तुम्ही मुख्यमंत्री बनताय, असं राहुल गांधींनी सांगताच विश्वासच बसला नाही!

पंजाबमध्ये अमरिंदरसिंग यांना हटवून त्यांच्या जागी चरणजितसिंग चन्नी यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले.
Rahul Gandhi and Charanjit Singh Channi
Rahul Gandhi and Charanjit Singh Channi
Published on
Updated on

नवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) अमरिंदरसिंग यांना हटवून त्यांच्या जागी चरणजितसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांना मुख्यमंत्री (Chief Minister) बनवण्यात आले. चन्नी यांच्या रुपाने पंजाबला पहिला दलित मुख्यमंत्री मिळाला आहे. आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीच चन्नी यांनी मुख्यमंत्री बनवण्याच्या पडद्यामागील घडामोडी उघड केल्या आहेत.

काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत बोलताना राहुल गांधी यांनी चन्नी हे मुख्यमंत्री बनले त्यावेळचा किस्सा सांगितला. ते म्हणाले की, अमरिंदरसिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर चन्नी यांना फोनवर ते पुढील मुख्यमंत्री असतील, असे मी सांगितले होते. त्यावेळी चन्नी यांना रडू आवरता आले नाही. चन्नी यांचा विश्वासच बसत नव्हता की ते मुख्यमंत्री बनत आहेत. एका मागास समाजातील व्यक्तीला हे पद मिळत असल्याने त्यांचा यावर विश्वास बसत नव्हता. त्यांनी हे मला बोलून दाखवले होते.

कोरोना संकट सुरू झाल्यानंतरची काँग्रेस कार्यकारी समितीची ही पहिलीच बैठक होती. पक्षाच्या अध्यक्षपदासह संघटनात्मक फेरबदलाची मागणी जी-23 या नेत्यांच्या गटाने केली होती. या मागणीवर चर्चा करुन पक्षातील फेरबदल पुढील वर्षी सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. पुढील वर्षी पंजाब आणि उत्तर प्रदेशसह अन्य काही राज्यांत विधानसभा निवडणुका आहेत. त्याआधी पक्षाला नवीन अध्यक्ष मिळणार आहे.

बैठकीत ज्येष्ठ नेत्यांनी राहुल गांधींनी अध्यक्षपद स्वीकारावे, अशी जोरदार मागणी केली. या मागणीवर मी विचार करेन, अशी सकारात्मक भूमिका राहुल गांधींनी घेतली. पक्षातील नेत्यांकडून विचारधारेच्या पातळीवर स्पष्टता आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी निवडणुका होईपर्यंत राहुल गांधींनी हंगामी अध्यक्ष तरी व्हावे, असा आग्रह काही नेत्यांनी बैठकीत धरला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Rahul Gandhi and Charanjit Singh Channi
कॅप्टन पुन्हा काँग्रेसला देणार धक्का! अमित शहांच्या भेटीला दिल्लीत

पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. चन्नी यांच्या रुपाने काँग्रेसला पंजाबमध्ये पहिला दलित मुख्यमंत्री मिळाला आहे. चरणजितसिंग चन्नी यांना शपथ घेतल्यानंतर सुखजिंदरसिंग रंधावा आणि ओ.पी.सैनी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. जातीय समीकरणे पाहून राहुल गांधींनी दोन उपमुख्यमंत्री देण्याचा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने नाराज नेत्यांना खूष करण्याचा हा प्रयत्न होता. राहुल गांधी हे शपथविधीसाठी राजभवनावरही हजर होते.

Rahul Gandhi and Charanjit Singh Channi
जिवंत असलेले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना क्रीडामंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

सुरवातीला मुख्यमंत्रिपदासाठी माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांचे नाव आघाडीवर असल्याचे मानले जात होते. प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू यांना अमरिंदरसिंग यांचाच विरोध होता. त्यामुळे त्यांचा विरोध पत्करून सिध्दू यांना मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केले गेले नाही. तसेच, प्रदेशाध्यक्षपदी त्यांची नुकतीच निवड केल्यानं त्यांचे नाव शर्यतीत मागे पडले. तर अंबिका सोनी यांनीही मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला. अखेर चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com