
Internal Rift and Speculations Within the Congress : मागील काही वर्षांत काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये काँग्रेसची स्थिती दयनीय बनली आहे. त्यानंतर सोडून जाणाऱ्या नेत्यांपेक्षा काँग्रेसला वेगळीच भीती सतावत आहे. ते नेते म्हणजे पक्षात राहून भाजपला मदत करणारे. पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यासह राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनीही यावर वारंवार भाष्य केले आहे.
काँग्रेसमध्ये राहून भाजपला मदत करणाऱ्या नेत्यांबाबत राहुल यांनीही कडक भूमिका स्वीकारली आहे. हे नेते उघडपणे मदत करत नसले तरी भाजपसाठी पूरक भूमिका घेणे, पक्षविरोधी विधाने करणे, पक्षाच्या वाटचाली अडथळे निर्माण करणे, पक्षातील गटबाजीला प्रोत्साहन देणे... अशा उचापती हे नेते करतात. याबाबत राहुल यांनी पुन्हा भाष्य केले आहे.
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील काँग्रेसच्या संघटन सृजन अभियानाची सुरूवात मंगळवारी राहुल यांच्या उपस्थितीत झाली. या दौऱ्यात राहुल यांनी पाच तासांत पाच मॅरेथॉन बैठका घेतल्या. यावेळी त्यांनी नेत्यांना गटबाजी संपविण्याचे आणि एकजुट होऊन काम करत संघटना मजबूत करण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांना केले.
संघटन बांधणीवर बोलताना त्यांनी पक्षात कोणतीही हेराफेरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही दिला. कुठे काही चुकीचे आढळून आले तर त्यात तातडीने बदल केला जाईल. भाजपची मदत करणाऱ्या नेत्यांना ओळखून त्यांना पदावरून हटवावे आणि संघटनेत योग्य व्यक्तींना योग्य स्थान दिले जावे, अशा सूचनाही त्यांनी नेत्यांना केल्या.
राहुल गांधी यांनी गुजरातमध्येही यावर यापूर्वी भाष्य केले होते. आता मध्य प्रदेशातही त्यांचा रोख भाजपला मदत करणाऱ्या नेत्यांवरच होता. या नेत्यांमध्ये पक्ष अधिक खिळखिळा होत असावा, अशीच त्यांची धारणा झाली असावी. ते खरेही आहे. कारण पक्षात राहून भाजपला रसद पुरविणे, केव्हाही धोक्याचेच. कोणत्याही पक्ष संघटनेसाठी असे नेते धोकादायकच ठरतात.
काँग्रेसमध्ये असे अनेक नेते असतील. त्यामुळे राहुल यांच्याकडून सातत्याने त्याचा उल्लेख केला जात आहे. या नेत्यांच्या खांद्यावरील जबाबदाऱ्यांचे ओझे कमी करत इतर प्रामाणिक नेत्यांना जबाबदारी देण्याचे काम राहुल यांना करावे लागणार आहे. महाराष्ट्रातही संघटन बांधणीचे आव्हान आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना चार्ज करावे लागणार आहे. पण केवळ भाषणे ठोकून उपयोग नाही. प्रत्यक्ष संघटन मजबूत करण्यासाठी जमिनीवर उतरून काम करावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.