बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) विधानसभा पोटनिवडणुका होत आहेत. या पोटनिवडणुका नवीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांच्यासाठी अग्निपरीक्षा ठरणार आहेत. बोम्मई यांनी राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर दोन महिन्यांतच या निवडणुका होत असल्याचे याकडे पक्ष नेतृत्वाचे बारकाईने लक्ष आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बोम्मई हे पक्षाचे नेतृत्व करणार का, हेसुद्धा याच निवडणुका ठरवणार आहेत.
आता कर्नाटकात सिंदगी आणि हनगळ या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत. या निवडणुका 30 ऑक्टोबरला होत आहेत. यातील हनगळची जागा भाजपकडे तर सिंदगीची जागा धर्मनिरपेक्ष दलाकडे (जेडीएस) होती. हनगळचे आमदार सी.एम.उदासी यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली आहे. जेडीएसचे एम.सी.मानागुळी यांच्या निधनाने सिंदगीची जागा रिक्त जागा झाली आहे. आता या जागांसाठी भाजपसह काँग्रेस आणि जेडीएसने जोर लावला आहे.
याबाबत बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की, पोटनिवडणुकांत आम्ही दोन ठिकाणी 100 टक्के जिंकणार आहोत. भाजप हा शिस्तीचे पालन करणारा पक्ष आहे. बूथ पातळी ते राष्ट्रीय पातळीपर्यंत पक्षाचे कार्यकर्त्यांचे जाळे शिस्तशीरपणे कामकरीत असते. पक्षाने दिलेल्या उमेदवाराला बूथ, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरून पाठिंबा मिळेल. पक्ष लवकरच या दोन्ही ठिकाणच्या उमेदवारांची घोषणा करेल.
बी.एस. येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी बसवराज बोम्मई आले आहेत. येडियुरप्पांवर पक्षाने अद्याप कोणतीही जबाबदारी दिलेली नाही. त्यांचे पुत्र विजयेंद्र हे राज्य भाजपचे उपाध्यक्ष आहेत. नवीन मंत्रिमंडळात विजयेंद्र यांना स्थान देण्यात न आल्याने मोठा गदारोळ उडाला होता. परंतु, पक्षाने या पोटनिवडणुकांसाठी जाहीर केलेल्या प्रभारींच्या यादीत विजयेंद्र यांचा समावेश नव्हता.
यानंतर येडियुरप्पा समर्थकांनी जाहीरपणे भाजप नेतृत्वाला लक्ष्य करण्यास सुरवात केले होते. येडियुरप्पांनी आपल्या समर्थकांना शांत राहण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येडियुरप्पा यांनी या सर्व प्रकाराबद्दल पक्ष नेतृत्वाकडे विचारणा केली होती. यातच येडियुरप्पांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर येऊ लागले. अखेर पक्षाने विजयेंद्र यांच्या प्रभारीची जबाबदारी सोपवली.
येडियुरप्पांच्या रुपाने दक्षिणेत भाजपचा पहिला मुख्यमंत्री झाला होता. येडियुरप्पांची मुख्यमंत्रिपदाची ही चौथी टर्म होती. त्यांच्या चौथ्या टर्ममधील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी बोम्मई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. बोम्मई हे येडियुरप्पा यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. येडियुरप्पा यांच्या संमतीनेच त्यांची निवड झाली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.