
Manmohan Singh Death : अर्थतज्ज्ञ, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे वयाच्या 92 व्या वर्षी गुरुवारी रात्री दिल्ली (Delhi) येथे निधन झाले. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. देशासह जगभरातून मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. परदेशांतील नामवंत माध्यमांनीही डॉ. सिंग यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला होता.
डॉ. सिंग (Manmohan Singh) हे मृदूभाषी, प्रतिभावान होते, ते दृष्टे होते, भारताच्या अर्थव्यवस्थेची घडी त्यांनी बसवली, अशा शब्दांत माध्यमांनी आदरांजली वाहिली आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने डॉ. मनमोहनसिंग यांचा उल्लेख अनुत्सुक पंतप्रधान असा केला आहे. पुढे त्यांची गणना भारताच्या सर्वाधिक यशस्वी नेत्यांमध्ये झाली.
डॉ. सिंग यांच्या कार्यकाळात झालेली आर्थिक वाढ, त्यांनी लाखो लोकांना गरीबीतून बाहेर काढण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. आघाडीचे सरकार चालवताना त्यांनी दाखवलेला संयम आणि त्यांच्यावर सोनिया गांधींचा (Soniya Gandhi) प्रभाव याचा उल्लेख रॉयटर्सने केला आहे. डॉ. सिंग यांना जगभरातून आदर मिळाला, मात्र ते पंतप्रधान असताना सत्तेच्या चाव्या सोनिया गांधी यांच्या हातात होत्या, असा समज निर्माण झाला होता, असेही रॉयटर्सने म्हटले आहे.
डॉ. मनमोहनसिंग हे भारतातील आर्थिक सुधारणांचे शिल्पकार होते, असे बीबीसीने लिहिले आहे. 1991 ते 1996 दरम्यान अर्थमंत्री असताना आणि 2004 ते 2014 दरम्यान पंतप्रधान असताना डॉ. सिंग यांनी भारताची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी मोलाचे योगदान दिले. त्याची इतिसाहात नोंद झाली आहे. भारताच्या सर्वोच्च पदावर, म्हणजे पंतप्रधानपदावर विराजमान झालेले शीख समुदायातील ते पहिलेच.
1984 मधील शिखविरोधी दंगलीबद्दल त्यांनी जाहीर माफी मागितली होती. त्यामुळे त्यांचा प्रामाणिकपणा अधोरेखित झाला होता, असे बीबीसीने म्हटले आहे. डॉ. सिंग यांच्या योगदानाचा उल्लेख करताना बीबीसीने त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळावरही प्रकाश टाकला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे 2014 मध्ये काँग्रेसची सत्ता आली नाही, असेही लिहिले आहे.
मृदूभाषी, विद्वान असलेल्या डॉ. मनमोहनसिंग यांच्या प्रयत्नांमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेचा जगभरात दबदबा निर्माण झाला, अशा शब्दांत अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्राने आदरांजली वाहिली आहे. मुंबईवरील (Mumbai) 26-11 च्या अतिरेकी हल्ल्यानंतर त्यांनी पाकिस्तानसोबच संबंध सुरळीत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचाही उल्लेख करण्यात आला आहे. भ्रष्टाचार आणि देशांतर्गत दहशतवाद हाताळण्याच्या त्यांच्या पद्धतीवर टीका झाली होती.
त्यांचे व्यक्तीमत्व निर्णय घेण्यासाठी सक्षम होते, अभ्यासू होते. त्यांच्या प्रतिमेला तडा देण्यासाठी झालेल्या प्रयत्नांबाबतही लिहिण्यात आले आहे. अर्थतज्ज्ञ ते पंतप्रधान हा डॉ. मनमोहनसिंग यांचा प्रवास नाट्यमय होता, असे वॉशिंग्टन पोस्टने लिहिले आहे. अमेरिकेसोबत संबंध सुधारण्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. अमेरिकेसोबतचा 2005 मधील अण्वस्त्र करार ऐतिहासिक होता, असे या वृत्तपत्राने लिहिले आहे.
पंतप्रधानपद सोडल्यानंतर डॉ. सिंग हे सार्वजनिक जीवनातून काहीसे बाजूला पडले होते. त्यांच्यावर 'दी ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर'सारखा चित्रपटाचा बनला. तत्वनिष्ठ, निर्णयक्षमता असलेल्या डॉ. सिंग यांची प्रतिमा या चित्रपटाने शक्तिहीन पंतप्रधान अशी केली. त्यांच्या पक्षानेही त्यांना बाजूला केले होते, असेही या लेखात म्हटले आहे. कतार येथील अल जझीरा या माध्यमसमूहाने डॉ. मनमोहनसिंग यांना विनम्र नेता असे म्हटले आहे. ते अत्यंत प्रामाणिक होते.
सामाजिक, आर्थिक बदल घडवून आणण्यासाठी त्यांचे निर्णय मैलाचा दगड ठरले. समकालीन माध्यमे आणि विरोधी पक्षांच्या तुलनेत इतिहासच माझी दखल घेईल. मला न्याय देईल, असे डॉ. मनमोहनसिंह 2014 मध्ये म्हणाले होते. याचाही उल्लेख अल जझीराने केला आहे. जगभरातील अन्य अनेक वृत्तपत्रांनाही डॉ. सिंग यांना आदरांजली वाहत त्यांच्या योगदानाचे स्मरण केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.