नवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री (Chief Minister) अमरिंदरसिंग यांना हटवून त्यांच्या जागी चरणजितसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांना आणण्यात आले आहे. चन्नी यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्र्यांनीही शपथ घेतली आहे. काँग्रेसने अंतर्गत नाराजीवर मार्ग काढण्यासाठी ही खेळी खेळली आहे. आजच्या शपथविधीला उपस्थित असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीच हा निर्णय घेतल्याचे समजते.
मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी आज चंडीगडमध्ये सुरू आहे. चरणजितसिंग चन्नी यांना शपथ घेतल्यानंतर सुखजिंदरसिंग रंधावा आणि ओ.पी.सैनी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याच रंधावा यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर होते.आमदारांच्या बैठकीतही त्यांच्याच नावावर एकमत झाल्याची चर्चा होती. त्यामुळं रंधावा यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची गर्दीही जमली होती. काही नेतेही त्यांच्या घरी दाखल झाले होते. परंतु, ऐनवेळी चन्नी यांचे नाव जाहीर करुन पक्षाने सगळ्यांनाच धक्का दिला आहे.
पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. चन्नी यांच्या रुपाने काँग्रेसला पंजाबमध्ये पहिला दलित मुख्यमंत्री मिळाला आहे. अशा वेळी जातीय समीकरणे पाहून राहुल गांधींनी दोन उपमुख्यमंत्री देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने नाराज नेत्यांना खूष करण्याचा हा प्रयत्न होता. राहुल गांधी हे आजच्या शपथविधीसाठी राजभवनावर हजर आहेत. त्यामुळे ते राज्यातील राजकीय घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सुरवातीला मुख्यमंत्रिपदासाठी माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांचे नाव आघाडीवर असल्याचे मानले जात होते. सिद्धू यांना प्रदेशाध्यक्षपद देण्यासाठी जाखड यांना त्यावर पाणी सोडावे लागले होते. ते सध्या आमदार नाहीत. त्यांनी तीनवेळा अबोहार मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले असून, पंजाब विधानसभेत ते 2012-2017 या काळात विरोधी पक्षनेते होते. यानंतर 2017 मध्ये ते गुरदासपूरमधून लोकसभेवर निवडून गेले होते. मागील 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार अभिनेते सनी देओल यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. पण जाखड यांच्या नावाला आमदारांनी विरोध केला होता.
हेही वाचा : मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर होताच भाजपने महिला आयपीएसचं प्रकरण काढलं बाहेर
प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू यांना अमरिंदरसिंग यांचाच विरोध होता. त्यामुळे त्यांचा विरोध पत्करून सिध्दू यांना मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केले गेले नाही. तसेच, प्रदेशाध्यक्षपदी त्यांची नुकतीच निवड केल्यानं त्यांचे नाव शर्यतीत मागे पडले. तर अंबिका सोनी यांनीही मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर रंधवा यांच्या नावावर चर्चा झाली होती. अखेर चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.