
Solapur News:अनेक वादंग, कथ्याकूट आणि दीर्घ प्रतीक्षेनंतर सोलापूर काँग्रेसला जिल्हाध्यक्ष मिळाला आहे. अक्कलकोट तालुक्यातील सातलिंग शटगार यांच्या खांद्यावर जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.अस्तित्वासाठी झगडणाऱ्या आणि आपापसांत लढणाऱ्या नेत्यांना सोबत घेऊन पक्षाला गतवैभव मिळवून देण्याचे मोठे आव्हान शटगार यांच्यासमोर असणार आहे.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला सपाटून मार खावा लागला होता. एकेकाळी संपूर्ण जिल्ह्यावर वर्चस्व असणाऱ्या काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकीत एकही जागा मिळू शकली नव्हती, त्यानंतर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर आरोप करत तत्कालीन जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी दहा डिसेंबर 2024 रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून हे पद रिक्त होते.
पक्षाला नवा जिल्हाध्यक्ष नेमण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून अनेकदा प्रयत्न झाले. मात्र, अंतर्गत लाथाळ्या आणि मतभेदामुळे एका नावावर सहमती होत नव्हती. जिल्हाध्यक्ष नियुक्तीसाठी सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे आणि पक्षाचे निरीक्षक मोहन जोशी यांनी अनेकदा प्रयत्न केले. मात्र ,गटबाजीमुळे कुठल्याही एका नावावर पक्षात एकमत होत नव्हते. त्यामुळे सोलापूर काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष कोण होणार, याबाबत उत्सुकता होती.
पक्षनिरीक्षक मोहन जोशी यांनी महिनाभरापूर्वी काही नावे हायकमांडकडे पाठवली होती, त्यात सोलापूर शहराबरोबर जिल्ह्यातील नेत्यांची नावे होती. त्यावेळी जोशी यांनी सोलापूर काँग्रेसला पंधरा दिवसांत जिल्हाध्यक्ष मिळेल, असे जाहीर केले होते. पण कुठे बिनसले माहित नाही. मुदत संपून गेली तरी जिल्हाध्यक्षाचे नाव जाहीर होत नव्हते, त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता होती.
दरम्यान, चार दिवसापूर्वी ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्षपदावर चर्चा झाली होती. मात्र, खासदार प्रणिती शिंदे यांनी सुचवलेल्या नावाला काही कार्यकर्त्यांनी विरोध केला होता, त्यावरून मोठे रामायण घडले होते. पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनात केलेल्या भाषणामुळे सोलापूर शहराचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे यांनी मारहाणीपर्यंतचे इशारा दिले होते,त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षात ऐकी दिसण्याऐवजी पक्षातील बेकी चव्हाट्यावर आली होती, त्यामुळे काँग्रेस पक्षाला आता तरी नवा जिल्हाध्यक्ष मिळणार की नाही, अशी चर्चा सुरू झाली होती.
दरम्यान, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी पक्षातील काही वरिष्ठांना फोन करून सबुरीचा सल्ला दिला होता, त्यानंतर दोनच दिवसांत अक्कलकोट तालुक्यातील सातलिंग शटगार यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर झाली आहे. काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, प्रा. अशोक निंबर्गी, विजयकुमार हत्तुरे, सातलिंग शटगार यांच्यासह काही प्रमुख नावे जिल्हाध्यक्षपदाच्या शर्यतीत होती. मात्र, शिंदेंनी शटगार यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्ष पदाची माळ टाकली आहे.
गटातटांत विभागलेल्या आणि अंतर्गत मतभेदामुळे पोखरलेल्या काँग्रेसला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवून देण्याचे शिवधनुष्य शटगार यांना पेलावे लागणार आहे. काँग्रेस पक्षाकडे ताकदवान नेते नसले तरी निष्ठावंत मोजक्या कार्यकर्त्यांच्या बळावर शटगार यांना पक्षाला काही प्रमाणात तरी यश मिळवून द्यावे लागणार आहे.
सातलिंग शटगार हे अक्कलकोट तालुक्यातील आहेत. त्यांच्या दोन पिढ्या काँग्रेस पक्षाशी निष्ठा राखून आहेत. पक्षाने अडचणीच्या काळात जिल्हाध्यक्षपदी मला संधी दिली याबद्दल अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया शटगार यांनी जिल्हाध्यक्षपदाच्या नियुक्तीनंतर दिली आहे.
माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी पक्ष सोडल्यानंतर प्रणिती शिंदे यांनी तालुक्यात लक्ष घातले आहे. अक्कलकोट तालुक्यात काँग्रेस पुन्हा मजबूत करण्यासाठी त्यांनी पक्षाचा जिल्हाध्यक्ष तालुक्यातून दिल्याचे दिसून येते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.