Congress News: केजरीवालांपाठोपाठ काँग्रेसकडूनही भाजपला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न

Lok Sabha Election 2024: पुढील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ७५ वर्षांचे होणार आहेत. भाजपच्या नियमानुसार ते निवृत्त होतील आणि अमित शाह पंतप्रधान होतील, असा दावा करून कारागृहातून बाहेर आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अऱविंद केजरीवाल यांनी खळबळ माजवली होती. त्यापाठोपाठ काँग्रेसनेही आता या मुद्यावरून भाजपला खिंडीत गाठले आहे.
Congress News Lok Sabha Election 2024
Congress News Lok Sabha Election 2024Sarkarnama

भाजपमध्ये काही नियम आहेत. जसे की अमुक वयानंतर राजकारणातून निवृत्ती, निवडणूक लढवायची नाही किंवा मार्गदर्शक मंडळात रवानगी. अपवाद वगळता हे नियम काटेकोरपणे पाळले जातात. हे नियम लिखित असतीलच असे नाही. त्यामुळे त्यातून पळवाट शोधणेही सोपे जाते. तशीच पळवाट शोधण्यासाठी भाजपची आता धडपड सुरू झाली आहे. त्यामुळे भाजपमध्ये पक्षांतर्गत लोकशाही आहे का, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होऊ लागला आहे.

कथित मद्य घोटाळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कारागृहात होते. निवडणुकीसाठी त्यांना जामीन मिळाला आहे. जामीनावर बाहेर येताच त्यांनी भाजपवर जणू बॉम्बच टाकला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)हे पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये 75 वर्षांचे होणार आहेत. त्यामुळे भाजपला बहुमत मिळालेच तर पुढील वर्षी अमित शाह पंतप्रधान होतील. मोदी आणि शाह यांनी भाजपमधील अनेकांचे राजकारण संपवले आहे.

भाजपची सत्ता आली तर आता पहिल्या दोन महिन्यांत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पदावरून हटवले जाईल, असाही दावा केजरीवाल यांनी केला आहे. केजरीवाल यांच्यापाठोपाठ काँग्रेसनेही भाजपवर या मुद्द्यावरून निशाणा साधला आहे. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्याप्रमाणेत वयाच्या 75 वर्षांनंतर नरेंद्र मोदी यांनाही राजकारणातून निवृत्त केले जाईल, का असा प्रश्न काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala) यांनी भाजपला केला आहे.

अँटी इन्कमबन्सीबाबत पत्रकारांनी अमित शाह यांनी एप्रिल 2019 मध्ये एक प्रश्न विचारला होता. प्रत्येक मतदारसंघात संबंधित उमेदवार नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच उमेदवार असतील. मोदींना पंतप्रधान करण्यासाठीच देश मतदान करणार आहे, असे अमित शाह त्यावेळी म्हणाले होते. या निवडणुकीतही परिस्थिती वेगळी नाही. राज्यात अनेक मतदारसंघांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभा झाल्या.

Congress News Lok Sabha Election 2024
Lata Shinde News: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यासाठी मिसेस मुख्यमंत्री मैदानात!

मतदारसंघातील संबंधित उमेदवाराला मत म्हणजे मलाच (नरेंद्र मोदी) मत, असे त्यांनी प्रत्येक जाहीर सभेत सांगितले. निवडणूक स्वतःभोवती केंद्रीत करण्याचा प्रयत्न यावेळी मोदी यांनी जाणीवपूर्वक केला आहे. सलग दहा वर्षांपासून केंद्रात भाजपचे सरकार आहे. विविध मुद्द्यांवरून लोकांमध्ये सरकारबद्दल नाराजी असू शकते, याची जाणीव मोदी यांना असणार. आपल्या लोकप्रियतेचा फायदा व्हावा आणि लोकांनी ती नाराजी विसरावी, यासाठी अमुक उमेदवाराला मत म्हणजे मलाच मत, असे मोदी प्रत्येक ठिकाणी सांगत आहेत.

केजरीवाल यांच्या वक्तव्याने मोदी आणि भाजप यांचे हे नॅरेटिव्ह मोडीत काढले आहे. भाजपमधील नियमांचा दाखला देत केजरीवाल यांनी पुढील वर्षी मोदी निवृत्त होतील आणि अमित शाह पंतप्रधान बनतील, असा दावा केला आहे. भाजपमध्ये इतरांसाठी जो नियम लागू होतो, तो मोदींसाठी होत नाही, याची माहिती असलेल्यांना केजरीवाल यांच्या दाव्यात तथ्य वाटणार नाही. मात्र काठावर असलेल्या, कसलाही विचार न करता केवळ मोदी यांच्या नावावर मत देणाऱ्या मतदारांमध्ये मात्र केजरीवाल यांच्या दाव्याने संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे केजरीवाल यांच्या दाव्याचे खंडन करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तातडीने समोर आले. असे काही होणार नाही, असे त्यांनी सांगितले. वयाच्या पंच्याहत्तरीनंतर राजकारणातून निवृत्त व्हावे, असा लेखी नियम भाजपमध्ये नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा...अशी यादी वाढतच जाईल. पक्षवाढीसाठी प्रचंड मेहनत घेणाऱ्या या ज्येष्ठ नेत्यांना सरळसरळ बाजूला सारण्यात आले. अन्य काही नेत्यांना राज्यपालांसारख्या पदांवर नेमणूक देण्यात आली. मध्यप्रदेशचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना खड्यासारखे बाजूला सारण्यात आले.

गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मध्यप्रदेशात भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्यात शिवराजसिंह चौहान आणि त्यांनी राबवलेल्या लाडली बहन सारख्या विविध योजनांचा मोठा वाटा होता. तरीही त्यांना बाजूला सारून नव्या चेहऱ्याला मुख्यमंत्रिपदाची संधी देण्यात आली. राजस्थानमध्ये वसुंधराराजे सिंधिया यांनाही असेच बाजूला सारण्यात आले. राजस्थानात भाजपची सत्ता आल्यानंतर वसुंधराराजे यांना मुख्यमंत्रिपद दिले जाईल, असे सर्वांना वाटत होते, मात्र मोदी, शाह यांनी तेथेही धक्कातंत्राचा वपर करून वसुंधराराजे यांना बाजूला सारले आणि नव्या चेहऱ्याला संधी दिली. शिवराजसिंह चौहान यांचे वय 64, वसुंधराराजे (राजस्थान) यांचे 70 तर रमणसिंह (छत्तीसगड) यांचे 71 वर्षे आहे. या तिन्ही दिग्गज नेत्यांना मोदी-शाह यांनी बाजूला बसवले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Congress News Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 Voting LIVE: पैसे रस्त्यावर पडले, हेलिकॉप्टरमधून 'जड' बॅगा उतरवल्या! राऊत,पवार सत्ताधाऱ्यांवर संतापले!

हाच धागा पकडून दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी मोदी, शाह यांच्यासह भाजपला खिंडीत गाठले आहे. वरील अनुभव पाहता केजरीवाल जे बोलताहेत ते, म्हणजे वयाच्या पंच्याहत्तरीनंतर मोदी निवृत्त होतील आणि अमित शाह पंतप्रधान बनतील, हे लोकांना खरे वाटू शकते. केजरीवाल यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे नेते रमेश चेन्नीथला यांनीही या मुद्द्यावून भाजपची कोंडी केली आहे.

निवडणूक कोणतीही असो, ती कोणत्या मुद्द्यांवर लढवली जाणार, हे भाजपच निश्चित करतो, आपल्या खेळपट्टीवर येऊन खेळण्यासाठी विरोधकांना भाग पाडतो, असा गेल्या दहा वर्षांचा अनुभव आहे. या निवडणुकीत मात्र थोडे उलटे चित्र दिसत आहे. विरोधकांच्या खेळपट्टीवर जाऊन भाजपला खेळावे लागत आहे. पक्षात इतरांसाठी जे नियम आहेत, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी नाहीत, यावर अमित शाह यांनी शिक्कामोर्तब केले आहे, किंबहुना केजरीवाल यांनी त्यांना तसे करायला भाग पाडले आहे. त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था भाजपची झाली आहे.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com