
Hingoli Crime: हिंगोलीत विलास मुकाडे या पोलिस कर्मचाऱ्याने सासुरवाडीत जाऊन केलेल्या गोळीबारात त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला, तर त्याचा दीड वर्षाचा मुलगा, सासू आणि मेहुणा गंभीर जखमी झाले आहेत.
हादरवून टाकणार्या या प्रकारामुळे 2002 मधील धुळा कोळेकर प्रकरणाची आठवण झाली. त्या प्रकरणाने अख्खा महाराष्ट्र हादरून गेला होता. कोळेकर याने केलेल्या गोळीबारात एका पोलिस निरीक्षकाचा मृत्यू झाला होता, तर एक पोलिस उपअधीक्षक जखमी झाले होते.
पोलिस कर्मचाऱ्यांवर प्रचंड तणाव असतो. एक काम संपायच्या आधी दुसरे तयारच असते. पोलिस दलात मनुष्यबळाची टंचाई आहे. त्यामुळे कामाचा ताण कायम वाढलेला असतो. राजकीय हस्तक्षेप तर ठरलेला असतो. परिणामी, पोलिसांना बहुतांश वेळा आपले काम व्यवस्थित करता येत नाही. त्यामुळे समाजातून पोलिसांवर कायम टीका होत असते. पोलिसांशी मैत्रीही नको आणि शत्रुत्वही नको, असे सातत्याने बोलले जाते. एकंदर पोलिसांची प्रतिमा खलनायक अशी झालेली आहे. याला पोलिसांपेक्षा प्रशासकीय रचना, राजकीय हस्तक्षेप अधिक जबाबदार आहे.
कमी मनुष्यबळ, कामाचा कायमचा ताण आणि काहीवेळा हेकेखोर अधिकाऱ्यांमुळे पोलिसांना सुट्या मिळत नाहीत. नेत्यांचे राजकीय दौरे, सण, उत्सव, मोर्चे आंदोलने यामुळे पोलिसांना अनेकवेळा साप्ताहिक सुट्या मिळणेही दुरापास्त होऊन बसते. त्यामुळे पोलिसांचा स्वभाव चिडचिडा होता. यातूनच 9 मे 2002 रोजी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात जो प्रकार घडला, त्यामुळे महाराष्ट्र (Maharashtra) हादरून गेला होता. धुळा कोळेकर या पोलिस कॉन्स्टेबलने केलेल्या गोळीबारात पोलिस निरीक्षकाचा मृत्यू झाला होत. एक पोलिस उपअधीक्षक आणि एक पोलिस कर्मचारी जखमी झाले होते.
धुळा कोळेकर याला वरिष्ठांकडून त्रास दिला जात होता. त्यामुळे चिडून त्याने गोळीबार केला होता. कोळेकर याला या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली होती. शिक्षा भोगून तो बाहेर आला आहे. तो कारागृहात असताना पत्नीने मुलांचे संगोपन केले. त्यांची दोन मुले पोलिस (Police) दलात नोकरीला लागली आहे. एक अधिकारी, एक कर्मचारी आहे. पोलिसांनी गोळीबार केल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. पोलिसांवरील तणाव इतका टोकाला जात असताना सरकार काय करत आहे, असा प्रश्न पडणे साहजिक आहे. वरिष्ठांकडून कर्मचाऱ्यांना त्रास का दिला जातो, यावरही सरकारने विचार करायला हवा.
याच वर्षी सप्टेंबर महिन्यात छत्तीसगडमध्येही असाच हादरवून टाकणारा प्रकार घडला. छत्तीसगड आर्म्ड फोर्सेसच्या जवानाने त्याच्याजवळील सर्व्हिस रायफलमधून सहकाऱ्यांवर बेछूट गोळीबार केला. त्यात दोघांचा मृत्यू झाला. सहकाऱ्यांसोबत किरकोळ वाद झाल्यानंतर त्या जवानाने गोळीबार केला होता. बलरामपूर जिल्ह्यातील भुती कॅम्पमध्ये हा प्रकार घडला होता. गोळीबारात एक जवान जागीच मृत्युमुखी पडला, तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. या प्रकारानंतर कॅम्पमध्ये हाहाकार उडाला होता.
राजधानी दिल्लीत (Delhi) 2022 मध्ये असाच प्रकार घडला होता. दिल्लीच्या रोहिणीनगर परिसरात सिक्कीम पोलिसांच्या जवानाने तीन सहकाऱ्यांवर गोळीबार केला. त्यात तिघांचाही मृत्यू झाला होता. या सर्व जवानांना तेथे एके ठिकाणी तैनात करण्यात आले होते. गोळीबार करणाऱ्या जवानाचा त्या तिन्ही सहकाऱ्यांसोबत वाद झाला होता. मृत्युमुखी पडलेला एक जवान आणि गोळीबार करणारा जवान एकदाच नोकरीला लागलेले होते. किरकोळ वादाने गंभीर स्वरूप धारण केले होते.
याच महिन्याच्या 14 तारखेला पेण तालुक्यातील दादर सागरी पोलिस ठाण्यात बंदुकीतून गोळी सुटली होती, मात्र तो अपघात होता. बंदूक साफ करताना ही गोळी सुटली होती. त्यात बंदूक साफ करणारी महिला पोलिस कर्मचारीच जखमी झाली. यापूर्वी नागपुरातही असा प्रकार घडला होता. लॉक झालेली बंदूक एक पोलिस कर्मचारी अनलॉक करत होता. त्याचदरम्यान बुंदुकीतून गोळी सुटली होती. त्यात बंदूक अनलॉक करणारा पोलिस कर्मचारी जखमी झाला होता. नागपूर शहरातील पोलिस ठाण्यात हा प्रकार घडला होता.
आता प्रश्न असा निर्माण होतो की, पोलिस दलाचे आरोग्य बिघडलेले आहे का? वरिष्ठ अधिकारी हे कामाच्या सोयीसाठी असतात. असे काही अधिकारी आपल्यासोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्रास का देत असतील? अशा अधिकाऱ्यांना पद कामे करण्यासाठी मिळालेले असते की सहकारी कर्मचाऱ्यांना त्रास देण्यासाठी? या प्रश्नांची उत्तरे सरकारने शोधली पाहिजेत. हिंगोलीत पोलिसाने सासुरवाडीत जाऊन केलेल्या गोळीबाराचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. त्याचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे, हे तर उघडच आहे.
हिंगोलीतील प्रकारामागे कौटुंबिक कारण असेल तर या पोलिसाकडे बंदूक कशी आली, हाही प्रश्न आहे. पोलिसांना नियमानुसार बंदूक घरी नेता येत असेल तर सरकारने त्याचाही काहीतरी विचार केलेला असणार की नाही? एखादा अधिकारी, कर्मचारी बंदूक, पिस्तुलाचा गैरवापर करणार नाही कशावरून? असे अनेक प्रश्न यामुळे निर्माण झाले आहेत. धुळा कोळेकर प्रकरणानंतरच खरेतर सरकारने धडा घ्यायला हवा होता. त्यानंतर पोलिसांनी गोळीबार केल्याचे अनेक प्रकार घडले, चौकशा होत राहिल्या, शिक्षाही झाल्या, मात्र मूळ प्रश्न तसाच राहिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.