Latest Political News : दक्षिणेतील प्रसिद्ध अशा राजकीय कुटुंबातील कलह आता निर्णायक वळणावर आला आहे. एकेकाळी भावाच्या अटकेविरुद्ध राज्याचा काही भाग पायी पालथा घातलेल्या बहिणीने आता काँग्रेसमध्ये प्रवेश करून दंड थोपटल्यामुळे तिला मुख्यमंत्री भावाच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. होय, अविभाजित आंध्र प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचे हे कुटुंबीय. आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी आणि त्यांच्या भगिनी, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष वाय. एस. शर्मिला यांच्यातील राजकीय शत्रुत्व टोकाला जाताना दिसत आहे. मुख्यमंत्री भावाकडून घरात नजरकैद केले जाण्याच्या भीतीने शर्मिला यांनी अख्खी रात्र पक्ष कार्यालयात काढली. त्यामुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. (CM Jagan Mohan Vs YS Sharmila)
वाय. एस. राजशेखर रेड्डी हे मूळचे काँग्रसचे (Congress). ते प्रचंड लोकप्रिय होते. ते मुख्यमंत्री असताना 9 सप्टेंबर 2009 रोजी हेलिकॉप्टर अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मुख्यमंत्रिपदी जगनमोहन रेड्डी यांची निवड होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी तसे केले नाही. त्यामुळे जगनमोहन रेड्डी यांनी 2011 मध्ये वायएसआर काँग्रेस (YSR Congress) या पक्षाची स्थापना केली. त्यानंतर बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणांनी जगनमोहन यांना 2012 मध्ये अटक केली. त्यानंतर शर्मिला यांनी राज्यात पदयात्रा काढली. पदयात्रेदरम्यान त्या तीन हजार किलोमीटर फिरल्या, भावाची अटक कशी चुकीची आहे, याबाबत त्यांनी जनजागृती केली.
वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या निधनानंतर काही समर्थकांनी जीव दिला होता. त्यांच्या कुटुंबीयांना या पदयात्रेदरम्यान शर्मिला यांनी भेटी दिल्या होत्या. काँग्रेसचा याला विरोध होता. त्यातूनच रेड्डी कुटुंबीयांनी वेगळा पक्ष स्थापन केला होता. त्यानंतर त्याच वर्षात विधानसभेच्या 18 जागांवर पोटनिवडणूक झाली होती. त्यापैकी वायएसआर काँग्रेसने 15 जागा जिंकल्या होत्या. याचे श्रेय वाय. एस. शर्मिला यांच्या वाट्याला गेले होते. अर्थात, शर्मिला यांच्यामुळेच पक्षाला घवघवीत यश मिळाले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
असे असले तरी शर्मिला यांना सत्तेत वाटा मिळाला नाही. पक्षाने त्यांच्याकडे अपेक्षित असे लक्ष दिले नाही. त्यांनी कोणतीही निवडणूक लढवली नाही. त्यावेळेसपासून कुटुंबामध्ये दरी निर्माण झाली. 2019 मध्ये आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) वायएसआर काँग्रेसची सत्ता आली. जगनमोहन रेड्डी मुख्यमंत्री झाले. यादरम्यानच्या काळात शर्मिला यांच्या क्षमतेकडे, त्यांच्या लोकप्रियतेकडे भावाने साफ दुर्लक्ष केले. जगनमोहन यांच्या मातोश्री वाय. एस. विजयम्मा यांनी मात्र आपले वजन कन्या शर्मिला यांच्या पारड्यात टाकले आहे. त्या शर्मिला यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत. वायएसआर काँग्रेसमधून बाजूला फेकले गेल्यानंतर शर्मिला यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकीत शर्मिला यांच्या पक्षाने काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा दिला होता.
अपेक्षेप्रमाणे शर्मिला यांनी यावर्षी जानेवारीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना आंध्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यपद मिळाले. त्यावेळेसपासून त्या राज्यात सक्रिय झाल्या आहेत. जगनमोहन यांच्या पक्षातील काही आमदार आणि खासदार नाराज आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत आपली उमेदवारी कापली जाणार आहे, याची कुणकुण त्यांना लागली आहे. त्यामुळे काहीजण काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. आंध्र प्रदेशात मृतप्राय अवस्थेतील काँग्रेसला शर्मिला यांच्यामुळे नवसंजीवनी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यातून बहीण-भावातील राजकीय शत्रुत्व टोकाला गेले आहे.
बेरोजगारीच्या विरोधात शर्मिला यांनी आंदोलन छेडले आहे. गुरुवारी (22 फेब्रुवारी) त्यांच्या नेतृत्वाखाली विजयवाडा शहरातून 'चलो सचिवालय' या आंदोलनाची सुरुवात केली जाणार आहे. त्याच्या आधी मुख्यमंत्री भावाकडून आपल्याला घरात नदरकैदेत ठेवले जाऊ शकते, याची कुणकुण लागल्याने बुधवारची रात्र शर्मिला यांनी विजयवाडा येथे काँग्रेसच्या कार्यालयातच काढली. विद्यार्थी आणि तरुणांच्या समस्या सोडवण्यात राज्य सरकारला पूर्ण अपयश आले आहे. सरकाने या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम पक्षही शक्तिशाली आहे. असे असताना मुख्यमंत्री जगनमोहन यांनी मात्र बहिणीचा धसका घेतला आहे. याला कारणही तसेच आहे. जगनमोहन हे अटकेत असताना राज्याने शर्मिला यांचा झंजावात पाहिलेला आहे. पोटनिवडणुकीत 18 पैकी 15 जागा शर्मिला यांच्यामुळेच जिंकता आल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्री भावाने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बहिणीचा धसका घेतला आहे.
(Edited By - Rajanand More)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.