.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Maharashtra Politics : मागील काही महिन्यांत राजकारणाचे झालेले गुन्हेगारीकरण अवघ्या महाराष्ट्राने ‘याची देही याची डोळा’ पाहिले. राजकीय पक्षांचे कथित कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची गुंडगिरी राज्यात किती फोफावली आहे, हे गुंड किती निर्भिड झाले आहेत, याची व्हिडिओ दररोज बाहेर येत आहेत. पण हे काही पहिल्यांदाच होत नाही. यापूर्वीही राजकारणातील गुन्हेगारीवर अनेकदा चिंता व्यक्त करण्यात आली आहे. पण त्याकडे फारसे कुणी गांभीर्याने पाहिले नाही.
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. त्यानंतर बीडमधील गुंडांचे अनेक व्हिडिओ समोर आले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी असे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियात पोस्ट केले. हातात बंदुका घेऊन बिनधास्तपणे वावरणारे, सर्वसामान्यांना निर्दयपणे मारहाण करणारे हे गुंड कुणी पोसले, त्यांच्याकडे एवढी हिमंत आली कुठून, एवढा पैसा कसा मिळतो, असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले.
देशमुख हत्या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा अत्यंत जवळचा वाल्मिक कराडचा हात असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यानंतर भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यासह अनेकांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानुसार नुकताच त्यांनी राजीनामाही दिला. त्यानंतर काही तासांतच धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले म्हणजेच खोक्या भाईने एकाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर त्याचे अनेक कारनामे बाहेर आले. आता धसही टार्गेटवर आले आहेत.
केवळ बीडच नव्हे तर असे खोक्या भाई, आका संपूर्ण महाराष्ट्रात आहेत. याअनुषंगाने अंजली दमानिया यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेत्यांना समज देण्याची विनंती केली आहे. दमानिया यांनी सोशल मीडियातून ही माहिती दिली होती. त्यांनी म्हटले होते की, महाराष्ट्रात (मुख्यतः बीडमध्ये) चाललेल्या ह्या दहशतीवर, मुख्यमंत्र्यांनी युतीतल्या आणि विरोधी पक्षाच्या आमदारांना, आता तरी समज देण्याची गरज आहे. त्यांनी तशी समज अधिवेशनात द्यावी, असा मेसेज मुख्यमंत्र्यांना केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी याच अधिवेशनात करतो, असे उत्तर दिले होते.
दमानियांची विनंती मान्य करून फडणवीस अधिवेशनात समज देतील की नाही, लवकरच समजेल. पण आता केवळ समज देऊन भागणार नाही. सुसंस्कृत महाराष्ट्रात घडलेल्या घटनांनी निश्चितच मान खाली गेली आहे. राजकारणातील गुन्हेगारी मोडित काढणे तेवढे सोपे नाही. पण किमान असे गुंड, आकांवर अंकुश ठेवण्यासाठी पावले टाकायला हवीत. त्यांना लंगडं केल्याशिवाय राजकारणातील गुन्हेगारी कमी होणार नाही. त्यासाठी पुढाकार घेऊन आपली ताकद दाखवून देण्याची ही संधी देवाभाऊंनी दवडू नये.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.