
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र कधी येणार, हा महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा आहे. अगदी अलीकडेच राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेणारे, राज ठाकरे यांच्याकडे मीही चहासाठी जाणार आहे, असे सत्ताधारी शिवसेना, भाजपचे नेते म्हणत होते. हेच नेते आता दोघे भाऊ एकत्र आले तरी काहीही फरक पडणार नाही, असे सांगत आहेत. दोघे भाऊ एकत्र यायची चर्चा पुढे सरकेल तशी भाजप, शिवनसेनेत अस्वस्थता वाढत असल्याचे नेत्यांच्या विधानांवरून दिसत आहे.
शिवसेनेत उद्धव ठाकरे यांचे वर्चस्व प्रस्थापित होणार, हे लक्षात आल्यानंतर राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी 2006 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात या पक्षाला विधानसभा, मुंबई महापालिका निवडणुकीत यश मिळाले. सध्या मनसेचा एकही आमदार नाही. असे असले तरी मुंबईत राज ठाकरे यांच्या ताकदीकडे दुर्लक्ष करता येत नाही. दोघे भाऊ एकत्र आले तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत त्याचा परिणाम दिसेल, असे जाणकारांना वाटत आहे.
गेल्याच महिन्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊ भेट घेतली होती. मीही राज यांच्याकडे जाणार आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज यांची भेट घेतली होती. लोकसभेच्या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या पाठिंब्यासाठी महायुतीने प्रयत्न केले होते. राज यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यांनी नारायण राणे यांच्यासाठी सिंधुदुर्ग मतदारसंघात सभा घेतली होती. त्यामुळे राणे यांचा विजय सुकर झाला, असे सांगितले जाते. तेच राणे पिता-पुत्र आता राज ठाकरे यांची खिल्ली उडवणारी विधाने करत आहेत.
भाषणाच्या जोरावर सभांना गर्दी खेचणारे राज ठाकरे हे राज्यातील सध्याच्या घडीला एकमेव नेते आहेत. त्यांच्या सभेसाठी लोकांना गोळा करून आणण्याची गरज भासत नाही. त्यांच्यात बाळासाहेब ठाकरे यांची छबी दिसते, वक्तृत्वशैलीही तशीच आहे. राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी होते, मात्र ती गर्दी मतांमध्ये रुपांतरित होत नाही, असे शरद पवार यांनी नुकतेच म्हटले आहे. पवार जे बोलले ते वस्तुस्थिती आहे. असे असतानाही राज-उद्धव एकत्र येण्याच्या चर्चेची इतकी दखल का घेतली जात आहे? शिवसेना, भाजपचे नेते धास्तावल्यासारखे का दिसत आहेत?, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
राज्यात विरोधकांचा आवाज क्षीण झाला आहे. काँग्रेस जेरीस, मोडकळीस आलेली आहे. चार नेत्यांचा आवाज एेकायला येतो, मात्र संघटनात्मक पातळीवर सुधारणा झालेल्या नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचीही अशीच गत झालेली आहे,. असे असले तरी उद्धव ठाकरे यांचे राज्यभरात कार्यकर्ते आहेत, नेटवर्क आहे, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांना सत्तेत जाण्याची घाई झाली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे विरोधकच उरलेले नाहीत. अशा परिस्थितीत उद्धव -राज यांनी एकत्र यावे, असे काही लोकांना वाटणे साहजिक आहे. भाजप, शिवसेनेने धसका घेतला असेल तर याच गोष्टीचा.
ज्येष्ठ राजकीय समीक्षक प्रा. जयदेव डोळे काय म्हणतात, हे पाहणेही रंजक ठरणार आहे. प्रा. डोळे म्हणतात, ''राज आणि उद्धव एकत्र येणार या जर तरच्या गोष्टी आहेत. ते एकत्र येतील का, हे शेवटपर्यंत सांगता येत नाही, कारण ईडीचा ससेमिरा मागे लागण्याचा धोका आहेच. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे भाजपच्या विरोधात बोललेले नाहीत. संजय राऊत हेच बोलत असतात. मुंबई महापालिका आम्हाला द्या, राज्याचे तुम्ही पाहून घ्या, अशी तडजोड हे दोघे भाऊ भाजपसोबत करू शकतात. भाजप साम-दाम-दंड ही निती वापरत असताना विरोधकांचे फार काही चालणार नाही, ही वस्तुस्थिती आहे.''
दोघा भावांच्या एकत्र येण्याच्या चर्चेने महायुतीतील कुरघोड्या, विसंवाद, वादविवाद बातम्यांतून गायब झाले आहेत, असेही प्रा. डोळे सांगतात. देवेंद्र फडणवीस यांना सध्या राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांची अधिक चिंता आहे. शिंदे, पवार यांच्यापासूनच फडणवीस यांना अधिक धोका आहे. हे दोघेही त्यांच्या पक्षांचा विस्तार करू लागले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याबाबत 'सॉफ्ट' होण्याची शक्यता आहे, असे प्रा. डोळे यांना वाटते. राज-उद्धव एकत्र आले तर मुंबई महापालिकेपुरता त्याचा परिणाम दिसेल, असेही ते सांगतात.
राज ठाकरे यांच्या मनसेचे राज्यभरात संघटन नाही, आमदार नाही, खासदार नाही... तरीही भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांचा धसका का घेतला असेल? राज ठाकरे यांची आभासी का होईना ताकद आहे, असे प्रा. डोळे सांगतात. मुंबईत काल रेल्वे अपघात झाला. त्यानंतर राज यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर प्रहार केला. त्यांनी माध्यमांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले. राज-उद्धव कधी एकत्र येणार, या बातम्या सातत्याने देण्याएेवजी लोकांचे मुद्दे मांडा, असे ते म्हणाले. यानिमित्ताने त्यांनी परप्रांतीयांचा मुद्दा पुन्हा एकदा उचलला.
राज सत्ताधाऱ्यांवर टीका करायला लागले की लोकांनी ती आवडते. विरोधकांचा आवाज क्षीण झाला आहे. त्यामुळे राज ठाकरे सरकारच्या विरोधात बोलायला लागले की लोकांना वाटते ते आपलीच भाषा बोलत आहेत, आपले मुद्दे मांडत आहेत. भाजप आणि शिवसेनेला नेमकी याचीच भीती वाटत असणार. त्यामुळे भाजप, शिवसेनेचे नेते राज-उद्धव यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेमुळे धास्तावल्याचे दिसत आहे. भूमिकेत सातत्य नसणे, ही राज यांची सर्वात कमकुवत बाजू आहे, असा लोकांचा समज आहे. दोघे भाऊ एकत्र आले तर महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीलाही चाप बसणार आहे. मात्र प्रा. डोळे म्हणतात तसे या जर तरच्या गोष्टी आहेत. तरीही भाजप, शिवसेनेच्या नेत्यांनी त्याची दखल घेऊन ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही, याबाबत उत्सुकता वाढवून ठेवली आहे.