Abhijeet Patil : फडणवीससाहेब, अभिजित पाटलांमुळे माढा-सोलापुरात वजाबाकी तर होणार नाही ना?

Madha-Solapur Loksabha 2024 : पंढरपूर-मंगळवेढ्याचे भाजपचे आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक आणि मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे कल्याणराव काळे यांनी फडणवीसांच्या सभेला दांडी मारली. अभिजित पाटील यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर नाराज भगीरथ भालकेंनी पक्ष सोडला. आताही आवताडे-परिचारकांनी फडणवीसांच्या सभेकडे पाठ फिरवली.
Abhijeet Patil-Prashant Paricharak-Samadhan Autade-Devendra Fadnavis
Abhijeet Patil-Prashant Paricharak-Samadhan Autade-Devendra FadnavisSarkarnama

Solapur, 06 May : माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघ संपूर्ण ताकदीने जिंकण्यासाठी निघालेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेरजेचे राजकारण करत पंढरपूरमधील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना सोबत घेतले. मात्र, फडणवीस यांचे हे बेरजेचे राजकारण अंगलट तर येणार नाही ना, अशी कुजबूज आता सुरू झाली आहे. कारण, पाटलांना सोबत घेतल्याने पंढरपूर-मंगळेवढा मतदारसंघातील त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी सावध झाले आहेत, त्यातून पंढरपूर-मंगळवेढ्याचे भाजपचे आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक आणि मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे कल्याणराव काळे यांनी फडणवीसांच्या सभेला दांडी मारली.

अभिजित पाटील (Abhijeet Patil) यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर नाराज भगीरथ भालकेंनी पक्ष सोडला. आताही आवताडे-परिचारकांनी फडणवीसांच्या सभेकडे पाठ फिरवली, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील दोन महत्वाचे मतदारसंघ काबीज करण्यासाठी फडणवीसांनी (Devendra Fadnavis) टाकलेल्या डावामुळे पंढरपूर-मंगळवेढ्यात वजाबाकी तर होणार नाही ना? अशी चर्चा आता रंगली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Abhijeet Patil-Prashant Paricharak-Samadhan Autade-Devendra Fadnavis
BJP Leader Threat : भाजपच्या पुण्यातील नेत्याला धमकी; व्हिडिओ व्हायरल करत राजकीय करिअर संपवण्याचा दिला इशारा

राज्य सहकारी बँकेने (शिखर बॅंक) विठ्ठल कारखान्यावर थकीत कर्जरकमेप्रकरणी जप्तीची कारवाई केली. त्यानंतर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी सोलापूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. कारखान्यावरील जप्तीच्या प्रकरणात मदत करण्याचा शब्द फडणवीस यांनी दिला, त्यानंतर पुण्यातील कर्ज वसुली लवादासमोर झालेल्या सुनावणीत अभिजित पाटील यांना दिलासा मिळाला. विठ्ठल कारखान्यावरील जप्तीची कारवाई मागे घेण्याचा आदेश ‘लवादा’ने राज्य सहकारी बँकेला दिला, त्यामुळे कारखान्याची सील करण्यात आलेली तीन गोदामे खुली करून देण्यात आली.

दरम्यान, फडणवीस यांनी बॅंकेच्या कारवाईच्या प्रकरणात मदत करण्याचा शब्द दिल्याने अभिजित पाटील यांनीही भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला. भाजपच्या उमेदवारांसाठी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी विठ्ठल कारखान्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सभा घेतली. मात्र, या सभेला भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak ) आणि पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे (Samadhan Autade) हे गैरहजर होते. तसं पाहता अभिजित पाटील हे परिचारक आणि आवताडे यांचे पंढरपूर-मंगळवेढ्यातील राजकीय प्रतिस्पर्धी आहेत, त्यामुळे विरोधकच थेट भाजपसोबत येत असल्यामुळे या नेत्यांमध्ये नाराजी नाराजीची भावना निर्माण झाली आहे की काय? अशी चर्चा पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यात रंगली आहे.

Abhijeet Patil-Prashant Paricharak-Samadhan Autade-Devendra Fadnavis
Vitthal Sugar Factory : विठ्ठल कारखाना अन्‌ सत्ताधारी...; अभिजित पाटलांनी औदुंबरअण्णांपासून भालकेंपर्यंतचा इतिहासच सांगितला

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे, भगीरथ भालके, युवराज पाटील, गणेश पाटील हे विठ्ठल परिवारात एकत्र होते. मात्र, अभिजित पाटील यांनी ह्याच नेत्यांशी दोन हात करून विठ्ठल सहकारी साखर कारखाना ताब्यात घेतला. त्यामुळे अभिजित पाटील यांच्याकडेच विठ्ठल परिवाराचे नेते म्हणून पाहिले जाते. तालुक्यातील विरोधक असलेल्या अभिजित पाटील यांच्या कार्यक्रमपासून कल्याणराव काळे हे दोन हात लांबच राहिले.

दरम्यान, अभिजित पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याच कार्यक्रमात पवार यांनी अभिजित पाटील यांच्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा उमेदवारीचे सूतोवाच केले होते, त्यामुळे त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले भगीरथ भालके यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर काही दिवस पक्षापासून अलिप्त राहिलेले भालके हे तेलंगणातील ‘केसीआर’ यांच्या ‘मोटारी’त जाऊन बसले, त्यामुळे अभिजित पाटील राष्ट्रवादीत आल्यानंतर भगीरथ भालके हे पक्षाबाहेर पडले.

Abhijeet Patil-Prashant Paricharak-Samadhan Autade-Devendra Fadnavis
Abhijeet Patil : अभिजित पाटलांचा फडणवीसांना जाहीर सभेत शब्द; ‘आत एक अन्‌ बाहेर एक...’

अभिजित पाटील हे आता भाजपसोबत गेले आहेत. पण, राज्यातील भाजपचे सर्वोच्च नेते फडणवीसांच्या सभेलाच भाजपच्या आजी-माजी आमदारांनी दांडी मारली, त्यामुळे अभिजित पाटील हे भाजपसोबत आलेले आमदार आवताडे आणि माजी आमदार परिचारक यांना रुचले नाही की काय? अभिजित पाटील यांच्या एन्ट्रीमुळे ते नाराज तर झाले नाहीत ना?, अशी चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनीही शरद पवार यांच्यासारखी भाषा अभिजित पाटील यांच्या संदर्भात वापरली आहे. ‘विठ्ठल साखर कारखाना महत्वाचा तर आहेच. पण, राजकारणसुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. जे तुमच्या मनात आहे, तेच माझ्याही मनात आहे,’ असे फडणवीस यांनी उपस्थितांना उद्देशून म्हटले आहे. त्यामुळे राजकारणातसुद्धा अभिजित पाटील यांना बळ देण्याचे सूतोवाच फडणवीस यांनी केले आहे, त्यामुळे तेव्हा भगीरथ भालके राष्ट्रवादीतून बाहेर पडले, आता अभिजित पाटील भाजपसोबत गेल्याने आता नंबर कुणाचा?, अशी चर्चा पंढरपूर तालुक्यात रंगली आहे.

Abhijeet Patil-Prashant Paricharak-Samadhan Autade-Devendra Fadnavis
Fadnavis Pandharpur Sabha : फडणवीसांच्या विठ्ठल कारखान्यावरील सभेला परिचारक, आवताडे, काळेंची दांडी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com