Narendra Dabholkar Murder Case: नरेंद्र दाभोलकर हत्याः 11 वर्षांनी निकाल; न्याय मिळाला का?

Narendra Dhabholkar Murder Case Supreme Court Judgement: डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणाचा निकाल 11 वर्षांनंतर लागला आहे. यातही पाचपैकी तीन आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली असून, दोघांना जन्मठेप झाली आहे. डॉ. दाभोलकर यांच्या खुनाचा कट कुणी रचला, त्यांच्या हत्येचा मूख्य सूत्रधार कोण, हे समोर आलेले नाही.
Narendra Dabholkar
Narendra DabholkarSarkarnama

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत नरेंद्र दाभोलकर (Narendra Dabholkar Case Verdict) यांची 20 अॅागस्ट 2013 रोजी पुण्यात हत्या झाली होती. या प्रकरणातील पाचपैकी तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली असून, दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

दाभोलकर (Narendra Dabholkar Murder Row) यांच्या खून प्रकरणाचा निकाल तर लागला, मात्र त्यांना न्याय मिळाला का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे, कारण दाभोलकर यांच्या हत्येचे षडयंत्र कुणी रचले होते, याचा उलगडा करण्यात पोलिसांना अपयश आले आहे.

तीन आरोपींची सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे अशी निर्दोष सुटलेल्यांची नावे आहेत. तावडे याचा या गुन्ह्यात हेतू असल्याचे दिसून आला आहे. त्याच्यावर संशय घेण्यासारखी परिस्थिती आहे, मात्र पोलिस आणि सरकार पक्षाला त्याचा गुन्हा सिद्ध करण्यात अपयश आल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

Narendra Dabholkar
Narendra Dabholkar Case : मोठी बातमी! दाभोलकर हत्या प्रकरणातील अंदुरे, कळसकरला जन्मठेप

सुनावणीदरम्यान एका मुद्द्यावर युक्तिवाद सुरू असताना बचाव पक्षाच्या वकिलांनी दाभोलकर (Narendra Dhabholkar Murder Case) यांच्या हत्येच्या गुन्ह्याचे समर्थन केले होते. याबाबत न्यायालयाने संबंधित वकीलांवर ताशेरे ओढले आहेत. त्यामुळेच दाभोळकर यांना न्याय मिळाला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना न्यायालाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या दोघांनी नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळीबार केल्याची कबुली न्यायालयात दिली आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तापस पुणे शहर पोलिस आणि एटीएसकडे सोपवण्यात आला. नंतर तो सीबीआयकडे देण्यात आला. सनातन संस्थेशी संबंधित सातारा येथील डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर (जालना). सचिन अंदुरे (छत्रपती संभाजीनगर) अॅड. संजीव पुनाळेकर, विक्रम भावे (मुंबई) यांना अटक करण्यात आली होती.

डॉ. तावडे याला सनातन संस्थेच्या पनवेल येथील आश्रमातून अटक करण्यात आली होती. या सर्वांविरुद्ध पुणे येथील विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांनी डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. ते पिस्तुल नष्ट करण्याचा सल्ला त्यांना अॅड. पुनाळेकर याने दिला होता, असे दोषारोपपत्रात म्हटले होते.

या खटल्याच्या सुनावणीला प्रचंड विलंब झाला. त्यामुळे आंदोलनेही झाली होती. विशेष न्यायालयात न्या. एस. आर. नावंदर यांच्यासमोर अखेर हत्येनंतर आठ वर्षांनी म्हणजे 15 सप्टेंबर 2021 रोजी या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली होती. सुनावणीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर येत गेल्या.

सीबीआयकडून विशेष सरकारी वकील अॅड. प्रकाश सूर्यवंशी यांनी 20 जणांची साक्ष घेतली. आरोपींच्या वतीने अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर, अॅड. प्रकाश सालसिंगीकर, अॅड. सुवर्णा आव्हाड यांनी अंतिम युक्तिवाद केला. विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात गेल्यावर्षी आॅक्टोबरमध्ये सुनावणी पूर्ण झाली होती. निकाल राखून ठेवण्यात आला होता. न्यायालयाने तो निकाल आज म्हणजे १० मे रोजी दिला.

न्यायालयाने या प्रकरणात गंभीर निरीक्षणे नोंदवली आहेत. डॉ. तावडे याचा या गुन्ह्याशी संबंध होता, मात्र पोलिसांना ते सिद्ध करता आले नाही, असे न्यायालयाने म्हटले. सबळ पुराव्याअभावी तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. यावरून पोलिसांना पुरावे गोळा करता आलेले नाहीत, असे दिसून येते.

गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींच्या विरोधात पोलिसांनी सबळ पुरावे दाखल केले. त्यामुळे त्यांना जन्मठेप आणि प्रत्येकी पाच लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. उर्वरित तीन आरोपींच्या विरोधातही पोलिसांनी सबळ पुरावे गोळा केले असते तर त्यांनाही शिक्षा झाली असती. बचाव पक्षाच्या वकीलांच्या बाबतीत न्यायालयाने नोंदवलेले एक निरीक्षण चिंताजनक आहे.

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा समाजातून निषेध करण्यात आला. तसाच एक वर्ग समर्थन करणाराही आहे. काही लोकांनी तर उघडपणे समर्थन केले होते. समाजमाध्यमांत अशी बरीच उदाहरणे आढळून येतील. वैचारिक विरोध असला तरी माणसाच्या खुनाचे समर्थन केले जाऊ शकत नाही. मात्र दुर्दैवाने तसे होताना दिसत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येचेही आता काहीजणांकडून समर्थन केले जात आहे. समाजमाध्यमांत चालणारे असे प्रकार आता न्यायालयापर्यंतही पोहोचले आहेत आणि हे अत्यंत गंभीर समजले गेले पाहिजे. खटल्याची सुनावणी सुरू असताना एका मुद्यावर युक्तिवाद करताना बचाव पक्षाच्या वकीलांनी डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचे समर्थन केले, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. या वकीलांवर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. ही बाबत अत्यंत गंभीर आहे. अशा पद्धतीने गुन्ह्याचे समर्थन करता येणार नाही. वकीलांनी भविष्यात ही चूक सुधारावी, असे न्यायाधीशांनी निकालपत्रात नमूद केले आहे.

आरोपींवर संशय घेण्यास वाव होता. असा असतानाही तपास अधिकाऱ्यांनी योग्य प्रकारे तपास केला नाही. यूएपीएचे कलमही सिद्ध होऊ शकले नाही. यासह तपासात निष्काळजीपणा केल्यामुळे तीन आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे, असे न्यायाधीशांनी निकालात नमूद केले आहे. त्यामुळेच दाभोलकर हत्येचा निकाल लागला, मात्र त्यांना न्याय मिळाला नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे. जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपींच्या मागे कोण होते, म्हणजे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा कट कुणी रचला होता, हेही समोर आलेले नाही.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com