CM Devendra Fadnavis : फटका एकाधिकारशाहीचा की अंतर्गत लाथाळ्यांचा... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर अशी वेळ का आली?

Mahayuti Government Cabinet Meeting Agenda issue : सत्ताधारी महायुतीत सर्व काही आलबेल नाही, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. बैठकीआधीच मंत्रिमंडळाचा अजेंडा फोडणाऱ्या मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचा इशारा दिला आहे. फडणवीस यांच्यावर ही वेळ त्यांच्या एकाधिकारशाहीच्या वृत्तीमुळे आली की महायुतीतील नाराजीमुळे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : आघाडी, युतीचे सरकार चालवताना मुख्यमंत्र्यांना कसरत करावी लागते. सर्वच बाबी आपल्या मनासारख्या घडण्याची, सर्वच कामे आपल्याला वाटतील तशी होण्याची शक्यता कमीच असते. राज्यातील महायुती सरकारमध्ये तीन पक्षांचा समावेश आहे. त्यामुळे ताळमेळ साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कसरत करावी लागत आहे. मंत्रिमंडळातील अजेंडा बैठकीपूर्वीच बाहेर आल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्र्यांना तंबी दिली आहे. फडणवीस यांची एकाधिकारशाही तर याला कारणीभूत नाही ना, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.  

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्र्यांना कारवाईचा इशारा दिल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही मंत्रिमंडळातील निर्णय बैठकीपूर्वीच बाहेर यायचे. त्यावेळी निर्णय आधीच बाहेर आणणारे लोक आता फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत आणि तेच आताही निर्णय बैठकीपूर्वी बाहेर आणत आहेत, अशी टीका राऊत यांनी केली आहे. याचा अर्थ असा की बैठक होण्यापूर्वीच निर्णय बाहेर येण्याचा हा काही पहिलाच प्रकार नाही, यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत.

महायुतीत सर्वकाही आलबेल आहे, असे अजिबात नाही. प्रचंड बहुमत असतानाही महायुतीतील अंतर्गत कुरघोड्यांमुळे या सरकारने खूप काही गमावले आहे. विरोधक कमकुवत आहेत, तेही अंतर्गत लाथाळ्यांमध्ये अडकले आहेत, ही बाब सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावर पडली आहे. विरोधक मजबूत असते, एकजूट राहिले असते तर महायुती सरकारच्या नाकीनऊ आले असते. आता परिस्थिती अशी आहे की, महायुतीतील अंतर्गत लाथाळ्यांना मुख्यमंत्री फडणवीस हे वैतागल्याचे दिसत आहे. त्यातूनच त्यांनी मंत्र्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे.

Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Maharashtra Politics : "बावनकुळे-धस-मुंडेंच्या भेटीमागे कुछ तो गडबड है..." काँग्रेसच्या बड्या नेत्याला वेगळाच संशय

आता खरा प्रश्न असा आहे की, बैठकीपूर्वीच मंत्रिमंडळाचे निर्णय बाहेर का आणले जात असतील? याबाबत राजकीय विश्लेषक अशोक पवार सांगतात, ''हल्ली अर्थसंकल्प सादर होण्याआधीच फुटत आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळातील निर्णय फुटल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. मंत्र्यांचे ओएसडी कोण असणार, त्यांचे पीए, त्यांच्या कार्यालयातील अधिकारी कोण असणार, हे मुख्यमंत्री फडणवीस हेच ठरवणार असतील तर मंत्र्यांमध्ये असंतोष निर्माण होणारच. यावरून शिंदे गटात नाराजी वाढली आहे. परिणामी, बैठकीआधीच मंत्रिमंडळाचे निर्णय बाहेर येत आहेत."

मंत्रिमंडळाच्या बैठकांचा अजेंडा ठरलेला असतो. बैठकीच्या एक दिवस आधी त्याची माहिती कॅबिनेट मंत्र्यांना दिली जाते. मंत्र्यांच्या एखादा ओसएडीकडे ही माहिती येते. असे अधिकारी मग जवळच्या पत्रकारांना ती माहिती देतात, असेही अशोक पवार सांगतात. ओएसडींवर मंत्र्यांचा वचक नसतो का? की मंत्र्यांच्या सहमतीनेच अशी माहिती बाहेर दिली जाते, याबाबत निश्चितपणे काही सांगता येत नाही. या दोन्ही प्रकारांतून म्हणजे, ओएसडी मंत्र्यांच्या परस्पर अशी माहिती देत असणार किंवा काहीवेळा मंत्रीही अशी माहिती बाहेर देत असणार. 

Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Haryana Congress: हरियाणा काँग्रेसला मोठा झटका; अनेक नेते, पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपद आपल्यालाच मिळेल, असे एकनाथ शिंदे यांना वाटत होते, मात्र तसे होणार नव्हते. अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या पारड्यात वजन टाकल्यामुळे शिंदेंचा पत्ता कट झाला. शिंदे यांना हालचाल करण्यासाठी जागाच राहिली नाही आणि त्यावेळेसपासून महायुतीत नाराजीनाट्य सुरू झाले. खातेवाटपाची कोंडीही बरेच दिवस फुटली नव्हती. काही केले तरी न मिळणाऱ्या गृहमंत्रिपदासाठीही शिंदे अडून बसले होते. अजितदादा पवार यांच्यामुळे भाजप 'सेफ' झाला होता. त्यामुळे एकनाथ शिंदेंकडे लक्ष न देण्याची मुभा भाजपला मिळाली होती.

भाजपचे हे 'सेफ' होणे शिंदे गटाच्या नाराजीचे प्रमुख कारण ठरले. त्यातच उद्योगमंत्री उदय सामंत हे 20 आमदारांना घेऊन भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू झाली किंवा ती सुरू करण्यात आली. त्यामुळेही शिंदे गटाचे हात बांधले गेले. असे असले तरी राजकारणात योग्य संधीची वाट पाहिली जाते. संधी मिळाली की त्याचे सोने करण्याचा हातखंडा राजकीय नेत्यांमध्ये असतो. मंत्रिमंडळाचे निर्णय बैठकीपूर्वीच बाहेर पडण्याचा प्रकार यातूनच घडला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांना आता मंत्र्यांवर कारवाई करण्याचा इशारा द्यावा लागला आहे.

प्रचंड बहुमताचे सरकार असतानाही मंत्र्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर का आली, असा प्रश्न लोकांना पडलेला असणार. अंतर्गत लाथाळ्या हे त्याचे सरधोपट उत्तर आहे. महायुतीत नाराजी आहे, विशेषतः शिंदे गटात ती अधिक आहे, हे दुसरे मोठे कारण आहे. आपल्या विभागात मुख्यमंत्र्यांचा किंवा अन्य कोणाचाही हस्तक्षेप सहन करणार नाही, असा संदेश बैठकीआधी निर्णय बाहेर सांगणाऱ्यांना द्यायचा असेल. पक्षांतर्गत विरोधकांना गार करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महायुतीतील अंतर्गत विरोधकांनाही गार करतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com