Chhagan Bhujbal : 'तिकडे' काय चालले आहे, हे छगन भुजबळांना अडीच वर्षांनंतर कळाले!

Mahayuti Government : मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात महायुती सरकारने आपला वापर करून घेतला आणि बाजूला सारले, अशी त्यांची भावना झाली आहे. अजितदादा भाजपसोबत गेल्यानंतर भुजबळ शरद पवारांसोबत होते. तिकडे काय चालले आहे, हे पाहून येतो, असे म्हणत भुजबळ एके दिवशी शरद पवारांजवळून गेले ते परत आलेच नाहीत. आता 'तिकडे' भुजबळांना धक्का बसला आहे.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : आम्ही तीन पक्षांचे शेत नांगरून दिले, पण आमचे शेत नांगरायचे वेळ आली तेव्हा बैलांसह गडीही परत घेऊन गेले...! हे वाक्य काही दिवसांपूर्वीच कानावर पडले होते. सदाभाऊ खोत बोलले होते. गावगाड्याची ही भाषा खूप काही सांगून जाणारी आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांची निराशा झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची अवस्थाही अशीच झाली आहे. भुजबळ यांनीही भाजपचे शेत नांगरून दिले होते, भुजबळांचे शेत नांगरायची वेळ आल्यानंतर त्यांच्याच पक्षाने बैलांसकट गडीही परत नेले. तिकडे, म्हणजे अजितदादांच्या पक्षात काय चालले आहे, हे अडीच वर्षांनंतर भुजबळ यांच्या लक्षात आले.

छगन भुजबळांच्या राजकारणाचे एक चक्र पूर्ण झाले आहे, असे म्हणता येईल. मुंबईतील मंडईत भाजी विक्री करत शिक्षण घेत मुंबईचे महापौरपद, उपमुख्यमंत्रिपद, विविध मंत्रिपदे भूषवणारे भुजबळ यांचा इतिहास पक्षबदलाचा आहे. शिवसेनेतून बाहेर पडून ते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये दाखल झाले.

काँग्रेसमधून बाहेर पडून शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, त्यावेळीही भुजबळ त्यांच्यासोबत राहिले. दोन, अडीच वर्षांपूर्वी अजितदादा पवार हे शरद पवार यांच्यापासून वेगळे झाले, त्यावेळी मात्र भुजबळ हे अजितदादांच्या सोबत राहिले.

Chhagan Bhujbal
Devendra Fadnavis : काँग्रेसच्या पटोलेंचा पुन्हा तोच प्रश्न; मग 'सीएम' फडणवीसांनीही दिलं भन्नाट उत्तर

भुजबळांचा अजितदादांसोबत जाण्याचा किस्सा रंजक आहे. शरद पवारांची साथ सोडल्यानंतर अजितदादा पवार (Ajit Pawar) उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार होते, त्याच्या काही दिवस की काही तास आधीपर्यंत छगन भुजबळ हे सिल्व्हर ओकवर होते. सिल्व्हर ओक हे शरद पवार यांचे मुंबईतील निवासस्थान. तिकडे, म्हणजे अजितदादांच्या पक्षात काय चालले आहे, हे जरा पाहून येतो, असे म्हणून भुजबळ सिल्व्हर ओकवरून निघाले, ते अद्याप परत आले नाहीत, असे शरद पवार यांनी मागे एकदा सांगितले होते. तिकडे गेल्यानंतर आपला व्यवस्थित वापर करून घेण्यात आला आणि अलगदपणे बाजूला सारण्यात आले, हे भुजबळ यांच्या आता लक्षात आले आहे.

आम्ही तीन पक्षांचे शेत नांगरून दिले, असे सदाभाऊ का म्हणतात, हे समजून घ्यावे लागेल. महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर महायुतीचे सरकार आले. टीका सत्ताधाऱ्यांवर होत असते, जाब सत्ताधाऱ्यांना विचारला गेला पाहिजे, मात्र सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून भाजपने विरोधकांना जाब विचारायला सुरुवात केली. पडळकर, खोत यांनी शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली. ताजे उदाहरण पाहायचे असेल मारकडवाडी येथील त्यांची भाषणे आठवतात का पाहा.

Chhagan Bhujbal
Bjp News : फडणवीसांच्या लाडक्या नेत्याचे मोठे विधान; म्हणाले, 'नाराज नाही, पण..'

या दोघांचे शेत नांगरायची वेळ आली, तेव्हा महायुतीने बैल, नांगर आणि गडीही परत नेले. आम्हाला मंत्रिमंडळात स्थान हवे होते, ते मिळाले नाही, असे खोत यांना म्हणायचे होते. भुजबळ यांचेही असेच झाले आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याविरोधात भुजबळ यांनी टोकाची भूमिका घेतली होती. तशी भूमिका भुजबळ यांनी स्वतःहून घेतली होती, असे म्हणता येणार नाही. त्यांच्या पाठीमागे सत्ताधारी पक्षातील नेते होते, याबाबत शंका नाही. भुजबळ यांनी ओबीसींची बाजू जोरकसपणे मांडली. महायुतीला निवडणुकीत त्याचा फायदा झाला, हे नाकारता येणार नाही.

भुजबळ हे भल्याभल्यांना अंगावर घेतात, हे खरे आहे, मात्र ते स्वतःहून घेत नाहीत. प्रत्येकवेळी कोणाचे तरी पाठबळ त्यांना असते. भुजबळ यांनी शिवसेना सोडत बाळासाहेब ठाकरे यांना आव्हान दिले होते. त्यावेळी शरद पवार त्यांच्या पाठिशी होते. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर वेगळा गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी भुजबळ आणि त्यांच्या आमदारांना विधानसभेत येणे गरजेचे होते. मात्र त्यावेळी शिवसेनेची दहशत इतकी होती की भुजबळांना भूमिगत व्हावे लागले होते. तत्कालीन मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांनी संरक्षण देऊन त्यांना विधीमंडळात आणले होते.

Chhagan Bhujbal
Vijay Shivtare : मंत्रिपदासाठी पत्ता कट; आता शिवसेनेच्या विजय शिवतारेंसमोर नवं संकट..? अडचणी वाढणार

मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात बोलण्यासाठीही भुजबळ यांना कुणाचे तरी पाठबळ होते, हे नाकारता येत नाही. काम संपले, सत्ता आली आणि मनोज जरांगे पाटील यांनाही दुखवायचे नाही, यामुळे भुजबळांचा पत्ता कट करण्यात आला. भुजबळांच्या बोलण्याचा रोखही तसाच आहे. जरांगे यांना अंगावर घेतल्याचे बक्षीस मला मिळाले, असे विधान त्यांनी केले आहे. शरद पवार यांच्याशी जवळीकही भुजबळ यांना महागात पडल्याचे दिसत आहे. आरक्षणाचा वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करावी, असे म्हणत भुजबळ यांनी मागे शरद पवार यांची भेट घेतली होती.

तिकडे गेलेले भुजबळ आता दुखावले गेले आहेत. असे असले तरी ते तिकडून इकडे परत येतील का, हे निश्चितपणे सांगता येत नाही. भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे ओबीसी नाराज होणार नाहीत, का असा प्रश्न कोणाच्याही मनात निर्माण होऊ शकतो. भुजबळ एकटेच ओबीसी नाहीत, असे विधान त्यांच्याच पक्षाच्या एका नेत्याने केले आहे.

Chhagan Bhujbal
Ajit Pawar News : अजितदादा विधानसभेत परतले; मौन अन् राग कायम..

नाहीतरी विधानसभेची निवडणूक आता पाच वर्षांनंतर होणार आहे. भुजबळ यांना डावलून सत्ताधाऱ्यांनी जरांगे यांची इच्छा पूर्ण केली आहे, अशी टीका ओबीसी बहुजन आघाडीचे नेते प्रकाश शेंडगे यांनी केली आहे. शेंडगे यांची टीका बोलकी, अर्थपूर्ण आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com