
BJP Politics in Maharashtra : शिर्डीतील अधिवेशनात भाजप कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा निवडणुकीसाठी सज्ज होण्यास सांगितले आहे. 'श्रद्धा आणि सबुरी'ने वागणाऱ्यांचे भले झाले आहे, पण आता पुढच्या काळात अधिक सावध होण्याचे आव्हान आहे. सत्तेत रममाण होऊन भाजपची काँग्रेस होण्यापासून रोखा, आपण सुखासीन झाल्यास जनतेशी द्रोह होईल, अशा शब्दात भाजप नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावले. याचा अर्थ पक्षापेक्षा स्वहिताकडे लक्ष देणाऱ्या पदाधिकाऱ्यांना, मंत्र्यांना जमिनीवर राहून काम करावे लागणार आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दोन महिने होत आले आहेत. तरीही विरोधक असूनही चाचपडत आहेत. संघटनात्मक बदल करण्यास त्यांना अजूनही सवड मिळालेली नाही. पराभवाचे चिंतन करताना इव्हीएम मशीनमधील छेडछाड करण्याच्या पुढे अजून त्यांना जाता आलेले नाही. काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलण्याची चर्चा असली तरी पक्षातील तरुण नेते अशा वाईट काळात हे पद स्वीकारण्यास तयार नाहीत. महाविकास आघाडीमध्येही एकवाक्यता नाही, ही आघाडी तुटण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे.
या उलट भाजपची स्थिती आहे. विधानसभा निवडणुकीनंतर लगेच सदस्य नोंदणी अभियान सुरु झाले, यात राज्यातील बूथ स्तरापासून ते राज्य पातळीपर्यंत काम करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांना पक्षाने कामाला लावले आहे. प्रदेशाध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याऐवजी रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष होणार आहेत.त्यापूर्वी चव्हाण यांना प्रदेश कार्याध्यक्ष करण्यात आले आहे. तसेच शिर्डी येथे राज्यस्तरीय अधिवेशन घेऊन ऐतिहासिक विजयाबद्दल कार्यकर्त्यांचे, मतदारांचे अभिनंदन केलेच, पण त्यासोबत पुढच्या निवडणुकीसाठी त्यांना सज्ज करण्यात आले आहे.
शिर्डीतील अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा(Amit Shah) यांनी पंचायत ते संसद भाजपचीच सत्ता असली पाहिजे असे स्पष्ट केले. महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भाजपला विजयी करण्यासाठी कंबर कसण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालाने शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या दगाबाजीचे राजकारण संपविले आहे, असे सांगितले. पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वत्र भाजपचीच सत्ता आणायची आहे असे शहा यांनी सांगताना महायुतीचे घटकपक्ष असणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसलाही अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे.
विधानसभेला भाजपचे १३२ आमदार निवडून आले आहेत. शहरी भागासह ग्रामीण भागात वर्चस्व निर्माण झाले आहे. तसे पाहायला गेले तर भाजपला(BJP) विधानसभेत या दोन्ही पक्षांची गरज नाही. परंतु या दोन्ही पक्षांना कमीपणाची वागणूक देणे हे नैतिकदृष्ट्या भाजपसाठी घातक आहे. त्यामुळेच हे दोन्ही पक्ष सत्तेत भाजपसोबत आहेत. पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ही गरज असेलच असे नाही. त्यामुळेच स्वबळावर निवडणुका जिंकण्याची भाषा कार्यकर्त्यांकडून सुरु झालेली आहे. भाजपला पंचायत ते संसद असा एकछत्री अंमल आणायचा आहे, त्याचा धोका शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने वेळीच ओळखावा.
देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) हे त्यांच्याकडे गृहमंत्रिपदही आहे. महाराष्ट्रावर बारीक लक्ष ठेवले जात आहे. लोकसभा निवडणुकीत मालेगावमध्ये झालेल्या एकगठ्ठा मतदानामुळे धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव झाला. हा पराभव भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीमध्ये ‘दक्ष’ झालेल्या भाजपने संघाच्या मदतीने हिंदूंचे एकगठ्ठा मतदान बाहेर काढण्यात यश मिळवले. ‘एक है तो सेफ है’, ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणांवर विरोधकांनी, खुद्द अजित पवारांनीही टीका केली, पण त्यातून भाजपच्या मतदानाचा टक्का वाढवला.
पण हा विषय अजूनही संपलेला नाही. मुस्लिमांचे मतदान वाढविण्यासाठी मालेगावसह अन्य ठिकाणी एकाच दिवशी शेकडो जन्मदाखले काढले जात आहेत, बांगलादेशी घुसखोरांची नावे मतदारयादीत घुसविण्याचे प्रकार सुरु आहेत यावरही फडणवीस यांनी जाहीर वाच्यता केली. गेल्या काही दिवसांपासून राज्यात बोगस मतदार वाढविण्याचा प्रकार सुरु असल्याची चर्चा संघ परिवारात सुरु होती, पण आता गृहमंत्र्यांनीच हे अराजकतावाद्यांचे मनसुबे उधळून लावले जातील अशी ग्वाही दिली आहे.
दुसऱ्या पक्षातून आलेले कार्यकर्ते संघ शिस्तीत राहणार का? भाजपने संघाच्या कार्यपद्धतीनुसार सेवाकार्य करून, दैनंदिन संपर्क ठेवून काम करणे आवश्यक आहे. त्यावरच या अधिवेशनात सर्व नेत्यांच्या भाषणाचा भर होता. नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी तर काँग्रेसची सत्ता गेली याचे समाधान मानू नका, तर काँग्रेसपेक्षा वेगळी कामे आपल्याला करता आली पाहिजेत. अन्यथा त्यांच्यात आणि तुमच्यात काय फरक? असा प्रश्न कार्यकर्त्यांपुढे उपस्थित केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाताना भाजपच्या कार्यकर्त्यांचे मूल्यमापन होणार आहे. गेल्या पाच वर्षांत महापालिका, जिल्हा परिषदांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कामगिरी, प्रशासक असताना या लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले की नाही, की केवळ पक्षाची पदे घेऊन मिरविण्यावर भर दिला याचा विचार मतदार नक्की करतील.
काँग्रेसच्या काळात पदाधिकाऱ्यांची जनतेपासून नाळ तुटली म्हणूनच त्यांचे संघटन कमकुवत झाले आहेत. हेच जर भाजपमध्ये होणार असेल तर दोन्ही पक्षांत फरक काय असा प्रश्न उपस्थित होतो. शिर्डीचे अधिवेशन हे भाजपच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करण्यासाठी होते. पण हे त्यातच खूष न राहता कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी अधिक सक्षमपणे काम केले पाहिजे, असा संदेश यातून देण्यात आला आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.