Pankaja Munde News : फेरा संकटांचा, पण वारसा संघर्षाचा; पंकजा मुंडे खंबीर

Pankaja Munde BJP News : कठीण परिस्थितीतही त्यांचा खंबीरपणा कायम असल्याचे दिसते.
Pankaja Munde News
Pankaja Munde NewsSarkarnama

Beed Politics News : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी जिल्हा परिषद सदस्य ते केंद्रीय मंत्री व्हाया राज्याचे उपमुख्यमंत्री असा प्रवास करताना संघर्षाचे अनेक चढ सर केले. पुढे त्यांचा वारसा चालविताना पंकजा मुंडे यांच्या वाट्यालाही कायम संघर्षच आहे. मात्र, दिवंगत मुंडेंप्रमाणे पंकजा मुंडे यांनाही तत्त्वाशी तडजोड केली नाही. कठीण परिस्थितीतही त्यांचा खंबीरपणा कायम असल्याचे दिसते.

गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात जिल्हा परिषद सदस्य म्हणून केली. आपल्या संघर्षाच्या जोरावर त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्रिपदापर्यंत धडक मारली. भाजपला (BJP) बहुजनांचा पक्ष अशी ओळख देण्यात आणि राज्यात भाजपला वाढविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. दरम्यान, दिवंगत मुंडेंचा राजकीय वारसा चालविणाऱ्या पंकजा मुंडे यांच्या वाट्यालादेखील संघर्षच असल्याचे बोलले जाते. पंकजा मुंडेंनी २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातून काढलेल्या संघर्ष यात्रेने भाजपला सत्तेची शिडी सर करण्यात हातभार लागला. मात्र, पंकजा मुंडेंमागील संघर्षाचा फेरा कायम राहिला आहे.

Pankaja Munde News
Raj Thackeray News : राज ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालय आणि मनसैनिकांचेही यासाठी मानले आभार

त्यांच्याकडील महत्त्वाच्या खात्यांचे मंत्रिपद गेले. त्यांच्या खात्यात अनियमितता झाल्याचा (चिक्की घोटाळा वगैरे) आरोप झाला. त्यांचा विधानसभेला पराभव झाला. पुढे राज्यसभा, विधान परिषदेला त्यांना टाळले गेले. एकेकाळी दिवंगत मुंडे व त्यांचे कार्यकर्ते असणाऱ्यांना महत्त्वाची पदे दिली गेली. केंद्रात मंत्रिपद देतानाही त्यांच्या भगिनी डॉ. प्रीतम मुंडेंपेक्षा इतरांना पदे मिळाली. मात्र, पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आपला करारी बाणा सोडला नाही. संघर्ष आपल्या रक्तात असल्याचे त्यांनी सांगीतले. पंकजा मुंडे यांनी कायम आपले नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह व भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डाच आहेत हे निक्षून सांगितले.

दिवंगत गोपीनाथ मुंडे व भगवानगडाचा दसरा मेळावा हे अतूट नाते होते. पुढे याला काही कारणांनी छेद दिला गेला. मात्र, परळीजवळ गोपीनाथगडाची उभारणी त्यांनी केली. विशेष म्हणजे संत भगवानबाबांचे जन्मगाव सावरगावला बाबांच्या स्मारकाची उभारणी आणि दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली. पक्षाव्यतिरिक्त स्वत:च्या मतांची बेगमी असणाऱ्या राज्यातील मोजक्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश आहे ते नाकारून चालणार नाही. मात्र, त्यांची हीच जमेची बाजू त्यांच्या राजकीय विरोधकांना अडचणीची वाटते. राज्यातील ओबीसी लीडर असणाऱ्या पंकजा मुंडे जातील तेथे गर्दी खेचू शकतात हे परवाच्याच शिवशक्ती परिक्रमेतून सिद्ध झाले.

दरम्यान, आता त्यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने कारवाई केली. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी अगदी प्रतिकूल परिस्थितीत आणि संघर्षातून कारखान्याची उभारणी केली होती. आशिया खंडात या कारखान्याचा लौकिक वाढविला. एकेकाळी वैद्यनाथ परिवारात २० हून अधिक कारखाने होते. सहकारी साखर कारखान्यांची साखळी तयार करणारे मुंडे भाजपमधील एकमेव नेते ठरले. पुढे दुष्काळी परिस्थितीमुळे ऊस उत्पादन घटले आणि कारखाना अडचणीत आला. गाळपासाठी काढलेल्या कर्जांची परतफेड कारखाना प्रशासनाला वेळेत करता आली नाही. कारखान्यामागील संकटाचा फेरा कायम आहे. इतर अडचणींतल्या कारखान्यांना मदत मिळत असताना 'वैद्यनाथ'चे नाव टाळले गेले. मात्र, संघर्ष कन्या असलेल्या पंकजा मुंडे आजही खंबीर असल्याचे दिसते.

Edited by : Amol Jaybhaye

Pankaja Munde News
Sharad Pawar Sabha : शरद पवारांची सभा आंबेगावात नाही, तर जुन्नरमध्ये १ ऑक्टोबरला होणार; पण...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com