पुणे : महाराष्ट्रातील नगरपंचायतींच्या (Nagar Panchayat election 2022) निकालाची अंतिम आकडेवारी जाहीर झाली 1649 जागांपैकी तब्बल 384 जागा जिंकून भाजपने (BJP) पहिला क्रमांक पटकावला आहे. त्या खालोखाल राष्ट्रवादीने (NCP) 344 जागा जिंकल्या आहेत. काॅंग्रेस 316 आणि सर्वात शेवटी 284 जागा मिळवून शिवसेना (Shivsena) शेवटच्या क्रमांकावर आहे. मनसे 4, अपक्ष आणि स्थानिक आघाड्या 206, अन्य पक्ष 85 जागा मिळाल्या आहेत. मुख्यमंत्री असलेल्या पक्षाची कामगिरी निवडणुकांत चांगली राहते, असे साधारणपमे समजले जाते. पण पहिल्यांदाच शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही चौथा क्रमांक या निवडणुकीत मिळाला आहे.
राज्यातील 106 नगरपालिकांसाठी राज्यात दोन टप्प्यांत निवडणुका पार पडल्या. त्यातील 97 नगरपालिकांची मतमोजणी आज पार पडली. त्यातील 1649 जागांचे निकाल जाहीर झाले. राज्यातील अनेक मोठ्या ग्रामपंचायती नगरपंचायतीमध्ये रुपांतरीत झाल्या. या ठिकाणी प्रामुख्याने निवडणुका पार पडल्या. यातील नायगाव (जि. नांदेड) येथे 17 पैकी 17 जागा जिंकण्याचा पराक्रम काॅंग्रेसने केला. बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांचा करिश्मा येथे चालला.
मुख्यमंत्री शिवसेनेचा असला तरी या पक्षाची कामगिरी सर्वात खराब झाली आहे. या निवडणूक प्रचार काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजारी असल्याने ते थेट प्रचारात नव्हते. त्याचाही परिणाम झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री अनिल परब यांनी बऱ्यापैकी सूत्रे सांभाळली. पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपापल्या जिल्ह्यांतील जागा सांभाळल्या. मात्र इतर ठिकाणी निराशा पदरी पडली.
एकनाथ शिंदे यांच्या म्हणण्यानुसार शिवसेनेची कामगिरी चांगली राहिली आहे. कोविड काळात महाविकास आघाडी सरकारने चांगले काम केले. त्याची पावती या निकालात मिळाल्याचा दावा त्यांनी केला. राज्यातल्या नगरपंचायत निवडणुकीचा निकाल समाधानकारक आहे. महाविकास आघाडीने एकत्र येऊन चांगले यश मिळाले आहे. राज्यातील अनेक प्रश्नांकडे महाविकास आघाडीने लक्ष दिले होतं म्हणून लोकांनी निवडून दिले, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की नगर पंचायत निवडणुकीच्या निकालाने राज्यातील जनतेने आपला कौल महाविकास आघाडीच्या बाजून दिला असून भारतीय जनता पक्षाला नाकारले आहे. भारतीय जनता पक्षाने मागील वेळी ६०० पेक्षा जास्त जागा जिंकल्या होत्या त्या आता ३०० वर खाली घसरल्या आहेत. आम्ही १७ नगरपंचायतीवरून २२ वर गेलो आहोत. काँग्रेस पक्षाने ३०० हून अधिक जागा जिंकल्या असून काँग्रेस विचारांच्या स्थानिक आघाड्यांनी ही चांगले यश मिळवले आहे. भाजपचे १०५ आमदार आहेत व आमचे ४४ आहेत तरीही काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे.
नगरपंचायत निवडणुकांचे निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने लागले असून हे निकाल पाहता राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील नंबर एकचा पक्ष ठरला आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घवघवीत मतदान केल्याबद्दल राज्यातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आभार मानले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा करुन तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला होता, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले होते. पक्षाच्या बांधणीसाठी विविध उपक्रमे, आंदोलने, कार्यक्रमे हाती घेतली होती. जनता दरबार उपक्रमातून जनतेची कामेही तत्परतेने सोडवण्याचा प्रयत्न केला होता त्याचाही फायदा या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झाला आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.