
Beed Politics : गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात बीडचीच चर्चा सुरू आहे. दुर्दैवाने ही चर्चा बीड जिल्ह्यातील नकारात्मक बाबींवर सुरू आहे. खंडणी मागण्याच्या आड येत असल्यामुळे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. याच्याविरोधात बीड जिल्ह्यातील भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आवाज उठवला. तसेच त्यांनी या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड कनेक्शनचा संदर्भ देत माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. त्यामुळे त्यांचे कौतुक झाले. त्याच धस यांच्या विश्वासू कार्यकर्त्याचे कारनामे आता समोर आले आहेत. त्यामुळे आमदास सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यासह बीड जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींचे पाय मातीचे आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सुसंस्कृत, सभ्यपणाने राजकारण करता येते, हे अगदी अलीकडच्या काळात शेतकरी कामगार पक्षाचे गणपतराव देशमुख यांनी दाखवून दिले आहे. जुन्या काळात तर बहुतांश नेते सुसंस्कृत, सभ्य राजकारण करायचे. सध्याही राज्यात अशी उदाहरणे सापडतील. बीड जिल्ह्यात मात्र गुंडगिरी, दडपशाही, दादागिरीने शिखर गाठल्याची उदाहरणे समोर येत आहेत. तसे पाहिले तर राजकारणात असे प्रकार हल्ली सगळीकडे आढळून येत आहेत, मात्र बीड जिल्ह्याची तऱ्हाच न्यारी असल्याचे दिसत आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि त्याच्या गुंडांच्या विरोधात आमदार धस यांनी रान पेटवले होते. सभागृहातही त्यांनी हा विषय उचलला होता. राज्यभरात ठिकठिकाणी निघालेल्या मोर्चांत सहभागी होऊन त्यांनी वाल्मिक कराड आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात आवाज उठवला. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा अत्यंत विश्वासू सहकारी. देशमुख यांच्या खूनप्रकरणात सध्या तो कारागृहात आहे. खुनाचा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने दोषारोपपत्र दाखल केले आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला.
संतोष देशमुख यांना करण्यात आलेल्या अमानुष मारहाणीची छायाचित्रे माध्यमांनी प्रसिद्ध केली. त्यानंतर कुठे धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. आमदार धस यांनी रान पेटवल्यामुळेच धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. आता आणखी एक भयंकर प्रकार समोर आला आहे. आमदार धस यांचे पायही मातीचेच आहेत, हे त्यावरून सिद्ध झाले आहे. सतीश भोसले ऊर्फ खोक्या या धस यांच्या कार्यकर्त्याने काहीजणांना अमानुष मारहाण केल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. कार्यकर्ता माझा असला तरी त्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे आमदार धस म्हणाले आहेत.
गुन्हा दाखल झाला पाहिजे, एवढे बोलून कसे भागेल, याचे उत्तर आमदार धस यांनी दिले पाहिजे. एखाद्याला अमानुष मारहाण करण्याचे बळ या 'खोक्या'च्या अंगी कुठून आले, हा प्रश्नही धस यांचा पिच्छा सोडणार नाही. धस हे या 'खोक्या'ला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाची एक क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात खोक्या म्हणतो आहे, ''भाऊ आशीर्वाद असू द्या.'' त्यावर आमदार धस त्याला सांगताहेत, ''100 टक्के आशीर्वाद आहे. 99 टक्केही नाही, पूर्ण 100 टक्के आशीर्वाद आहे.'' गुंडांना पोसणे हे बीड जिल्ह्याच्या राजकारणाचे व्यवच्छेदक लक्षण आहे काय, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
आमदार धस यांचा कार्यकर्ता असलेल्या 'खोक्या'वर पोलिस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, असे सांगितले जाते. त्याच्याकडेही आलिशान 'एसयूव्ही' आहे. समोरच्या सीटवर बसून या 'एसव्हीयू'च्या 'डॅशबोर्ड'वर हा 'खोक्या' नोटांची बंडले फेकतो आहे, असाही एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हे पाहून लोक बुचकळ्यात पडले असतील.
'खोक्या'ने हरीण, मोरांची शिकार केल्याचेही समोर आले आहे. राजकारणात सध्या काय प्रकार सुरू आहेत, आपण कोणाला निवडून देत आहोत, आपल्या पिढीचे भवितव्य सुरक्षित करतो आहोत की संकटात टाकत आहोत, असे एक ना अनेक प्रश्न लोकांना आता पडत असतील.
थोडेसे माहितगार असलेल्या बीड जिल्ह्यातील कोणाही नागरिकाला फोन लावा आणि चौकशी करा, समोरून हमखास उत्तर येईल, आमचे सारे नेते, आमदार असेच आहेत. कोणाचे कारनामे समोर आले आहेत, कोणाचे अद्याप दबून आहेत आणि कोणाचे इतिहासजमा झालेले आहेत. बीडमधील किश्श्यांची यापूर्वी चर्चा झालेली आहे.
अन्यायाच्या विरोधात रान पेटवणाऱ्या आमदाराच्या सावलीतच गुंड पोसले जाणे, हा प्रकार भयंकर आहे. सारेच एका माळेचे मणी असताना आमदार धस यांचे कौतुक करण्याची घाई झाली की काय, असा प्रश्नही महाराष्ट्राला आज ना उद्या नक्कीच पडणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.