शिवाय 08 उमेदवार सातव्या, 04 उमेदवार सहाव्या, 11 उमेदवार पाचव्या तर 15 उमेदवार चौथ्या क्रमांकावर फेकले गेले.
'बसप'चे(BSP) 08 उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिले ही त्यातल्या त्यात जमेची बाजू. म्हणजेच आघाडी आणि युतीच्या उमेदवाराच्या खालोखाल 'बसप'च्या 08 उमेदवारांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, नंदुरबार, रामटेक, वर्धा, नागपूर या विदर्भातील पट्ट्यात तर ठाणे आणि कोल्हापूरमध्ये 'बसप'चा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
47 उमेदवारांमध्ये सर्वाधिक मतं कुणाला पडली किंवा त्यांच्यात जास्तीत जास्त मतं मिळवण्यात पहिला क्रमांक कुणाचा आला असं ताडून पाहिलं तर रामटेक लोकसभा मतदारसंघातून उभ्या राहिलेल्या संदीप मेश्राम यांना सर्वाधिक मतं पडल्याचं दिसून येतं. त्यांना 26,098 इतकी तिसऱ्या क्रमांकाची मतं पडली.
'बसप'नं काही प्रसिद्ध चेहऱ्यांना पक्षाचं तिकीट दिलं खरं पण त्यांची प्रसिद्धी ना त्यांना पावली ना पक्षाला! प्रसिद्ध गायक नंदेश उमप यांना मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं पण त्यांना मतं मिळाली अवघी 8,318. तिकडं यवतमाळ-वाशिममध्ये माजी खासदार तसेच ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांना निवडणूक रिंगणात उतरवून पाहिलं, पण त्यांचाही प्रभाव पडू शकला नाही. 17,396 इतकी मतं मिळवून ते चौथ्या क्रमांकावर फेकले गेले.
47 उमेदवारांना पडलेल्या एकूण मतांची गोळाबेरीज केल्यास ती अवघी 4 लाख 14 हजार 609 इतकीच भरते. म्हणजेच लोकसभा निवडणुकीतील एखाद्या विजयी उमेदवाराला पडलेल्या मतांपेक्षाही कमी!
1989 पासून महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक(Loksabha Election) लढत आलेल्या 'बसप'चा 1999 पर्यंतचा परफॉर्मन्स तसा जेमतेमच राहिलाय. मात्र 2004 पासून बहुजन समाज पक्षाच्या मतांमध्ये वाढ होत गेली. 1999 मध्ये 'बसप'ला मिळालेली एकूण मतं होती 1 लाख 5 हजार 698 परंतु 2004 मध्ये हा आकडा 10 लाख 46 हजार 234 इथपर्यंत जाऊन पोचला. 2009 मध्ये त्यात आणखी वाढ होऊन ती 17 लाख 85 हजार 643 इतकी झाली. म्हणजे 1999 ते 2009 या 10 वर्षांत मतांमध्ये सुमारे पावणेसतरा लाखांची (16 लाख 79 हजार 945) वाढ झाली.
महाराष्ट्राच्या राजकारणात प्रकाश आंबेडकरांच्या(Prakash Ambedkar) वंचित बहुजन आघाडीनं एन्ट्री केली आणि 'बसप'ची मतं घटली असं म्हणायला जरी वाव असला तरी 'वंचित'ची 'एन्ट्री' होण्यापूर्वी म्हणजेच 2014 च्या लोकसभा निवडणुकीत 'बसप'ला 2009 च्या तुलनेत कमी मतं मिळाली. 2009 ला जिथं 17 लाख 85 हजार 643 इतकी मतं मिळाली होती तिथं 2014 ला हा मतांचा आकडा खाली येत तो 12 लाख 71 हजार 693 वर येऊन थांबला.
म्हणजे 2009 च्या तुलनेत 2014 ला 5 लाख 13 हजार 950 इतकी मतं घटली. मग 2019 मध्ये 'वंचित'ची 'एन्ट्री' झाली आणि 'बसप'च्या मतांमध्ये कमालीची घट झाली. 2019 मध्ये 4 लाख 62 हजार 539 इतकीच मतं पडली म्हणजे 2014 च्या तुलनेत 8 लाख 9 हजार 154 मतांचा फरक पडला. 2024 मध्ये तर ही मतं आणखी घटली आणि हा आकडा 4 लाख 14 हजार 609 पर्यंत खाली घसरला म्हणजे 2019 च्या तुलनेत 47 हजार 930 मतं घटली.
एकेकाळी बहुजनांचा वाली म्हणून ज्या पक्षाकडं पाहिलं गेलं आणि ज्या पक्षानं देशातल्या सर्वांत मोठ्या राज्यात म्हणजे उत्तर प्रदेशात बहुमताच्या जोरावर सरकार चालवलं त्या पक्षाचा आजच्या घडीला उत्तर प्रदेशात एकही खासदार नसावा हे दुर्दैव! एकूणच काय तर महाराष्ट्रातच नव्हे देशातही 'बसप' या अशा 'गज'चालीनं वाटचाल करत राहिला तर या पक्षाच्या सर्वेसर्वा असलेल्या मायावतींचं 'आकाश' जमिनीवर कोसळायला वेळ लागणार नाही.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.