
BJP Politics : काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांची नाराजीच्या चर्चांनी सध्या राजकारण तापले आहे. पक्षात आपल्याला डावलले जात असल्याचे संकेत देत त्यांनी आपल्याकडे पर्याय असल्याचे विधान केल्याने आता तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहे. थरुर यांच्या या टायमिंगनेही काँग्रेसची झोप उडवली आहे. आता ही वेळ साधत भाजप थरूर यांच्यासाठी पायघड्या घालणार का, हाही मोठा प्रश्न आहे. थरूर यांना पक्षात घेत सत्ता काबीज करण्यासाठी भाजपकडूनही रणनीती आखली जाऊ शकते. मात्र, थरूर आणि वाद हे समीकरण पाहता ती कितपत यशस्वी होईल, हे सांगणे कठीण आहे.
केरळमध्ये पुढीलवर्षी विधानसभेची निवडणूक आहे. त्यासाठी काही महिनेच उरलेले असताना थरूर यांची नाराजी बाहेर आल्याने त्यांच्या पक्षाला सोडचिठ्ठी देण्यापर्यंतच्या चर्चांना उधाण आले आहे. ते निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये जाऊ शकतात. त्याचा भाजपला मोठा फायदाही होईल, असे बोलले जात आहे. तर दुसरीकडे थरूरांच्या नाराजीपेक्षा काँग्रेस श्रेष्ठींचीच नाराजी थरूर यांना भोवत असल्याचे चित्र रंगवले जात आहे. त्यामुळे थरूर पक्ष सोडणार नाहीत, अशीही चर्चा आहे.
शशी थरूर हे 2009 पासून सक्रीय राजकारणात आले. त्यानंतर लोकसभेच्या प्रत्येक म्हणजे चार निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या तिकीटावर केरळमधून मोठ्या मताधिक्याने निवडून आले. या 16 वर्षांमध्ये थरूर यांच्यामुळे काँग्रेसला अनेकदा अडचणींचा सामना करावा लागला. त्यापैकी सहा मोठ्या वादातून मार्ग काढताना काँग्रेसच्या घशाशी आले होते.
पहिला वाद म्हणजे आयपीएल टीम. थरूर परराष्ट्र राज्यमंत्री असताना 2010 मध्ये त्यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांची कोच्ची आयपीएल टीममध्ये भागीदारी असल्याचे समोर आले. थरूर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप झाल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. थरूर यांच्यामुळे काँग्रेसला हा पहिला मोठा झटका बसला होता.
2014 च्या लोकसभा निवडणुकीआधी सुनंदा पुष्कर यांचा गुढ मृत्यू झाला होता. त्यावेळी थरूर मनुष्यबळ विकास राज्यमंत्री होते. थरूर यांच्यामुळे पत्नीने आत्महत्या केल्याचा आरोप झाला होता. पण नंतर कोर्टाने त्यांची मुक्तता केली होती. पण यामुळे काँग्रेस अडचणीत आली होती. तर लोकसभा निवडणुकीनंतर थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वच्छ भारत अभियानावरून कौतुक केले होते. त्यामुळे त्यांना प्रवक्ते पदावरून हटवण्यात आले होते.
‘हिंदू पाकिस्तान’ या थरूर यांच्या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यांनी 2018 मध्ये आपल्या पुस्तकात लिहिले होते की, भाजपला पुन्हा सत्ता मिळाली तर भारत ‘हिंदू पाकिस्तान’ बनू शकतो. त्यानंतर भाजपने काँग्रेसवर हल्ला चढवत हिंदूंचा अपमान झाल्याचे म्हटले. हा मुद्दा काँग्रेससाठी चांगलाच अडचणीचा ठरला. लोकसभा निवडणुकीत पक्षाला त्याचा फटका बसला.
थरूर यांनी 2022 मध्ये मल्लिकार्जून खर्गे यांच्याविरोधा काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूकही लढली. त्यामुळे गांधी कुटुंबाची नाराजी त्यांनी ओढवून घेतल्याची चर्चा होती. त्यावेळी थरूर यांनी फॅमिली रन पार्टी म्हणत सर्वांनाच धक्का दिला होता. पक्षाला तोंडघशी पाडण्याची ही त्यांची पाचवी वेळ होती.
थरूर यांनी नुकतेच केरळमधील सीपीएम सरकार आणि एलडीएपचे कौतुक केले होते. त्याचवेळी केरळ काँग्रसेच्या नेतृत्वाबाबतही प्रश्न उपस्थित केले होते. पक्षाला आपली गरज नसेल तर आपल्याकडे दुसरे पर्याय आहेत, असेही ते म्हणाले होते. त्यामुळे केरळ काँग्रेसमध्ये खळबळ उडाली. तिथून ते पक्ष सोडण्याची चर्चा सुरू झाली.
सध्याच्या स्थितीत थरूर यांच्या या विधानांमुळे पक्षाची कोंडी झाल्याचे बोलले जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी थरूर यांच्याकडून मुख्यमंत्रिपदाचा दावा केला जाऊ शकतो. पण पक्षाकडून त्यांना फारसे महत्व दिले जाणार नाही, असेच चित्र आहे. असे झाल्यास थरूर दुसरा पर्याय (भाजप किंवा सीपीएम) निवडू शकता. हे काँग्रेससमोर मोठे आव्हान ठरू शकते. त्यामुळे आता थरूर यांच्या पुढील भूमिकेकडे काँग्रेससह भाजप आणि इतर पक्षांचेही लक्ष राहणार आहे.
भाजपकडून त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात. केरळमध्ये भाजपला एकदाही सत्ता मिळालेली नाही. यावेळी पहिल्यांदाच पक्षाचा एक खासदार निवडून आला आहे. जनाधार वाढवण्यासाठी थरूर यांच्यासारखा नेता भाजपला हवाच आहे. त्यामुळे त्यांना पक्षात आणल्यास भाजपसाठी ते फायद्याचे गणित ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.