Amit Deshmukh News: लातूरच्या देशमुखांची अखेर धाराशिवमध्ये एन्ट्री, निष्ठावंत काँग्रेसजनांना बळ देणार

Congress Dharashiv Politics: विलासराव देशमुख यांची धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेसच्या राजकारणावरही पकड होती. त्यांच्या निधनानंतर ती सैल झाली होती. आता धाराशिव जिल्ह्यात काँग्रेसमध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे.
Amit Deshmukh News
Amit Deshmukh NewsSarkarnama
Published on
Updated on

लातूरच्या देशमुखांची अखेर धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील काँग्रेसच्या (Congress) राजकारणात एन्ट्री होण्याचे संकेत मिळत आहेत. माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसच्या नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी निष्ठावंतांना बळ देण्यासाठी हात पुढे केला आहे. जिल्ह्यातील काँग्रेसचे निष्ठावंत नेते आणि कार्यकर्त्यांनी 25 मार्च रोजी लातूर येथे जाऊन आमदार देशमुख यांची भेट घेतली.

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना मानणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांची संख्या धाराशिव जिल्ह्यातही मोठी आहे. कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी विलासराव देशमुख हे अगदी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारालाही धाराशिव जिल्ह्यात यायचे. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांसह लोकांचीही गर्दी होत असे. त्यांच्या निधनानंतर लातूरच्या देशमुखांचे धाराशिव जिल्ह्यातील पक्षसंघटनेकडे फारसे लक्ष नव्हते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माजी राज्यमंत्री बसवराज पाटील (मुरुमकर) आणि लातूरचे देशमुख यांच्यात फारसे सख्य नाही. आता पाटील हे भाजपवासी झाल्यानंतर देशमुख सक्रिय झाल्याचे दिसत आहेत. येत्या काही दिवसांत उमरगा येथे काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हा सचिव, भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अश्लेष मोरे (उमरगा) यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील निष्ठावंत नेते, कार्यकर्त्यांनी अमित देशमुख यांची लातूर येथे भेट घेतली.

या मेळाव्याला आमदार देशमुख यांनी उपस्थित राहावे, असे निमंत्रण या शिष्टमंडळाने त्यांना दिले. त्यासाठी आमदार देशमुख यांनी होकार दिला आहे. उमरगा-लोहारा तालुक्यांत काँग्रेसची विचारधारा मानणाऱ्या नागरिकांची, कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची संख्या मोठी आहे.

बसवराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे या घटकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठी तातडीने हालचाली करणे गरजेचे होते. यासाठी जिल्हा सचिव मोरे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांना कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे सहकार्य मिळत आहे. सर्व निष्ठावंतांना सोबत घेऊन त्यांचा सन्मान राखण्याची जबाबदारी मोरे यांच्यावर येऊन पडली आहे. मोरे यांच्या पाठिशी राजकीय, शैक्षणिक कार्याचा मोठा वारसा आहे. त्या बळावर त्यांना उमरगा-लोहारा तालुक्यातील काँग्रेसमधील नेतृत्वाची पोकळी भरून काढण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

Amit Deshmukh News
Shiv Sena News: अजितदादांना गरज नाही? शिंदे सेना लावणार पुणे लोकसभेसाठी ताकद! मेसेज वायरल...

लातूर येथे आलेल्या शिष्टमंडळाला मार्गदर्शन करून अमित देशमुख यांनी त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसची विचाराधारा स्वतंत्र आहे, सर्वांना सामावून घेणारी आहे. निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बळावर धाराशिव जिल्ह्यात काँग्रेस पुन्हा उभारी घेईल. कार्यकर्त्यांनी काँग्रेसची विचारधारा सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन आमदार देशमुख यांनी केले. यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

पक्षाने दिलेली कोणतीही जबाबदारी आम्ही पार पाडू, असे मोरे यांनी आमदार देशमुख यांना सांगितले. याद्वारे आमदार देशमुख यांची धाराशिवच्या राजकारणात एन्ट्री झाली आहे. सध्या नेतृत्वहीन दिसणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेसला आमदार अमित देशमुख खरेच मदत करतील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. देशमुखांना भेटलेल्या शिष्टमंडळात मोरे यांच्यासह जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, उपाध्यक्ष विजयकुमार सोनवणे, उमरगा तालुकाध्यक्ष सुभाष राजोळे, ज्येष्ठ नेते बलभीमराव पाटील आदींचा समावेश होता.

उमरगा-लोहारा तालुक्यांत काँग्रेसला मानणारा मतदार मोठ्या संख्येने असला तरी गेल्या 20 वर्षांपासून म्हणजे चार टर्मपासून या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार विजयी झालेला नाही. 2004 च्या निवडणुकीत शिवसेनेचे प्रा. रवींद्र गायकवाड यांनी बसवराज पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2009 मध्ये हा मतदारसंघ राखीव झाला. त्यामुळे बसवराज पाटील यांना काँग्रेसने औसा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. तेथून ते सलग दोन वेळा विजयी झाले.

इकडे उमरगा -लोहारा मतदारसंघात शिवसेनेने ज्ञानराज चौगुले यांना उमेदवारी दिली. तेव्हापासून सलग तीन वेळा चौगुले या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत काही प्रमाणात मरगळ आली होती. आता बसवराज पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे त्यात आणखी भर पडली आहे. त्यामुळे आमदार अमित देशमुख यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांना स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची साथ कशी मिळते, यावर भविष्यातील समीकरणे अवलंबून असतील.

Edited by: Mangesh Mahale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com