Solapur Politics: सोलापुरात एमआयएमचा काँग्रेसने नव्हे, तर भाजपने घेतलाय धसका

Solapur Lok Sabha Constituency 2024 : सोलापुरात एमआयएमने उमेदवार दिलेला नाही. संविधान वाचवणाऱ्या पक्षाला पाठिंबा देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्या पक्षाने जाहीर केले आहे. त्यामुळे भाजपचे उमेदवार राम सातपुते हे विनाकारण अस्वस्थ झाले आहेत, असे दिसते.
Solapur Lok Sabha Constituency 2024
Solapur Lok Sabha Constituency 2024Sarkarnama

Maharashtra Politics News : लोक आपल्या आवडीच्या उमेदवाराला मत देऊ शकतात. निवडणूक त्यासाठी तर असते. राजकीय पक्षही कधी कधी अन्य उमेदवारांना पाठिंबा देत असतात. अन्य उमेदवारांना पाठिंबा देण्यात संबंधित राजकीय पक्षाचा स्वार्थ असू शकतो.

असाच एक पाठिंबा सोलापूर लोकसभा मतदारसंघातील (Solapur Lok Sabha Constituency 2024) भाजप उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) यांच्या जिव्हारी लागला आहे. यावरून त्यांनी दोन समाजांत तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले आहे.

एमआयएमचा फटका तसा आतपर्यंत काँग्रेसला बसला आहे, मात्र एका वेगळ्या कारणामुळे सोलापुरात भाजपने एमआयएमचा धसका घेतला आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) आणि माळशिरसचे भाजपचे आमदार राम सातपुते यांच्यात लढत होत आहे.

प्रणिती शिंदे या सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आल्या आहेत. गेल्या दोन निवडणुकांमध्ये एमआयएमच्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात मते घेतली होती.

एमआयएमच्या उमेदवाराने मते घेतली की त्याचा फटका काँग्रेस उमेदवाराला बसतो, असे साधारण चित्र दिसते. मात्र सोलापूर मध्य मतदारसंघात असे काही घडलेले नाही. ते का घडले नाही, याचा अभ्यास राम सातपुते यांनी उमेदवार म्हणून करायला हवा होता. ते न करता आता त्यांना एमआयएमने उमेदवार न दिल्यामुळे आक्षेपार्ह विधान केले आहे. महाराष्ट्रात भाजपमध्ये अशी विधाने करण्याची परंपरा अभावानेच दिसते.

या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी, असे अध्यक्षीय पद्धतीला साजेशे नॅरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे, मात्र महाराष्ट्रात सध्या तरी त्याला फारसे यश मिळताना दिसत नाही. उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत भाजपची कोंडी केली आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फडणवीस यांच्यावर आरोप केला की भाजपचे अनेक नेते त्यांच्यावर तुटून पडत आहेत. यामुळे महाविकास आघाडीला फायदा होईल की महायुतीला, हे पाहण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल, मात्र राज्याच्या प्रचारातून नरेंद्र मोदी यांना बाजूला सारण्यात महाविकास आघाडीला यश मिळत असल्याचे दिसत आहे. सोलापूरचे भाजपचे उमेदवार सातपुते यांनी एमआयएमने उमेदवार न दिल्यामुळे नरेंद्र मोदी यांना प्रचारात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Solapur Lok Sabha Constituency 2024
Raju Patil News: मनसेच्या इंजिनमुळे महायुतीची गाडी स्पीड पकडेल; राजू पाटलांची फटकेबाजी..

ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी ऱाष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. धैर्यशील मोहिते पाटील हे आता माढा लोकसभा मतदारसंघातून लढत आहेत. त्यामुळे राम सातपुते यांच्या अडचणींत वाढ झाली असणार. मोहिते पाटील कुटुंबीयांचा सोलापूर लोकसभा मतदारसंघातही प्रभाव आहे.

राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंर प्रणिती शिंदे यांनी एक पत्र जारी करून जबाबदारीने बोला, असा सल्ला त्यांना दिला होता. तो का दिला होता, आता त्याची प्रचिती येऊ लागली आहे. नरेंद्र मोदी यांना पाडण्यासाठी मशिदींतून फतवे निघत आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

काँग्रेसचे लोक संविधानाला खुले आव्हान देत आहेत, असेही ते म्हणाले आहेत. भाजपचे कर्नाटकातील नेते अनंत हेगडे यांनी राज्यघटनेत बदल करण्यासाठी भाजपला ४०० जागा हव्यात, असे विधान नुकतेच केले आहे. असे असतानाही सातपुते दुसरीकडेच आगपाखड करत आहेत.

एमआयएमकडून काँग्रेसला पाठिंबा दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सातपुते यांचे धाबे दणाणले आहेत, हे त्यांच्या विधानांवरून स्पष्ट होते. मुद्द्यांवर बोलायचे सोडून ही निवडणूक त्यांना हिंदू-मुस्लिम अशी करायची असावी. जरी एखाद्याने मोदींना पाडा असे म्हटले असले तरी ते संविधानाला आव्हान कसे होऊ शकते?

काँग्रेसने जिहादींना नेहमीच पाठीशी घातले आहे, मौलवी घरोघर फिरून प्रचार करत आहेत, असे सातपुते यांचे आरोप आहेत. ते जर का खरे असेल तर मौलवींना प्रचार करण्याचा अधिकार नाही का, हेही सातपुते यांनी स्पष्ट करायला हवे. उर्दू पत्रके वाटली जात आहेत, असेही सातपुते म्हणतात.

उर्दू भाषा भारतीय आहे, याची माहिती एकतर त्यांना नसावी किंवा असली तरी त्याद्वारे विशिष्ट समुदायाला लक्ष्य करण्याचा त्यांचा प्रयत्न असावा. उर्दू भाषा केवळ मुस्लिमांची आहे, असा तर्कहीन प्रचारही अधूनमधून केला जातो. हा त्यातलाच प्रकार आहे.

निवडणुकीच्या काळात विविध उमेदवार विविध आध्यात्मिक, धार्मिक नेत्यांचा आशीर्वाद घेत असतात. तशी छायाचित्रे प्रसारित केली जातात. मतदारांवर प्रभाव टाकण्याचा हा एक मार्ग असतो.

हव्या त्या उमेदवाराला मत देण्याचा, हव्या त्या उमेदवाराचा प्रचार करण्याचा अधिकार राज्यघटनेने दिला आहे. दिला नसेल तर सातपुते यांनी तसे सांगावे, मात्र राजकारणासाठी, निवडून येण्यासाठी समाजात नव्याने दुहीची बीजे पेरू नयेत.

Solapur Lok Sabha Constituency 2024
Sujay Vikhe Patil: आमदार जगताप बरोबर, तरी खासदार विखेंना अनिलभैय्या स्मरतात...

देशात दररोज किती खून होतात, याची माहितीही राम सातपुते यांनी घ्यायला हवी. आरोपी विशिष्ट समाजाचा असेल तर त्याला राजकीय, धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जातो. बंगळुरू येथील प्रकरणात सातपुते यांनी तशीच भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रातील भाजप उत्तरेतील राज्यांप्रमाणे नाही, याची जाणीव सातपुते यांनी ठेवायला हवी.

गोपीनाथ मुंडे यांच्यासाऱखे लोकनेते महाराष्ट्रात होऊन गेले आहेत. मुंडे यांना मानणारा वर्ग अजून सर्व समाजांत आहे. बोटावर मोजण्याइतकी नावे सोडली तर महाराष्ट्र भाजपमधील नेते अशी विधाने करत नाहीत. एमआयएमने उमेदवार दिला तर त्याचे स्वागत करायचे आणि अन्य उमेदवाराला पाठिंबा दिला तर आगपाखड करायची, हे पराभूत मानसिकतेचे लक्षण सातपुते यांनी टाळायला हवे.

एका रात्रीत आमदार केला, एका रात्रीतच तुमचे पार्सल बीडला पाठवू, असा इशारा धैर्यशील मोहिते पाटील यांनी सातपुते यांना दिला होता. सातपुते हे बाहेरचे उमेदवार आहेत, हे नॅरेटिव्ह प्रणिती शिंदे आणि त्यांच्या टीमने व्यवस्थित सेट केले आहे. ते खोडून काढणे सातपुते आणि त्यांच्या टीमला शक्य झालेले नाही का, अशी शंका सातपुते यांच्या विधानांवरून येत आहे.

एमआयएमच्या उमेदवारांनी गेल्या दोन निवडणुकांत भरघोस मते घेऊनही सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे कशा निवडून आल्या, त्यांचे नियोजन काय होते, याचा अभ्यास करून त्यावर तोड काढण्याऐवजी सातपुते हे समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Edited by: Mangesh Mahale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com