Tanaji sawant News
Tanaji sawant NewsSarkarnama

Tanaji Sawant News: पक्षशिस्तीची ऐसी-तैसी करत शिंदे गटाच्या प्रवक्त्याचा पोरकटपणा; विरोधकांना गुदगुल्या

Dharashiv Lok Sabha Election 2024: केदार यांच्या या व्हिडिओमुळे शिंदे गटाचा पोरकटपणा चव्हाट्यावर आला आहे. सावंतांच्या उमेदवारीला विरोध असेल तर तो पक्षश्रेष्ठींसमोर बंद दाराआड तसे ते सांगू शकले असते. व्हिडिओ व्हायरल करून केदार यांना शिवसेनेचे (शिंदे गट) हसू केले आहे.

धाराशिवचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji sawant) यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या उमेदवारीला विरोध करणार, असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते योगेश केदार (Yogesh Kedar) यांनी केले आहे. त्यांचा तसा व्हिडिओ समोर आला आहे, पक्षशिस्तीच्या पातळीवर हा निश्चितच पोरकटपणा आहे. शिंदे गटाने यापासून वेळीच धडा घ्यायला हवा.

आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे वादांशी जुनेच नाते आहे. ते पालकमंत्री असलेल्या धाराशिव जिल्ह्यातही त्यांच्याबाबत वादाचे प्रसंग घडले आहेत. उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघातून त्यांचे पुतणे धनंजय सावंत हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते योगेश केदार यांनीच धनंजय सावंत यांच्या उमेदवारीला विरोध सुरू केला आहे.

पालकमंत्री सावंत यांना विरोध करण्याइतके बळ योगेश केदार यांच्यात आहे का, की त्यामागे आणखी कुणी आहे, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. केदार यांच्या या व्हिडिओमुळे शिंदे गटाचा पोरकटपणा चव्हाट्यावर आला आहे. सावंतांच्या उमेदवारीला विरोध असेल तर तो पक्षश्रेष्ठींसमोर बंद दाराआड तसे ते सांगू शकले असते. व्हिडिओ व्हायरल करून केदार यांना शिवसेनेचे (शिंदे गट) हसू केले आहे.

राज्यभरात महायुतीत जागावाटप किंवा उमेदवार निश्चितीच्या कारणावरून अनेक ठिकाणी तिढा निर्माण झाला आहे. उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाला सोडावा आणि धनंजय सावंत यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी पालकमंत्री सावंत यांनी लावून धरली आहे. मात्र, स्वतः पालकमंत्री सावंत यांनी या मतदारसंघातून लढावे, अशी गळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घातली आहे, अशी विश्वसनीय माहिती आहे.

या पार्श्वभूमीवर धनंजय सावंत यांच्या उमेदवारीला विरोध करणारा योगेश केदार यांचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. आरोग्यमंत्री सावंत यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करणारे फलक मागे पुण्यात झळकले होते. त्याबाबतही केदार यांनी या व्हिडिओत संताप व्यक्त केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उमेदवारी मला नको, माझे पुतणे धनंजय सावंत यांना द्या, असे आरोग्यमंत्री सावंत यांनी म्हटले आहे, असे केदार या व्हिडिओत सांगत आहेत. सावंत यांच्या मागणीचा मी निषेध करतो, असेही ते पुढे व्हिडिओत म्हणत आहेत. मुख्यमंत्री व्हायचे असेल तर पक्ष वाढवा, अन्य लोकांना आमदार, खासदार करा. सर्वच पदे आपल्याच घरात घेऊ नका, असे केदार म्हणत आहेत. धाराशिव जिल्ह्यात उपऱ्या लोकांना मतदान होत नाही, याची जाणीव आता सावंत यांना नक्कीच होणार आहे. तानाजी सावंत व्यापारी म्हणून धाराशिव जिल्ह्यात आले आणि इंग्रज नीती वापरून आता राज्यकर्ते बनायचे धोरण आम्ही जिल्हावासीय कधीही मान्य करणार नाही, असेही केदार म्हणत आहेत. धनंजय सांवत यांना आम्ही कोणत्याही परिस्थितीत विरोध करणार, त्यांना जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही. तानाजी सावंत लढले तर त्याबाबत मात्र नक्कीच सकारात्मक विचार करू, असे केदार या व्हिडिओत म्हणत आहेत.

आरोग्यमंत्री सावंत हे कुणाचाही मुलाहिजा बाळगत नाहीत. मी मुख्यमंत्र्यांचे पण ऐकत नाही, असे ते मागे पोलिस अधीक्षकांशी बोलताना म्हणाले होते. काही महिन्यांपूर्वी धाराशिव येथे महायुतीच्या समन्वय समितीची बैठक झाली होती. शिंदे गटाकडून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असलेले माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांना सावंत यांनी त्या बैठकीत बोलू दिले नव्हते. नांदेड येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात मागे मोठ्या संख्येने मृत्यू झाले होते. त्यासाठी सर्व मंत्रिमंडळ जबाबदार असल्याचे वक्तव्य सावंत यांनी केले होते. ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे बेरोजगार होते, त्यांना मीच खासदार केले. त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून मी उद्धव ठाकरे यांना दहा कोटी रुपये पक्षनिधी दिला होता, असे वादग्रस्त वक्तव्यही आरोग्यमंत्री सावंत यांनी काही दिवसांपूर्वीच केले होते.

Tanaji sawant News
BJP Tickets TO Celebrities: भाजपकडून बॉलिवूड क्वीन, निरहुआ, ड्रीम गर्ल, निवडणुकीच्या रिंगणात

योगेश केदार हे नुकते शिवसेनेत (शिंदे गट) दाखल झाले आहेत. याच महिन्यात त्यांची पक्षाच्या प्रवक्तेपदी निवड झाली आहे. यापूर्वी ते मराठा आरक्षण आंदोलनाशीही संबंधित होते, असे सांगितले जाते. त्यांच्या फेसबुक वॉलवर यांसंबंधीची माहिती, छायाचित्रे, व्हिडिओ आहेत. ते धाराशिव जिल्ह्यातीलच रहिवासी आहेत. धनंजय सावंत यांच्या उमेदवारीला विरोध करणारा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ते प्रकाशझोतात आले आहेत. भल्याभल्यांना दमात घेणारे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या निर्णयाला विरोध करण्याचे बळ नवखे असलेल्या केदार यांच्या अंगात कुठून आले, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. दरम्यान, केदार यांचा समाचार घेणारा व्हिडिओही व्हायरल झाला असून, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अर्चना दराडे यांनी केदार यांना इशारा दिला आहे. केदार यांचा उल्लेख त्यांनी बांडगूळ असा केला आहे.

श्रीकांत शिंदेंच्याही उमेदवारीला विरोध करणार का?

एकाच घरी दोन पदे नको, असा आग्रह योगेश केदार या व्हिडिओत करताना दिसत आहेत. डॉ. सावंत हे आरोग्यमंत्री आहेत. त्यामुळे आपले पुतणे धनंजय सावंत यांना उमेदवारी न देता पक्ष वाढवण्यासाठी अन्य लोकांना संधी द्यावी, असा त्यांच्या मागणीचा आशय आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत, याचा विसर केदार यांना पडला आहे. आता श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी न देता अन्य कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी, अशी मागणी शिंदे गटाचे प्रवक्ते असलेले योगेश केदार करणार आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. केदार यांच्या या व्हिडिओमुळे विरोधकांना निश्चितच गुदगुल्या होत असतील. कोणाला उमेदवारी द्यायची किंवा न द्यायची हा ज्या त्या पक्षाचा निर्णय असतो. मात्र, केदार यांच्या या व्हिडिओमुळे पक्षशिस्तीच्या पातळीवरील शिंदे गटाचा पोरकटपणा चव्हाट्यावर आला आहे.

Edited by: Mangesh Mahale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com