Congress News : बैल गेला आणि झोपा केला; प्रदेश काँग्रेसला अखेर एकदाची जाग आली

Maharashtra Congress News : महाराष्ट्रातील आपले 21 आमदार निष्क्रिय आहेत, मतदारसंघांत त्यांची कामगिरी चांगली नाही, याची जाणीव काँग्रेसच्या नेतृत्वाला त्यांचा कार्यकाळ संपत आलेला असताना, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झाली आहे.
soniya gandhi mallikarjun kharge rahul gandhi nana patole
soniya gandhi mallikarjun kharge rahul gandhi nana patolesarkarnama
Published on
Updated on

सरकारी काम आणि सहा महिने थांब.. अशी म्हण समाजात रूढ झालेली आहे. ग्रामीण भागात तर ती सतत कानावर पडत असते. याचा अर्थ असा की सरकारी काम कधी होईल याचा भरवसा नसतो, एखाद्याला अत्यंत निकडीचे, नियमांत बसणारे, कायदेशीर काम असले तरी सरकारी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. पैसे दिल्याशिवाय एखादे सरकारी काम होऊ शकते, यावर सहसा कोणाचाही विश्वास बसणार नाही. काँग्रेस पक्षसंघटनेचीही गत अशीच झाली आहे.

नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे ( Congress ) काही आमदार फुटले होते. त्यापूर्वी, 2022 मध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीतही काँग्रेसच्या काही आमदारांनी पक्षविरोधी भूमिका घेतली होती. त्यांच्यावर काँग्रेसने कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. काँग्रेसश्रेष्ठी अशा आमदारांना शरण गेले.

नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीतही पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्यांवर कारवाई करणार, असे ढोल पिटण्यात आले, मात्र ठोस अशी कारवाई करण्यात आलेली नाही. संबंधित आमदारांना विधानसभा निवडणुकीत ( Assembly Election ) उमेदवारी देण्यात येणार नाही, असा निर्णय पक्षाने घेतला आहे. विधानसभा निवडणुकीला आणखी दोन महिने वेळ आहे. तोपर्यंतच काय होईल, हे सांगता येत नाही. अशा आमदारांची हकालपट्टी करून संदेश देणे सहजशक्य होते, मात्र काँग्रेसने तसे केले नाही.

आता विधानसभेचा कार्यकाळ संपत आलेला असताना आपले 21 आमदार निष्क्रिय असल्याचा, संबंधित मतदारसंघांत त्यांची कामगिरी चांगली नसल्याचा शोध काँग्रेसच्या नेतृत्वाला लागला आहे. बरे, असेही नाही की राज्यात काँग्रेसचे 100-150 आमदार आहेत. काँग्रेसच्या आमदारांची संख्याच इन मिन 44, त्यांच्यावरही प्रदेश नेतृत्वाला लक्ष ठेवता येत नसेल तर कसे व्हायचे? गेली पाच वर्षे नेतृत्वाच्या लक्षात हे का आले नसेल? आता या 21 आमदारांचे तिकीट कापण्याचे आदेश हायकमांडने दिले आहेत. वेळीच लक्षात घेऊन नेतृत्वाने ही बाब संबंधित आमदारांच्या कानावर घालून त्यांच्या कामात सुधारणा करण्याची सूचना द्यायला हवी होती. या आमदारांची कामगिरी चांगली नाही, असा निष्कर्ष नेतृत्वाचा असेल तर संबंधित 21 मतदारसंघांतील मतदारांचा काँग्रेसकडून अपेक्षाभंग झाला आहे, असे म्हणायला जागा आहे. मग काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वालाही यासाठी दोषी धरायला हवे.

soniya gandhi mallikarjun kharge rahul gandhi nana patole
Tanaji Sawant : आरोग्यमंत्री सावंतांनी फुंकले रणशिंग, मात्र तोंड गोड ठेवण्याचे आव्हान

लोकसभेच्या निवडणुकीत 13 जागा जिंकत काँग्रेस राज्यात क्रमांक एकचा पक्ष बनला. सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनीही नंतर काँग्रेससोबत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे काँग्रेसच्या खासदारांची संख्या 14 झाली आहे. काँग्रेसकडे राज्यव्यापी नेतृत्व नाही. लोकसभा निवडणुकीत वातावरण केंद्र सरकारच्या विरोधात होते. भाजपच्या काही नेत्यांनी राज्यघटना बदलण्याची भाषा केली होती. त्यामुळे दलित, मुस्लिम मतदार काँग्रेसच्या मागे एकवटले. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचाही महाविकास आघाडी आणि काँग्रेसला फायदा झाला. भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रमुख प्रादेशिक पक्ष फोडले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद गेले होते. या सर्व बाबींची सहानुभूती उद्धव ठाकरे, शरद पवार यांना मिळाली. महाविकास आघाडी भक्कम राहिल्यामुळे वाहत्या गंगेत काँग्रेसचेही हात धुवून निघाले.

महाविकास आघाडी सरकारची अडीच वर्षे वगळता 2014 पासून काँग्रेस राज्यात सत्तेत नाही. या काळात सक्षम विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला पुढे येता आले असते, मात्र तसे झाले नाही. विरोधात असतानाच्या काळात काँग्रेसने रस्त्यावर उतरून जनतेच्या प्रश्नांवर किती आंदोलने केली, हा संशोधनाचा विषय आहे. उलट अनेक महत्वाच्या पदांवर बसून सत्ता उपभोगलेल्या काँग्रेसच्या काही नेत्यांनी भाजपची वाट धरली. जनता महागाई, बेरोजगारीच्या प्रश्नांमुळे त्रस्त झालेली असताना काँग्रेसचे सरंजामी मानसिकतेचे नेते निवांत राहिले. शेजारच्या कर्नाटक आणि तेलंगणा राज्यांत अनुक्रमे डी. के. शिवकुमार आणि रेवंथ रेड्डी यांनी कशाप्रकारे पक्ष वाढवला आणि स्वबळावर सत्ता मिळवली, याचाही अभ्यास महाराष्ट्रातील प्रदेश नेतृत्वाने केला नाही.

soniya gandhi mallikarjun kharge rahul gandhi nana patole
Tanaji Sawant : आरोग्यमंत्री सावंतांनी फुंकले रणशिंग, मात्र तोंड गोड ठेवण्याचे आव्हान

बैल गेला आणि झोपा केला, या म्हणीप्रमाणे काँग्रेसची अवस्था झाली आहे. शेतकरी बैलासाठी शेतात निवारा बांधतात. त्यात बैल सुरक्षित राहतात. मात्र निवारा नसला की बैल उघड्यावर बांधले जातात आणि त्यांची चोरी होते. त्यानंतर मग शेतकऱ्याला बैलांसाठी निवारा बांधण्याची कल्पना सुचते. आता काँग्रेसची अवस्था अशीच झाली आहे. राज्यसभा, विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या आमदारांवर काँग्रेसने तडकाफडकी ठोस कारवाई केली नाही.

लोकांनी निवडून दिलेले आपले आमदार काय काम करत आहेत, लोकांच्या अडीअडचणींच्या वेळी धावून जाताहेत किंवा नाही, त्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरत आहेत की नाही, हेही पाहिले नाही. राज्यातील काँग्रेसने खरेतर राहुल गांधी यांचे आभार मानले पाहिजेत. राहुल गांधी यांनी काढलेल्या दोन यात्रा आणि शरद पवार, उद्धव ठाकरे यांना असलेल्या सहानुभूतीच्या बळावर काँग्रेसची नाव किनाऱ्याला लागली. या संधीचे सोने करायचे की पुन्ही बैल गेला आणि झोपा केला, या म्हणीप्रमाणेच वागायचे, हे काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाला ठरवावे लागणार आहे.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com