मारहाण करणारे आणि मार खाणारे भाजपचे नेते सीएम सोबत एकत्रित व्यासपीठावर!

मारहाण करणारे आणि मार खाणारे भाजपचे नेते सीएम सोबत एकत्रित व्यासपीठावर!

अमळनेर ः भाजपचे जळगावचे उमेदवार उन्मेश पाटील यांच्या प्रचाराच्या वेळी काही दिवसांपूर्वी झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या आज झालेल्या सभेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

गेल्या वेळी झालेल्या प्रचारसभेत भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ व त्यांच्या समर्थकांनी माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांना जलसंपदामंत्र्यांच्या उपस्थितीत मारहाण केली होती. या गोंधळामुळे ऐन निवडणुकीत अमळनेरचे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. संपूर्ण देशात अमळनेरच्या या घटनेची चर्चा रंगली होती. मात्र, त्यानंतर आज झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेस चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. विशेष म्हणजे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील व भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ एकाच व्यासपीठावर होते. दोन्हीही व्यासपीठाच्या परस्परविरोधी बाजूंना बसले होते. दोघांनी एकमेकांकडे पाहणेही टाळल्याचे दिसून आले.

या सभेत मुख्यमंत्र्यांच्या अगोदर प्रोटोकॉलनुसार उमेदवार उन्मेश पाटील, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील व जलसंपदामंत्री गिरीश महाजन हेच बोलणार होते. मात्र, हा प्रोटोकॉल तोडून गिरीश महाजन यांनी स्थानिक आमदार शिरीष चौधरी यांना बोलण्याची सूचना केली. त्यानंतर आमदार स्मिता वाघ यांनीही मनोगत व्यक्‍त केले. जास्तीचा वेळ झाल्याने गिरीश महाजन यांनी त्यांचे भाषण टाळून थेट मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू झाले.

मारहाणीच्या घटनेचा मुख्यमंत्र्यांनी कोणताही नामोल्लेख केला नाही. मात्र, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या खास शैलीतून याच ठिकाणी आमची पहिली मॅच जोमात झाली असल्याचा टोला लगावून गेल्या घटनेची नकळत आठवण करून दिली. डॉ. बी. एस. पाटील व उदय वाघ यांना एकाच व्यासपीठावर व पहिल्या रांगेतू पाहून अनेक जण आश्‍चर्यचकित होते. उन्मेश पाटील यांचे भाषण सुरू असतान डॉ. बी. एस. पाटील यांनी गिरीश महाजन यांच्याजवळ जाऊन कानाजवळ जाऊन कुजबूज केली.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन ते चार उमेदवार व्यासपीठावर होते. यात भाजपकडून कोणाची वर्णी लागते हेही आगामी काळात दिसून येणार आहे. विद्यमान खासदार ए. टी. पाटील नाराजी दूर सारून मुख्यमंत्र्यांच्या सभेस उपस्थित राहतील असे वाटले होते. मात्र, त्यांनी सभेस पाठ फिरवली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com