Narendra Modi : मोदी सरकारची 'ती' चूक राज्यात महायुतीला पुन्हा जेरीस आणणार?

Sharad Pawar : स्वातंत्र्यदिनी राहुल गांधी यांना पाचव्या रांगेत स्थान देण्याचा मुद्दा तापत आहे. त्यावरून संविधानाप्रति आस्था नसलेले लोक केंद्रात सत्तेत आहेत, अशी टीका करून शरद पवार यांनी महायुतीला कोंडीत पकडले आहे.
devendra fadnavis eknath shinde ajit pawar narendra modi.jpg
devendra fadnavis eknath shinde ajit pawar narendra modi.jpgsarkarnama
Published on
Updated on

लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी आला होता. संविधान बदलण्यासाठी भाजपला चारशेपेक्षा अधिक जागा हव्या आहेत, असे वादग्रस्त विधान भाजपच्याच काही नेत्यांनी केले होते. 'इंडिया' आघाडीने या मुद्द्यावर रान पेटवले होते.

वातावरण तापत असल्याचे पाहून भाजपच्या ( Bjp ) नेत्यांनी स्पष्टीकरणही दिले होते, मात्र त्याचा उपयोग झाला नव्हता. महाराष्ट्रासह अन्य राज्यांत होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही हा मुद्दा भाजपचा पिच्छा सोडणार नाही, अशी चिन्हे दिसत आहेत.

देशाच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. या सोहळ्यासाठी मान्यवर उपस्थित राहतात. पहिल्या रांगेत कॅबिनेट मंत्र्यांना स्थान असते. 'प्रोटोकॉल'नुसार विरोधी पक्षनेत्यालाही पहिल्या रांगेत स्थान मिळणे अपेक्षित असते, मात्र राहुल गांधी यांना पाचव्या रांगेत बसवण्यात आले होते. यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी झाली. समाजमाध्यमांवर अनेक यूजर्सनी मोदी सरकारवर टीका केली. आता याच मुद्द्यावरून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. "संविधानावरील धोका अजून पूर्णपणे टळलेला नाही," असे म्हणत शरद पवार यांनी मोदी सरकारची कोंडी केली आहे

मुंबईत शुक्रवारी महाविकास आघाडीचा मेळावा झाला. या मेळाव्याद्वारे आघाडीने विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार आदी नेत्यांनी तडाखेबंद भाषणांद्वारे केंद्र, राज्य सरकारवर निशाणा साधला. शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी राहुल गांधी यांना मागच्या रांगेत बसवल्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली. "लोकसभा निवडणुकीत काही प्रमाणात यश मिळाले. याचा अर्थ संविधानावरचे संकट टळले, असा होत नाही. संविधानाबद्दल आस्था नसलेले लोक सत्तेत आहेत," असे म्हणत शरद पवार यांनी भाजपची दुखरी नस दाबली. त्यामुळे संविधानाचा मुद्दा विधानसभा निवडणुकीतही पुन्हा प्रचाराच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे नेते अनंत हेगडे यांनी राज्यघटना बदलण्याबाबत वक्तव्य केले होते. त्याच काळात भाजपच्या अन्य काही नेत्यांनीही तशाच आशयाची विधाने केली होती. नंतर स्पष्टीकरण देता देता भाजप नेत्यांच्या नाकीनऊ आले होते. दलित, मुस्लिम मतदारांवर भाजप नेत्यांच्या या विधानाचा परिणाम झाला आणि भाजपला त्याचा फटका बसला. इतके सारे होऊनही तेलंगणातील भाजपचे वादग्रस्त आमदार टी. राजासिंह यांनी मुंबई दौऱ्यावर असताना तशाच आशयाचे वक्तव्य केले होते. "भाजपला चारशेपेक्षा जास्त जागा मिळाल्या असत्या तर भारत हिंदूराष्ट्र झाला असते," असे टी. राजासिंह म्हणाले होते. लोकांना याचा विसर पडतो न पडतो तोच आता राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांना पाचव्या रांगेत बसवल्याच्या कारणावरून पुन्हा संविधान बदलाचा मुद्दा चर्चेत आला आहे.

devendra fadnavis eknath shinde ajit pawar narendra modi.jpg
Maharashtra Politics : आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? ठाकरे, पटोलेंच्या पोटातलं ओठावर; पवारांच्या मनात काय...

राजकीय डावपेच आखून ते तडीस नेणारे नेते, अशी शरद पवार यांची ओळख आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या डावपेचांनी महायुतीला अक्षरशः जेरीस आणले होते. त्यांच्या डावपेचांवर महायुतीला अखेरपर्यंत तोड सापडला नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनासुद्धा शरद पवार यांच्या 'पिच'वर येऊन खेळावे लागले. गेल्या दहा वर्षांत असे पहिल्यांदाच घडत होते. यापूर्वीच्या सर्व निवडणुकांमध्ये भाजपने नॅरेटिव्ह तयार करायचा आणि विरोधक त्यात अडकून पडल्याचे चित्र देशाने पाहिले होते. 2024 मध्ये हे चित्र पूर्णपणे बदलल्याचे दिसून आले.

अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना विरोधी पक्षनेत्यांना स्वातंत्र्यदिन सोहळ्यात कॅबिनेट मंत्र्यांसोबत पहिल्या रांगेत स्थान मिळत होते, अशी आठवणही शरद पवार यांनी सांगितली. "विरोधी पक्षनेते हे संस्थात्मक पद आहे. विरोधी पक्षनेता कोण आहे, हे महत्त्वाचे नसून ते पद महत्त्वाचे आहे," असे सांगत शरद पवार यांनी मोदी यांच्या मनात गांधी कुटुंबीयांबाबत आकस असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगून टाकले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना पाचव्या रांगेत बसवण्याचा निर्णय मोदी सरकार आणि महायुतीची डोकेदुखी वाढवणारा ठरणार आहे. यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात राहुल गांधी पहिल्यांदाच विरोधी पक्षनेते म्हणून उपस्थित होते.

भाजप सत्तेत आला तर संविधान बदलणार, असे खोटे नॅरेटिव्ह इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीने पसरवले होते, असा आरोप आता भाजपच्या केंद्रातील नेत्यांसह महायुतीच्या नेत्यांकडून वारंवार केला जात आहे. मुळात, संविधान बदलाची भाषा भाजप नेत्यांनीच केली होती, हे लोकांना चांगलेच माहिती आहे. एका संकटातून कसेबसे सुटलो, असे महायुतीला वाटत असतानाच आता राहुल गांधी यांच्या मुद्द्यावरून शरद पवार यांनी नवा डाव टाकला आहे. हा डाव महायुतीचा पिच्छा सोडेल, असे वाटत नाही, कारण त्याला सबळ असा आधार आहे.

devendra fadnavis eknath shinde ajit pawar narendra modi.jpg
Assembly Election 2024 : ठरलं तर! शरद पवारांचे डावपेच, काँग्रेसची तरुण फळी आणि उद्धव ठाकरेंचा चेहरा...

पाचव्या रांगेत ऑलिम्पिक खेळाडू होते. त्यांचा सन्मान वाढावा म्हणून राहुल गांधी यांना त्या रांगेत स्थान दिले, असे कारण नंतर संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आले होते. खेळाडूंना सन्मान द्यायचा होता तर त्यांना कॅबिनेट मंत्र्यांसोबत पहिल्या रांगेत स्थान का दिले नाही, असे प्रत्युत्तर देत काँग्रेसने संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या कारणातील हवाच काढून घेतली आहे. मुळात संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आलेले कारण कोणालाही पटणार नाही, असेच होते. सत्ताधाऱ्यांचा गोंधळ उडाला आहे, हे दर्शवणारे ते कारण होते. शरद पवार यांनी ते अचूक हेरले आणि योग्य टायमिंग साधत महायुतीला कोंडीत पकडले. यातून महायुती मार्ग काढणार की अडकून पडणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com