
Mumbai News : जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या राज्यातील पर्यटकांना त्यांच्या घरी परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून एकीकडे शर्थींचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी राज्य सरकारची यंत्रणा कामाला लागली आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी वादग्रस्त विधान करून पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला आहे. मस्के हे नेहमीच वादग्रस्त विधाने करून या-ना त्या कारणावरून वाद ओढवून घेत असतात.
जम्मू काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या नागरिकविषयी त्यांनी वादग्रस्त विधान करीत पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सामान्य जनतेमध्ये संताप व्यक्त होत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या प्रवाशांना मदत करणे ही राज्य सरकारची जबाबदारी असताना, त्यावरून अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे अपमानास्पद आणि असंवेदनशील मानले जात आहे.
जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 28 जणांना प्राण गमवावे लागले. त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. या घटनेनंतर राज्यातील महायुती सरकारने जम्मू काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या नागरिकांसाठी तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी तातडीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) श्रीनगरमध्ये गेले. या ठिकाणी त्यांनी अडकलेल्या नागरिकांना दिलासा दिला आहे. त्यासॊबतच दोन विमानांमधून 180हून अधिक पर्यटकांना महाराष्ट्रामध्ये आणले.
दुसरीकडे अशा परिस्थितीमध्ये देखील शिंदे गटाच्या खासदारांनी या अडकलेल्या पर्यटकांबाबत वादग्रस्त विधान करून अंगावर वाद ओढवून घेतला आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. काश्मीरमधून महाराष्ट्रात परतणाऱ्या नागरिकामध्ये 45 लोक वर्धा आणि नागपूरचे आहेत, जे तिथे रेल्वेने गेले होते. सीरआरपीएफच्या कॅम्पमध्ये राहत होते, ते आयुष्यात कधीही विमानात बसले नव्हते. त्या लोकांना विमानाने आणण्याची व्यवस्था एकनाथ शिंदे यांनी केली आहे, असे वादग्रस्त वक्तव्य खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे गेल्याने अधिका-यांना प्रोत्साहन मिळाले. हे नागरिक पहलगाममध्ये अडकले होते, सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये राहत होते. त्यांच्या खाण्याचे वांधे होते त्या लोकांना एकनाथ शिंदेनी विमानतळावर आणलं, ते लोक पहिल्यांदा विमानात बसणार आहेत, असे देखील नरेश म्हस्के म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे
गरज नसताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी काश्मीरवारी केली. यानंतर न थांबता तुम्ही कसे गेले, कशी मदत केली याचे गोडवे गाण्यासाठी शिंदे सेनेचे खासदार नरेश मस्के पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील पर्यटकांवर किती उपकार केली अशी भाषा करतात? असे म्हणत महायुतीच्या कारभारावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सडकून टीका केली आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाने देखील त्यांनी केलेले हे वक्तव्य अत्यंत उद्धट आणि सामान्य जनतेचा अपमान करणारे असल्याचे म्हटले आहे. लोक अडचणीत असताना त्यांच्यावर उपकार केल्यासारखं बोलणं हे अशोभनीय आहे, असे उद्धव ठाकरे गटाचे म्हणने आहे.
राज्य सरकारची जबाबदारी लक्षात घेऊन, मदतीला 'उपकार' म्हणने हे लोकशाहीच्या मूळ मूल्यांच्या विरोधी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणी एकनाथ शिंदे गटाकडून काही नेत्यांनी म्हस्के यांचे वक्तव्य व्यक्तिगत मत असल्याचे सांगत पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचे स्पष्ट केले आहे.
खासदार नरेश म्हस्के यांच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. जनतेने त्यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. मस्के यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर नागरिकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. अनेकांनी ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर "नेते जनतेची सेवा करताना उपकार केल्यासारखे का बोलतात?" असा सवाल उपस्थित केला आहे. काही जणांनी तर "लोकशाहीत मदत ही जबाबदारी असते, उपकार नव्हे" असे स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यामुळे येत्या काळात या विधानामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
लोकप्रतिनिधींनी देखील आपली जबाबदारी पार पाडत असताना काळजी घेण्याची गरज आहे. त्यासोबतचा बोलताना नम्रता आणि संवेदनशीलता बाळगणं आवश्यक आहे. अशास्वरूपांच्या वक्तव्यांमुळे लोकांमध्ये असंतोष वाढू शकतो आणि राजकीय नेतृत्वाच्या प्रति विश्वासाला धक्का लागू शकतो, त्यामुळे पक्ष संघटनानी देखील वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेतेमंडळीला वादग्रस्त विधाने करणाऱ्यावर आवर घालण्याची गरज आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.